शिवसेनेची स्वबळावर लढण्यासाठी चाचपणी! संपर्कप्रमुखांची संगमनेरात खलबते; आघाडीसाठी मात्र वरीष्ठांकडे बोट..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील संघटना मजबुत करण्यासह जुन्या व नव्या शिवसैनिकांना एकत्र आणणे महत्त्वाचे आहे. संगमनेरात शिवसेनेची मोठी ताकद आहे, त्या अनुषंगाने स्वबळावर लढण्याचा प्रसंग आला तर पक्ष सज्ज असला पाहीजे. त्यासाठी स्थानिक पदाधिकार्यांशी चर्चा करण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांसह अन्य निवडणुका एकत्रित लढवण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्याबाबत वरीष्ठ पातळीवरुनच निर्णय होणार आहे. मात्र त्याची वाट न पाहता शिवसैनिकांना निवडणुकांची तयारी करण्याबाबत सज्जता ठेवण्यास सांगण्यात आल्याचे संगमनेर विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख अजित व्हनोळे यांनी सांगितले.

मोठ्या कालावधीनंतर शिवसेनेने संघटनात्मक पदाधिकार्यांची फेररचना केली असून संगमनेर विधानसभा मतदारसंघासाठी अजित व्हनोळे यांची संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीनंतर शुक्रवारी (ता.3) ते पहिल्यांदाच संगमनेरात आले होते. यावेळी संगमनेर-अकोले विधानसभेचे समन्वयक आप्पा केसेकर, शहरप्रमुख (उत्तर) अमर कतारी, (दक्षिण) प्रसाद पवार, ज्येष्ठ शिवसैनिक जयवंत पवार, अमोल कवडे, विकास डमाळे, अमोल डुकरे, योगेश बिचकर, रिद्धेश खोले यांच्यासह शहरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भेटीत व्हनोळे यांनी जुन्या व नव्या शिवसैनिकांशी संवाद साधून त्यांच्यातील हेवेदावे संपवण्याचा प्रयत्न केला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून आगामी काळातील सर्वच निवडणुका एकत्रित लढवल्या जाणार की स्वतंत्र याबाबत शिवसैनिक संभ्रमात असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. मात्र महाविकास आघाडीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर होणार नसून शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि वरीष्ठ पदाधिकारी त्याबाबतच लवकरच घोषणा करतील असे त्यांनी सांगितले. मात्र आघाडी होईल किंवा नाही याचा विचार न करता संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि वेळ आलीच तर स्वबळावर लढण्यासाठी आपली सज्जता आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

संगमनेर शहरात शिवसेनेची चांगली ताकद आहे. त्याचा योग्य वापर केल्यास सेनेला त्याचा फायदा होईल. त्यासाठी एकविचाराने काम करण्याची गरज आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार लोकाभिमुख काम करीत आहे. सरकारने शेतकरी, मजूर व उद्योगासाठी घेतलेल्या चांगल्या निर्णयांना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संयमीनेते म्हणून ठळकपणे राज्याच्या समोर आले आहेत. आगामी निवडणुकांमध्ये ही शिवसेनेची जमेची बाजू असल्याचे सांगतांना त्यांनी महाविकास आघाडीच्या नेतृत्त्वात लढायचे की स्वतंत्र याचा निर्णय पक्षावर सोडा व आपली ताकद एकजूट करण्याच्या कामाला लागा असा स्पष्ट संदेश उपस्थित शिवसैनिकांना दिला.

संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच संगमनेरात आलेल्या अजित व्हनोळे यांनी शासकीय विश्रामगृहात शहरातील जुन्या आणि नव्या शिवसैनिकांशी व्यक्तिगत पातळीवर चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी काही शिवसैनिकांनी आगामी निवडणुकांबाबतही भाष्य केले. त्या सर्वांचे म्हणणे ऐकून घेताना आपापसातील मतभेद विसरुन जोमाने काम करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी आगामी सर्व निवडणुकांमध्ये पक्षाला अधिकाधिक जागा मिळवून देण्यासाठी एकदिलाने काम करणार असल्याची प्रतिक्रीया उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केली.

