मतांची बरोबरी झाल्याने पाच जागांचे निकाल ‘ईश्वर चिठ्ठीतून’! संगमनेर तालुक्यावर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निर्विवाद वर्चस्व

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सोमवारी ग्रामपंचायत निकालांचा धुराळा उडालेला असतांना संगमनेर तालुक्यातील पाच गावांमधील प्रत्येकी एका वॉर्डातील दोन्ही बाजूच्या उमेदवारांना समसमान मते पडल्याने पेच निर्माण झाला होता. अशा स्थितीत काय निकाल द्यावा याबाबत निवडणूक आयोगाने निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमोल निकम यांनी ‘ईश्वर चिठ्ठी’चा वापर करुन रात्री उशीराने हा पेच शांततेने निकाली काढला. दोन्ही बाजूच्या उमेदवारांनीही तो मान्य केल्याने प्रत्यक्ष मतमोजणीवेळी झालेला गोंधळ प्रत्यक्ष निर्णयाच्यावेळी मात्र पूर्णतः शमल्याचे चित्र दिसून आले.

सोमवारी सकाळी 8 वाजेपासून संगमनेर तालुक्यातील 90 ग्रामपंचायतीच्या 696 सदस्य निवडीची मतमोजणीची प्रक्रीया सुरु झाली. या दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमोल निकम यांनी केलेले गावनिहाय मतमोजणीचे नियोजन आणि त्यासाठी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात आत सोडण्यासाठी व पुन्हा बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे मार्ग केले होते. त्याचा परिणाम संपूर्ण निवडणूक निकाल प्रक्रीयेतून दिसून आला. कोठेही गोंधळ, गर्दी दिसत नसल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित असूनही त्याचा कोणताही परिणाम मतमाजणी प्रक्रीयेवर झाला नाही.

त्यातच दुपारच्या सत्रात तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींमधील प्रत्येकी एका वॉर्डातील दोन्ही बाजूच्या उमेदवारांना समसमान मते पडल्याने काहीसा पेच निर्माण झाला होता. मात्र अशावेळी राबवायच्या पर्यायाबाबत निवडणूक आयोगाकडून स्पष्ट निर्देश असल्याने निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी त्याचा अवलंब केला आणि काहीशी किचकट स्थिती निर्माण झालेली असतांनाही त्यावर शांततेने व दोन्ही पक्षांना मान्य असलेला तोडगा काढीत तेरावर्षीय बालक संस्कार संतोष ढोले याच्या हातून ‘ईश्वर चिठ्ठी’ काढून विजयी उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली.

या पेचात सांगवी येथील नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) असलेल्या वॉर्ड क्रमांक दोनमधून शिल्पा धनराज कातोरे व शोभा बाळासाहेब कानवडे यांना समान 165 मते पडले होती. चिठ्ठीतून आलेल्या नावानुसार शोभा कानवडे यांना विजयी घोषीत करण्यात आले. सोनेवाडीतील सर्वसाधारण महिला राखीव वॉर्ड क्रमांक दोनमधून अर्चना सुधाकर जायभाय आणि मनिषा रामदास जायभाय यांना समान 136 मते पडली होती. चिठ्ठीद्वारे अर्चना जायभाय यांना विजयी घोषीत करण्यात आले.

खंदरमाळवाडीत सर्वसाधारण मतदार संघाच्या वॉर्ड क्रमांक दोनमधून विक्रम रामनाथ कजबे व सतीश चंद्रकांत भुजबळ यांनी निवडणूक लढविली व दोघांनाही समान 347 मतेही मिळाली. ईश्वर चिठ्ठीतून विक्रम कजबे विजयी घोषीत झाले. झरेकाठी येथील नागरिकांचा मागास प्रवर्ग असलेल्या वॉर्ड क्रमांक दोनमध्येही बाबासाहेब बबन वाणी आणि विजय बन्सी वाणी या दोघांना प्रत्येकी 226 मते पडली. त्यातून विजय वाणी यांना विजयी घोषीत करण्यात आले. तर पिंपळगाव माथा येथील अनुसूचित जाती जमाती मतदार संघ असलेल्या वॉर्ड क्रमांक एकमध्येही असाच प्रसंग उद्भवला होता. तेथील बाळासाहेब पांडूरंग भांगरे व सुखदेव तुकाराम लहांगे या दोन्ही उमेदवारांनी 159 मते मिळवित एकमेकांशी बरोबरी केली. ईष्वर चिठ्ठीने मात्र सुखदेव लहांगे यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. अपेक्षेप्रमाणे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचेच समर्थक असलेले गावागावातील दोन गट या निवडणूकीत एकमेकांच्या समोर उभे ठाकले होते. त्यामुळे संगमनेर तालुक्यावरील त्यांची पकड यंदा आणखी मजबूत झाल्याचेही या निवडणुकीतून दिसून आले.

ग्रामीणभागात ग्रामपंचायत निवडणुकांना अनन्य महत्त्व असते. आपली राजकीय महत्त्वकांक्षा पूर्ण करणार्‍यांसह गावच्या विकासाची तळमळ असलेले कार्यकर्ते दर पाच वर्षांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होतात. निवडणुका पार पडल्यानंतर गावातील राजकीय वातावरणाचे ढग बाजूला सारुन आपले गाव आणि त्याचा विकास एवढाच मंत्र जपण्याची गरज आहे. संगमनेर तालुक्यात एकाच पक्षाच्या दोन गटांतच बहुतेक निवडणूका पार पडतात, त्यामुळे या सर्वांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावाचा सर्वकष विकास करण्यासाठी निवडणूका विसरुन आता कामाला लागण्याची गरज आहे.

Visits: 13 Today: 1 Total: 115141

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *