रब्बीसाठी मुळाच्या डाव्या कालव्यातून आवर्तन सुटले
नायक वृत्तसेवा, राहुरी
मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शुक्रवारी (ता.15) सकाळी 11 वाजता शंभर क्यूसेकने रब्बीतील सिंचनासाठी आवर्तन सोडले. तर उजव्या कालव्यातून शनिवारी (ता.16) सायंकाळी सहा वाजता आवर्तन सोडले जाणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिली.
मुळा धरणात शुक्रवारी सकाळी सहा वाजता 21 हजार 179 दशलक्ष घनफूट (81.44 टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. सिंचनासाठी 15 जानेवारीपासून रब्बीतील पहिले आवर्तन सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झाला होता. त्यानुसार डाव्या कालव्यातून आवर्तन सुरू झाले. मात्र, उजव्या कालव्यावरील शाखाधिकारी, कालवा निरीक्षक व अन्य कर्मचार्यांची ग्रामपंचायत निवडणूक कामासाठी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे उजव्या कालव्याचे आवर्तन नियोजनाच्या एक दिवस उशिरा म्हणजे शनिवारी सायंकाळी सहा वाजता सुरू केले जाणार आहे, असे पाटील यांनी सांगितले. डाव्या कालव्याचे आवर्तन 30 दिवस, उजव्या कालव्याचे आवर्तन 40 दिवस चालेल, असेही पाटील म्हणाल्या.