संगमनेर तालुक्यातील निम्म्याहून अधिक बाधित गावे झाली ‘कोविड मुक्त’! साठहून अधिक गावांमध्ये पाचपेक्षा कमी सक्रीय रुग्ण असल्याने तालुक्याचा प्रवास कोविड मुक्तीकडे


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्हा मुख्यालयानंतर सर्वाधीक रुग्ण आढळणार्‍या संगमनेर तालुक्यात गेल्या आठ दिवसांत दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. चालू महिन्यात रुग्णसंख्येला ओहोटी लागण्यासोबतच मृत्यूदरातही मोठी घसरण झाल्याने बाधित झालेला तालुक्याचा निम्माभाग कोविड मुक्त होण्याच्या दारात उभा राहीला आहे. वैद्यकीय जाणकारांच्या अंदाजानुसार ऑक्टोबर हिटमध्ये कोविडचा प्रादुर्भाव आणखी खालावत जावून 15 नोव्हेंबरपर्यंत संगमनेर तालुका कोविड मुक्त होण्याचीही शक्यता यातून निर्माण झाली आहे. मात्र तो पर्यंत नागरिकांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे. आजच्या स्थितीत तालुक्यात अवघे 330 रुग्ण सक्रीय असून रुग्ण बरे होण्याचा तालुक्यातील वेगही आता 91 टक्क्यांवर पोहोचला आहे.


गेल्या सहा महिन्यांपासून रोजच कोविड बाधितांचे वाढते आकडे पाहून हैराण झालेल्या संगमनेरकरांना ऑक्टोबरने काहीसा दिलासा दिला आहे. या महिन्याच्या अगदी पहिल्या तारखेपासूनच तालुक्यातील रुग्णगतीला काहीसा ब्रेक लागल्याने सप्टेंबरने उंचावलेली तालुक्याची कोविड स्थिती काहीशी नियंत्रणात येवू पहात आहे. गेल्या महिन्यात सरासरी दररोज 51 रुग्णांची वाढ होत होती. या महिन्यात मात्र त्यात तब्बल दहा रुग्ण प्रती दिवस याप्रमाणे मोठी घट झाली असून गेल्या सहा दिवसांतील एकूण आकडेवारी बघता सध्या 41 रुग्ण प्रती दिवस या गतीने तालुक्यात कोविड बाधित समोर येत आहेत.


2 एप्रिलपासून आजवर संगमनेर शहरासह तालुक्यातील 170 गावांपैकी तब्बल 143 गावांपर्यंत कोविडचे संक्रमण पोहोचले आहे. दररोज चढत्याक्रमाने समोर येणार्‍या रुग्णांनी मंगळवारपर्यंत तालुक्यातील बाधितांची संख्या 3 हजार 504 वर पोहोचवली आहे. मात्र सद्यस्थितीत त्यातील केवळ 330 रुग्ण सक्रीय असून आजवर 3 हजार 136 रुग्णांनी उपचार पूर्ण केले आहेत, तर 38 जणांना आपला बळीही द्यावा लागला आहे. दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारपर्यंत एकूण बाधित गावांतील तब्बल 32 टक्के अर्थात 45 गावांतील 422 रुग्णांनी उपचार पूर्ण करुन आपली गावे कोविड मुक्त केली आहेत. या गावांमध्ये आता एकही सक्रीय संक्रमित रुग्ण नाही, तर 29 गावांमधील 461 रुग्णांनीही कोविडचा पराभव केला असून या गावांमध्ये आजच्या स्थितीत प्रत्येकी केवळ एकच रुग्ण सक्रीय असल्याने तालुक्यातील जवळपास निम्माभाग कोविड मुक्त होण्याच्या मार्गावर आहे.


कमी-अधिक प्रमाणात रुग्ण सापडलेल्या तालुक्यातील 45 गावांमध्ये आजच्या स्थितीत एकही सक्रीय संक्रमित रुग्ण नाही ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. विशेष म्हणजे कोविडचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर अगदी उशीराने संक्रमित झालेल्या चंदनापूरी (68 रुग्ण, दोन मृत्यु), चिखली (38 रुग्ण, एक मृत्यु), ढोलेवाडी (33 रुग्ण) व चिंचोली गुरव (19 रुग्ण, एक मृत्यु) या मोठ्या रुग्णसंख्येच्या गावांसह अंभोरे, आभाळवाडी, औरंगपूर, बोरबन, बिरेवाडी, चनेगाव, चितळवेढे, दाढ खुर्द व बुद्रुक, देवगाव, डिग्रस (एक मृत्यु), हिवरगाव पठार (दोन मृत्यु), जांबुत खुर्द, मुंजेवाडी, नान्नज दुमाला, निळवंडे, निंभाळे, निमगाव टेंभी, पानोडी, पेमरेवाडी, पिंपळे, पिंपळगाव देपा, पिंपरणे, पिंपरी लौकी, पोखरी बाळेश्‍वर,


सादतपूर, सावरगाव घुले, सायखिंडी (2 मृत्यु), शेळकेवाडी, शिरापूर, शिरसगाव धुपे, सोनेवाडी, सोनुशी (एक मृत्यु), तिगांव, वरुडी पठार, वरवंडी, वेल्हाळे (एक मृत्यु), वनकुटे, वडझरी, वाघापूर व झोळे या गावातील एकुण 431 रुग्णांपैकी 422 जणांनी कोविडचा पराभव केला व आजच्या स्थितीत आपले गाव कोविड मुक्त केले. दुर्दैवाने या गावांमधील एकुण नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला. या गावांसोबतच तालुक्यातील अन्य 29 गावांमधील 496 रुग्णांपैकी 461 जणांनी उपचार पूर्ण केले, तर दोघांचे बळी गेले. या गावांमध्ये आजच्या स्थितीत प्रत्येकी केवळ एकच रुग्ण सक्रीय संक्रमित आहे. अन्य 16 गावांमधील एकूण 223 रुग्णांपैकी 189 रुग्णांनी आजपर्यंत उपचार पूर्ण केले असून आज प्रत्येकी दोन याप्रमाणे या गावांमध्ये केवळ 32 रुग्ण सक्रीय आहेत. दुर्दैवाने या गावांमधील धांदरफळ बु. व शिबलापूर येथील प्रत्येकी एकाचा बळी गेला आहे.


तालुक्यातील आठ गावांमध्ये 170 सक्रीय रुग्ण आढळून आले होते, त्यातील 144 रुग्णांनी उपचार पूर्ण केले आहेत, या गावांमध्ये प्रत्येकी तीन याप्रमाणे आज 24 रुग्ण सक्रीय आहेत. जवळे कडलग व निमगांव बु. येथील प्रत्येकी एकाचा बळीही गेला आहे. उर्वरीत गावांपैकी पाच गावांमध्ये प्रत्येकी चार तर दोन गावांमध्ये प्रत्येकी पाच सक्रीय संक्रमित आहेत. या गावांमध्ये एकूण 140 रुग्ण आढळले होते, त्यातील 110 रुग्णांनी उपचार पूर्ण केले तर सध्या 30 जणांवर उपचार सुरु आहेत. पाच पेक्षा अधिक रुग्ण असलेली तालुक्यात एकूण बारा गावे असून त्यात संगमनेर शहराचाही समावेश आहे. सद्यस्थितीत शहराची एकूण रुग्णसंख्या 1 हजार 33 असून 950 जणांनी उपचार पूर्ण केले आहेत तर 71 जणांवर सध्या उपचार सुरु असून शहरातील बारा जणांचा आत्तापर्यंत बळी गेला आहे. उर्वरीत अकरा गावांमध्ये एकूण 680 रुग्ण आढळले होते, त्यातील 550 रुग्णांनी उपचार पूर्ण केले आहेत, तर 127 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. या अकरा गावातील घुलेवाडी येथील दोन तर समनापूर येथील एकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

एकंदरीत आजच्या स्थितीत शहरासह तालुक्यात दररोज सापडणार्‍या रुग्णवाढीला काहीसा ब्रेक लागल्याचे दिसून येत असून संक्रमित झालेली व्यक्ति यशस्वीपणे उपचारही पूर्ण करीत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे. तालुक्यातील रुग्ण बरे होण्याची सरासरीही वाढली असून 90.85 टक्के गतीने रुग्ण बरे होत आहेत. त्यासोबतच गेल्या महिन्यात 20 जणांचे बळी घेणार्‍या कोविडने गेल्या सहा दिवसांत एकही अप्रिय वार्ता न दिल्याने तालुक्याचा कोविड मृत्युचा दरही 1.10 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. या महिन्यात उकाडा वाढल्यास कोविडच्या प्रसारात आणखी घट होईल असा वैद्यकीय जाणकारांचा अंदाज असून तसे घडल्यास येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत संगमनेर तालुक्यातील कोविडची स्थिती पूर्णतः आटोक्यात येईल अशी अपेक्षाही वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांकडून वर्तविली गेल्याने सदरचे वृत्त संगमनेरकरांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणार आहे.


तालुक्यातील 170 पैकी 143 गावांमध्ये कोविडचे संक्रमण पोहोचले आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे त्यातील 45 गावांमधील रुग्णांनी उपचार पूर्ण करीत आपले गाव यापूर्वीच कोविड मुक्त केले आहे. तर 29 गावांमध्ये प्रत्येकी एक, सोळा गावांमध्ये प्रत्येकी दोन, आठ गावांमध्ये प्रत्येकी तीन, पाच गावांमध्ये प्रत्येकी चार तर दोन गावांमध्ये प्रत्येकी पाच अशा एकूण साठ गावांमधील 115 रुग्ण सक्रीय असून येत्या काही दिवसांत त्यांच्यावरील उपचार पूर्ण होतील व या गावांचीही कोविड मुक्त गावांमध्ये भर पडेल. त्यामुळे वाढलेल्या रुग्णसंख्येतूनही संगमनेरकरांना दिलासादायक चित्र दिसू लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *