संगमनेर तालुक्यातील रुग्ण बरे होण्याची सरासरी वाढली! गेल्या आठ दिवसांत आठ कोविड मृत्यु होवूनही मृत्युदरातही झाली घट
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यात दररोज मोठ्या प्रमाणात कोविडचे रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे तालुक्यात कोविडची दहशत निर्माण झाली असून सामान्य माणसांच्या मनात उपचारांबाबत भिती निर्माण झाली आहे. मात्र लागण झालेल्या रुग्णाने वेळीच रुग्णालयात जावून उपचार घेतल्यास कोविडचा सहज पराभव होवू शकतो याचे मोठे चित्रही संगमनेरकरांसमोर उभे राहीले आहे. गेल्या 1 सप्टेंबरपासून तालुक्यातील कोविडचा प्रादुर्भाव वाढला आहे, मात्र त्याच वेळी बरे होणार्या रुग्णांच्या सरासरीतही भरीव वाढ झाल्याने ‘संगमनेर-अकोलेकरांनो घाबरुन जावू नका, फक्त काळजी घ्या आणि लक्षणं दिसल्यास तात्काळ रुग्णालयात दाखल व्हा’ असे सांगण्याची वेळ आली आहे.
गेल्या महिन्यात अगदी सुरुवातीपासूनच सण-उत्सवांना सुरुवात झाल्याने तालुक्यातील कोविडची स्थिती अधिक व्यापक होण्याचा पूर्वअंदाज होता, आणि त्यानुसार घडलेही. जुलैमध्ये सरासरी 21 रुग्ण प्रतीदिवस या गतीने तालुक्याच्या रुग्णसंख्येत 650 रुग्णांची नव्याने भर पडली. मात्र त्यानंतर उगवलेल्या ऑगस्टमध्ये विविध सण व उत्सव आल्याने कोविडचे संक्रमण काही प्रमाणात वाढेल असाच प्रशासनासह आरोग्य यंत्रणांचा कयास होता. ऑगस्टच्या सुरुवातीच्या 20 दिवसांत जवळपास घडलेही अपेक्षेप्रमाणेच.
गेल्या महिन्यात 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या कालावधीत संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत साधारणतः 26, 20, 14, 23, 28, 41, 17, 45, 33 व 18 यानुसार सरासरी प्रत्येक दिवशी 26.5 या प्रमाणे 265 रुग्णांची भर पडली. या दरम्यान 4 ऑगस्टरोजी निमोण येथील 75 वर्षीय इसम, 6 ऑगस्टरोजी मालदाडरोड येथील 81 वर्षीय वयोवृद्ध नागरिक व 8 ऑगस्टरोजी कर्हे येथील 55 वर्षीय इसमाचा मृत्युही झाला. पहिल्या दहा दिवसांत रुग्णवाढीची सरासरी गती 26.5 होती.
त्यानंतरच्या दुसर्या दहा दिवसांत 11 ते 20 ऑगस्ट दरम्यानही रुग्णवाढीत किंचित वाढ होवून 42, 30, 19, 39, 28, 30, 26, 15, 19 व 38 या प्रमाणे प्रती दिवस 27.55 गतीने 286 रुग्णांची भर पडली. या कालावधीत 17 ऑगस्टरोजी कुंभारआळा येथील 65 वर्षीय इसम, 20 ऑगस्टरोजी चिंचोली गुरव येथील 94 वर्षीय वयोवृद्धासह संगमनेर खुर्द येथील 44 वर्षीय तरुणाचा बळीही गेला. ऑगस्टच्या पहिल्या 20 दिवसांत तालुक्याच्या रुग्णसंख्येत 551 रुग्णांची भर पडल्यानंतर नंतरच्या अकरा दिवसांत गणेशोत्सव व मोहरमसारखे महत्वाचे सण-उत्सव साजरे झाले.
21 ऑगस्टला सोनुशी येथील 51 वर्षीय महिलेच्या मृत्युसह 13, 30, 20, 22, 36, 84, 38, 42, 61, 48 आणि 16 याप्रमाणे तालुक्यातील रुग्णवाढीला चढत्याक्रमाने गती मिळाली. या अकरा दिवसांतील रुग्णवाढीची सरासरी 37.27 टक्के म्हणजे आधीच्या सरासरीपेक्षा तब्बल दहा रुग्ण दररोज अधिक अशा पद्धतीने वाढल्याचे स्पष्ट दिसून येते. या कालावधीत तालुक्याच्या रुग्णसंख्येत तब्बल 410 रुग्णांची भर घालीत संपूर्ण ऑगस्टचा महिना सरासरी दररोज 31 रुग्णांची भर घालीत 961 रुग्ण वाढवणारा आणि सात जणांचे बळी घेणारा ठरला.
31 ऑगस्टरोजी तालुक्यातील एकुण बाधितांची संख्या 1 हजार 720 होती. त्यात शहरातील 691 तर ग्रामीण भागातील 1 हजार 29 रुग्णांचा समावेश होता. या कालावधीत 1 हजार 405 रुग्णांनी उपचार पूर्ण करुन घर गाठले, 31 ऑगस्टरोजी तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण 81.69 टक्के, तर मृत्युचा सरासरी दर 1.51 टक्के होता.
ऑगस्टच्या शेवटच्या दहा दिवसांमध्ये सुरु झालेल्या रुग्णवाढीचा सिलसिला सप्टेंबरने पहिल्या दिवसांपासूनच स्विकारला, धक्कादायक बाब म्हणजे या महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच कोविड बळी जाण्यासही सुरुवात झाली. या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून दृष्टीक्षेप टाकला असता 1 सप्टेंबररोजी माळीवाड्यातील 70 वर्षीय इसमाच्या मृत्युसह 42 रुग्णांची भर, 2 सप्टेंबर रोजी समनापूर येथील 62 वर्षीय इसमाच्या मृत्युसह 37 रुग्णांची भर, 3 सप्टेंबररोजी मालदाड येथील 35 वर्षीय तरुणासह 16 रुग्णांची भर, 4 सप्टेंबररोजी 80 रुग्णांची विक्रमी भर, 5 सप्टेंबररोजी चंदनापूरी येथील 39 वर्षीय तरुणाच्या मृत्युसह 66 रुग्णांची भर, 6 सप्टेंबररोजी गिरीराजनगरमधील 59 वर्षीय इसम, चिखलीतील 76 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 80 वर्षीय इसम व शहरातील पंपींग स्टेशनजवळील 73 वर्षीय महिला अशा एकुण चार जणांचे बळी जावून रुग्णसंख्येत 41 बाधितांची वाढ झाली, सोमवारी 52 रुग्णांची तर मंगळवारी 30 रुग्णांची भर पडली.
त्यामुळे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सुरु झालेले कोविडच्या रुग्णवाढीचे आणि मृत्युचे तांडव सप्टेंबरनेही जसेच्या तसे स्विकारल्याचे दिसून आले. गेल्या आठच दिवसांत तालुक्यातील रुग्णसंख्येत सरासरी 45.5 रुग्ण प्रती दिवस या गतीने तब्बल 364 रुग्णांची भर पडली, तर दररोज एक या प्रमाणे दोन महिलांसह आठ जणांचा बळीही गेला. मात्र दिलासादायक बाब म्हणजे तालुक्यातील रुग्णसंख्या 2 हजार 85 वर पोहोचली असली तरीही प्रत्यक्षात त्यातील केवळ 269 रुग्ण सक्रीय संक्रमित असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.
आजवर 1 हजार 785 रुग्णांना उपचारांती घरी सोडण्यात आले असून आजच्या स्थितीत रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण 85.69 टक्क्यांवर पोहोचले आहे. मध्यंतरीच्या दोन दिवसांत यात आणखी वाढ होवून हेच प्रमाण 89.39 टक्क्यांवर गेले होते. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या एकसारखी वाढती असली तरीही शहरातील आरोग्य व्यवस्था सज्ज असून अद्यापपर्यंत कोणत्याही रुग्णाची उपचारांसाठी परवड झाल्याचे एकही उदाहरण तालुक्यातून समोर आलेले नाही. त्यामुळे कोविडला न घाबरता संगमनेरकरांनी केवळ मुखपट्टी, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर या नियमांचे पालन केल्यास कोविडची भिती बाळगण्याचे कोणतेही कारण शिल्लक राहणार नाही.
संगमनेर शहरासह तालुक्यातील विविध गावांमधून आत्तापर्यंत 8 हजार 150 जणांची स्त्राव चाचणी करण्यात आली आहे. त्यातील 3 हजार 399 शासकीय प्रयोगशाळेकडून, 3 हजार 314 रॅपिड अँटीजेन चाचणीतून तर 1 हजार 237 खासगी प्रयोगशाळेकडून तपासण्यात आले आहेत. तालुक्यातील चाचणी केलेल्या एकुण संशयितातून संक्रमित अहवाल येण्याचे प्रमाण 25.55 टक्के आहे. सद्यस्थितीत तालुक्याची रुग्णसंख्या 2 हजार 85 असून त्यात 765 रुग्ण शहरातील तर 1 हजार 320 रुग्ण ग्रामीणभागातील आहेत. आजच्या स्थितीत तालुक्यात प्रती दिवस 45.5 या दराने रुग्णवाढ होत आहे. तर ऑगस्टमध्ये सात जणांचा मृत्यु होवूनही सरासरी दर 1.51 टक्के होता, आजच्या स्थितीत गेल्या आठ दिवसांत दररोज एक मृत्यु होवूनही तो 1.44 टक्क्यांवर आला आहे.