अकोले शहराजवळ भांडणातून कारागिराचा खून! पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल; शहरात उडाली खळबळ..

नायक वृत्तसेवा, अकोले
शहरातील प्रवरा नदी पुलाजवळ गुरुवारी (ता.3) रात्री साडे नऊच्या सुमारास दरवाजे बनविणार्‍या कारागिराचा खून झाला आहे. मद्यधुंद अवस्थेत सहकारी कारागीर व त्याचा मित्र यांचे भांडण सोडविण्यास गेलेल्या कारागिराला गंभीर मारहाण झाल्याने त्याचा हकनाक बळी गेला आहे. शुक्रवारी (ता.4) सकाळी हा गंभीर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी अकोले पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अकोले शहरालगतच्या प्रवरा नदी पुलाजवळ दरवाजे तयार करणार्‍या दोन कारागिरांमध्ये भांडण सुरु होते. यावेळी सरबजीत ओमप्रकाश चौहान (मूळ रा.नटाई खुर्द, ता.रुधौली, जि.बस्ती, रा.उत्तर प्रदेश, हल्ली रा.अकोले) यास ‘तू मला मारहाण का केलीस, मी आता तुला सोडणार नाही’ असे म्हणून तेथे पडलेल्या लाकडी दांड्याने शंकर लहानू साळुंके (रा.कारखाना रोड, अकोले) याने सरबजीतच्या पाठीवर व डोक्यावर मारुन त्याला गंभीर जखमी केले. यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने सरबजीतचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे आदी अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर मयत कारागीर सरबजीत चौहानचा मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. या प्रकरणी राजू जगधारी राजभर (मूळ रा.मलकाणी, ता.सदर, जि.आझमगड, रा.उत्तर प्रदेश, हल्ली रा.देवठाण रोड, अकोले) याने दिलेल्या फिर्यादीवरुन अकोले पोलिसांनी आरोपी शंकर साळुंके याच्या विरोधात गुरनं. 47/2022 भादंवि कलम 302, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे करीत आहेत.

Visits: 75 Today: 1 Total: 1109930

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *