गीताव्रती डॉ.संजय मालपाणी यांना प्रतिष्ठेचा ‘गीता गौरव’ पुरस्कार! पुण्यात पार पडला वितरण सोहळा; तीन दशके गीतेच्या प्रचारासाठी केलेल्या कामाचा सन्मान..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तीन दशकांहून अधिक काळापासून वैश्विक पातळीवर गीतेचा प्रचार-प्रसार करणार्या, त्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जगभरातील लाखो साधकांना गीतेतील जीवनमूल्यांचा परिचय करुन देणार्या आणि गीतेतील तत्त्वज्ञानाचा सार असलेल्या पासष्ट पुस्तकांचे लिखाण करणार्या गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, गीताव्र्रती डॉ. संजय मालपाणी यांना अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘गीता गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून 98 वर्षांपूर्वी पुण्यात स्थापन झालेल्या गीता धर्म मंडळाच्यावतीने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. सोमवारी पुण्यात झालेल्या शानदार सोहळ्यात मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मुकुंद दातार यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

राष्ट्रसंत तथा श्रीराम जन्मभूमी न्यासाचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज व उद्योगपती (स्व) ओंकारनाथ मालपाणी यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या गीता परिवाराच्या माध्यमातून डॉ. संजय मालपाणी गेल्या 36 वर्षांपासून गीतेच्या प्रचार आणि प्रसारासाठी वैश्विक पातळीवर मोठे काम करीत आहेत. गीतेच्या प्रचारासाठी त्यांनी आपल्या अभिनव संकल्पनेतून गीता महोत्सव, संस्कार महोत्सव, योग महोत्सव यासारख्या लाखो विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या उपक्रमातून त्यांनी गीतेतील तत्त्वज्ञान आणि जीवनमूल्यांचा विद्यार्थ्यांना परिचय करुन दिला आहे.

गीतेतील जीवन सार सहज आणि सुलभ भाषेत समजावेत यासाठी आजवर डॉ. मालपाणी यांनी 65 पुस्तकांचे लिखाण केले असून गीतेवर आधारित योगेश्वर आणि विजयध्वज या महानाट्यांचीही प्रस्तुती केली आहे. कोविड संक्रमणाच्या कालावधीत संपूर्ण जगातील जनजीवन ठप्प झालेले असताना गीता परिवाराने ‘लर्न गीता’ हा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील अनोखा उपक्रम जगभरातील 136 देशांमध्ये राबविला. त्यासाठी पहिल्यांदाच विविध बारा भाषांमधून पाच लाखांहून अधिक साधकांना गीता पठणाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्याचे वैश्विक कार्यही त्यांच्या मार्गदर्शनाखाली केले गेले.

संस्कृत उच्चार धुद्ध आणि सुलभ व्हावे यासाठी त्यांच्या प्रेरणेतून गीता परिवाराने नवी पद्धतीही विकसित केली, त्यातून हजारो विद्यार्थ्यांच्या मनात संस्कृतविषयक आकर्षण निर्माण झाले. कोविडच्या कालावधीत त्यांनी सुरु केलेले गीता पठण प्रशिक्षण आजही सुरु असून गीता परिवाराचे साडेचार हजारांहून अधिक सदस्य दररोज अकराशे ऑनलाईन वर्गांच्या माध्यमातून चार स्तरात प्रशिक्षणाचे कार्य करीत आहेत. निःशुल्क सुरु असलेल्या या उपक्रमात गीता पठणाचे प्रशिक्षण घेणार्या साधकांना दर रविवारी गीतेतील उपदेशांचा अर्थ समजावून सांगण्यात येतो.

गीतेचे आपल्या दैनंदिन जीवनात कसे अनुसरण करावे याबाबत डॉ. संजय मालपाणी यांनी गेल्या दोन वर्षांत शेकडो व्याख्यानेही दिली आहेत. गीता या विषयावरील यू-ट्यूबवर असलेल्या त्यांच्या व्याख्यानांना लाखो श्रोत्यांची पसंती मिळते. डॉ. मालपाणी यांनी स्वतः गीता मुखोद्गत करुन गीताव्रती आणि शेकडो व्याख्याने देवून गीता विशारद या उपाध्याही प्राप्त केल्या आहेत. त्यांच्या या निरपेक्ष कार्याचा गौरव म्हणून पुण्यातील गीता धर्म मंडळाच्यावतीने अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘गीता गौरव’ पुरस्कार देवून त्यांचा सन्मान केला. पुण्यात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मंडळाच्या कार्याध्यक्षा विनया मेहेंदळे, प्राचार्य मुकुंद कोंढवेकर, प्रीती गंगाखेडकर आदिंसह गीताप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीमद् भगवद्गीता हा केवळ श्रीकृष्ण-अर्जुन यांच्यात झालेला रणांगणावरील संवाद नसून तो अखिल मानव जातीच्या जीवनमूल्यांचा सार आहे. मानवाचे संपूर्ण जीवनगीतेतील तत्त्वज्ञानावरच आधारित असून त्याच्या प्रचार व प्रसारासाठी पूज्य स्वामीगोविंददेव गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या गीता परिवाराच्या हजारो सदस्यांच्या समर्पित योगदानाला प्राप्त झालेला हा प्रसाद आहे.
– डॉ. संजय मालपाणी
राष्ट्रीय कार्याध्यक्ष – गीता परिवार

