नामदारांचे स्वीय सहाय्यक दत्ता झोळेकर यांचे निधन!
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निवृत्त स्वीय सहाय्यक दत्तात्रय विठ्ठल झोळेकर (वय 57) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या दोन दशकांपासून ते नामदार थोरात यांच्या सेवेत असल्याने संपूर्ण संगमनेरसह राज्यातील अनेक ठिकाणच्या नागरिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते. दत्तामामा म्हणून अनेक अडलेल्यांना त्यांनी मदतीचा हातही दिला होता. त्यांच्या निधनाने एक उत्तम अधिकारी गमावला आहे. मंत्री थोरात यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
दत्ता झोळेकर पूर्वी दिवंगत नेते व बाळासाहेब थोरात यांचे विश्वासू अशोकराव मोरे यांच्याकडे सेवेत होते. अशोकराव मोरेही संगमनेर तालुक्याच्या पटलावरील एक लखाखता तारा होते. त्यांच्या सानिध्यात पैलू पडलेल्या दत्ता झोळेकर नावाच्या हिर्याला बाळासाहेब थोरातांनी हेरलं, आणि तेव्हापासून ते त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहू लागले. नामदार साहेब तालुक्याबाहेर असतांना येथील सगळी खबरबात आणि अन्य जबाबदार्या खुबीने पार पाडण्यात त्यांचा हातखंडा होता. नामदारांकडे अपेक्षेने काम घेवून आलेल्याचा विश्वास कायम ठेवून त्यांंना सहकार्य करण्याच्या त्यांच्या भूमिकेने अनेकजणांना यशाचे मार्गही गवसले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थाच्या कारणाने त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मध्यंतरी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यातून सावरत असतांना सोमवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती गंभीर झाली, त्यातच आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांच्या मित्र परिवाराला शोक अनावर झाला आहे. आज (ता.19) सकाळी त्यांचे पार्थिव मुंबईहून संगमनेरला आणण्यात येणार आहे. दुपारी 4 वा. येथील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. झोळेकर यांच्या निधनाबद्दल राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दुःख व्यक्त केले आहे. ‘मी एका चांगल्या सहकार्याला मुकलो आहे. झोळेकर यांनी अत्यंत निष्ठेने जबाबदारी पेलल्याने मला राज्यात काम करणं अधिक सुकर झालं’ असे भावोद्गार त्यांनी व्यक्त केले. आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, तालुका दुध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख, अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन अमित पंडित आदी प्रमुख मंडळींसह झोळेकर यांच्या मित्र परिवारात शोक पसरला आहे.
