शिरसगावमधून महिलेचे अपहरण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील शिरसगाव गावांतर्गत असलेल्या पांढरे वस्ती येथील सुनंदा कुंडलिक भोजणे (वय 45) या महिलेचे अज्ञात कारणावरुन खून करण्याच्या उद्देशाने दोघांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. याबाबत नुकताच तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यता आला आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, शिरसगाव येथील पांढरे वस्ती येथे वास्तव्यास असलेली सुनंदा भोजणे या महिलेचे अज्ञात कारणावरुन खून करण्याच्या उद्देशाने चंद्रभान चांगदेव चौधरी (रा.शिरसगाव, ता.संगमनेर) व सुभाष नाना सूर्यवंशी (रा.लिंगदेव, अकोले) या दोघांनी संगनमताने अपहरण केले आहे. या प्रकरणी महिलेचा मुलगा दिनेश कुंडलिक भोजणे याने संगमनेर तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुरनं.22/2021 भादंवि कलम 363, 364 (अ), 366, 34 नुसार वरील दोघांविरोधात गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने हे करत आहे.

