संगमनेर शहरातील औरंगजेब प्रेमींच्या मुसक्या आवळा! बजरंग दलाची मागणी; सलग तीन दिवस मोबाईलवर वादग्रस्त स्टेट्स..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्राच्या मातीत पिकलेले अन्न खाऊन काहींच्या मनात औरंगजेबाविषयी प्रेम उत्पन्न झाल्याने त्यातून राज्यातील काही ठिकाणचे सामाजिक स्वास्थ संकटात आले असतांनाच आता संगमनेरातील काही समाज कंटकांकडून असेच प्रकार घडवून शहर अशांत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. संगमनेरातही काहीजणांनी आपल्या मोबाईलवर क्रूरकर्मा औरंगजेबाची प्रतिमा आणि व्हिडिओचा समावेश असलेले आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारा आक्षेपार्ह संभाषण असलेले स्टेट्स ठेवल्याने संगमनेरचा बजरंग दल संतप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘त्या’ समाजकंटकांच्या मोबाईलवरील स्टेट्सच्या स्क्रिनशॉटसह शहर पोलिसांना तक्रार अर्ज दिला आहे. त्यातून संबंधितांवर जातीय तेढ निर्माण करुन एका समाजाच्या भावना दुखवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या रविवारी (ता.11) दाखल झालेल्या या अर्जावर पोलिसांकडून अद्याप कोणतीही दृष्य कारवाई झालेली नाही हे विशेष.

याबाबत संगमनेरच्या बजरंग दलाने पोलिसांना दिलेल्या निवेदनानुसार सदरचा प्रकार 7 ते 10 जून दरम्यान शहरातील बागवानपूरा येथे राहणार्या तिघांनी जाणीवपूर्वक केल्याचे म्हंटले आहे. या तिघांनीही सोशल माध्यमातील आपल्या व्हॉट्सअॅप व इन्स्टाग्राम खात्यावर क्रूरकर्मा औरंगजेबाची प्रतिमा आणि व्हिडिओचा समावेश असलेले आणि एका समाजाच्या भावना दुखावल्या जातील अशाप्रकारचे संभाषण असलेले मोबाईल स्टेट्स ठेवले होते. त्यांच्या या कृत्यातून दोन धर्मात जातीय तेढ निर्माण होवून तालुक्यातील शांतता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. आपल्या या कृत्यातून शहर व तालुक्यातील सामाजिक स्वास्थ संकटात येईल याची पूर्णतः जाणीव असतांनाही या तिघांनी अशाप्रकारचे कृत्य केल्याने त्यांच्यावर प्रचलित कायद्यान्वये गुन्हे दाखल करुन त्यांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणीही करण्यात आली आहे.

याबाबत संगमनेरच्या बजरंग दलाने रविवारी (ता.11) पोलीस निरीक्षक भगवान मरिे यांची भेट घेवून त्यांना हा सगळा प्रकार सांगितला. यावेळी संबंधितांनी ‘त्या’ समाजकंटकांच्या मोबाईलवरील स्टेट्सचे स्क्रिनशॉटच्या छायांकित प्रतीही पोलिसांकडे दिलेल्या निवेदनाला जोडल्या आहेत. या प्रकरणाची अहमदनगरच्या सायबर विभागाकडून सखोल चौकशी करुन दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिली आहे. वास्तविक अहमदनगरमधील मुकुंदनगर परिसरात संदल मिरवणुकीत औरंगजेबाचे छायाचित्र झळकल्यानंतर राज्यात अशाच प्रकारच्या काही घटना समोर आल्या. त्यातच गेल्या 6 जूनरोजी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून संगमनेरात विविध संघटना व नागरिकांचा मोठा सहभाग असलेला ‘सकल हिंदू समाज’ या बॅनरखालील मोर्चाही अतिशय शांततेत पार पडला.

या मोर्चातून माघारी परतणार्यांकडून समनापूरात दगडफेकीची घटना घडून त्यात तिघे जखमी झाल्याने तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण होवूनही कोणतीही अनुचित घटना मात्र समोर आली नाही. त्यावरुन दोन्ही समाजातील सलोखा ठळकपणे समोर येत असतांना काहीजणांकडून एकमेकांच्या भावना दुखावण्याचे प्रकार जाणीवपूर्वक घडवण्याचा प्रयत्न होत असल्याने पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.

गेल्या 6 जूनरोजी संगमनेरात सकल हिंदू समाज या बॅनरखाली विराट मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात संपूर्ण तालुक्यासह आसपासच्या अनेक तालुक्यातील हजारों नागरिकांचा सहभाग असूनही समनापूरात काही उथळ माथ्याच्या तरुणांकडून घडलेला प्रकार वगळता कोणतीही अनुचित घटना घडली नाही. त्यावरुन संगमनेरच्या सामाजिक सौहार्दाची राज्यात चर्चा सुरु असतांना काही जणांकडून त्यालाच टाचणी लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याने पोलिसांनी सदरचा प्रकार अधिक गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

