संगमनेरच्या अकोलेनाक्याला सूर्यवंशी टोळीचे ग्रहण! भररस्त्यात जीव घेण्याचा प्रयत्न; दोन दिवसांनंतरही ‘टोळी’ फरारच..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शारदा शिक्षण संस्था, भारतीय आयूर्विमा कंपनी आणि जाजू पेट्रोल पंप यामुळे सतत वर्दळीचा परिसर म्हणून ओळखला जाणारा अकोलेनाका सध्या एकामागून एक घडणार्‍या गुन्हेगारी घटनांनी चर्चेत आला आहे. शनिवारी सायंकाळी ऐनगर्दीच्या वेळी पोलिसांच्या अवकृपेने नावारुपाला आलेल्या सूर्यवंशी टोळीतील चौघांनी एकाला भररस्त्यात गाठून दगडांनी ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. अकोल्याकडे जाणार्‍या म्हाळुंगी पुलाच्या तोंडावरच जवळपास अर्धातास सुरु असलेला हा प्रकार म्हणजे गुन्हेगारांना पोलिसांचा कोणताही धाक नसल्याचे दाखवणारा होता. या मारहाणीत गंभीर जखमा होवून रक्तबंबाळ झालेला नीलेश मंडलिक हा तरुण मारहाण सुरु असताना जीवाच्या आकांताने मदतीची याचना करीत होता. जमलेल्या शेकडों बघ्यांमधील दोघा-चौघांनी त्याला प्रतिसाद देण्याचाही प्रयत्न केला. मात्र या टोळीने त्यांनाही ठार मारण्याचा दम भरल्याने मदतीसाठी पुढे गेलेली पावलं पुन्हा माघारी फिरली. अखेर मार खाणारा अतिरक्तस्रावाने जमीनीवर कोसळल्यानंतर अकोलेनाक्यावर निर्माण झालेली सूर्यवंशी टोळी तेथून राजरोसपणे पसार झाली. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या अतिशय गंभीर घटनेचा गुन्हा दाखल करणार्‍या शहर पोलिसांना मात्र अद्यापही आरोपींचा ठावठिकाणा शोधता आलेला नाही.


याबाबत जखमी तरुणाच्या मामेभावाने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार शनिवारी (ता.19) सायंकाळी साडेसातच्या सुमारास जाजू पेट्रोल पंपासमोरच सदरचा प्रकार घडला. तक्रारदार सचिन नाईक आपल्या दुचाकीवरुन संगमनेरच्या दिशेने येत असताना पंपासमोर त्यांच्या मामाचा मुलगा नीलेश सोमनाथ मंडलिक (वय 36, रा.ढोलेवाडी) हा मोठमोठ्याने ओरडून मदत करण्याची विनंती करीत असल्याचे त्यांना दिसले. यावेळी गर्दीत डोकावून पाहीले असता अकोलेनाक्यावरील अनिकेत मंडलीक, साई सूर्यवंशी, अक्षय चव्हाण व एक अनोळखी तरुण असे चौघे त्याला दगड हातात घेवून मारीत असल्याचे व त्यात तो रक्तबंबाळ झाल्याचे त्यांना दिसले. यावेळी बघ्यांच्या भूमिकेत असलेल्या शेकडोंच्या जमावातील दोघा-चौघांनी त्याच्या मदतीला जाण्याचा प्रयत्न केला असता त्या टोळीने त्यांच्या अंगावरच धावून जात ‘जर कोणी मधे पडला तर त्यालाही मारुन टाकू’ अशी धमकी भरल्याने मदतीसाठी धावलेली मंडळी मागे सरली आणि बाकीची पळू लागली.


सूर्यवंशी टोळीच्या दहशतीचा हा प्रकार सुरु असताना आसपासच्या दुकानदारांनी लागलीच शटर खाली करुन तेथून पळ काढला. हे सगळं पाहून उन्माद चढलेल्या त्या टोळीने त्यानंतर पुन्हा आपले लक्ष नीलेश मंडलिक याच्याकडे वळवून ‘आज याला सोडूच नका, मारुनच टाका’ असे म्हणत पुन्हा मारहाण करायला सुरुवात केली. या दरम्यान खाली कोसळलेल्या नीलेश मंडलिकच्या डोक्यात दगड घालण्यासाठी ते चौघेही पुढे सरसावत असताना बघ्यांमधील काहींनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली, या घटनेदरम्यान चारही बाजूने येणारी वाहतूक ठप्प झाल्याने हॉर्नचा आवाजही सुरु झाला. त्यामुळे घाबरलेली सूर्यवंशी टोळी तेथून पसार झाली. त्यानंतर जखमीच्या मामेभावासह काहींनी त्याला रुग्णावाहिकेद्वारा तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले.


शहर पोलीस ठाण्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या अकोलेनाका परिसरात जवळपास अर्धातास हा प्रकार सुरु होता. मात्र त्याची साधी भणकही पोलिसांना लागली नाही. गंभीर जखमी झालेल्या नीलेश मंडलिकला खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर ‘सायरन’ वाजवित पोहोचलेल्या पोलिसांना नेमकी घटना समजायलाही परिश्रम घ्यावे लागले. त्याचे कारणही तसेच आहे. गेल्याकाही वर्षात या भागात छोट्या-मोठ्या चोर्‍या, दमदाट्या करुन वाटमारीच्या घटनांमधून हिम्मत वाढलेल्या सूर्यवंशी टोळीने पंपापासून साईमंदिराकडे जाणार्‍या अंधार्‍या वाटेसह आता पंपासमोरील चौकातही उघड दहशत निर्माण केली आहे. घातक शस्त्र बाळगून वारंवार तेथील व्यापार्‍यांना दमबाजी करण्याचे प्रकार आणि काहींना भरचौकात रक्तबंबाळ होईस्तोवर मारहाण करण्याच्या घटनेतून या टोळीने मोठी दहशत निर्माण केली असून डोळ्यादेखत घडलेल्या घटनाही पोलिसांना सांगण्यास कोणी धजावत नाही.


या प्रकरणात शहर पोलिसांनी जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह घातक शस्त्रांचा वापर करुन जबर मारहाण करणे, फौजदारी धाकदपटशा निर्माण करुन शांततेचा भंग करणे अशा कारणांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम 109, 118 (1) (2), 352, 351 (2), 3 (5) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. विशेष म्हणजे या भागात राजरोसपणे वावरणारी आणि मनाला वाटेल त्यांच्यावर दहशत निर्माण करणारी सूर्यवंशी टोळी गुन्हा दाखल होवून दोन दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती लागलेली नाही. यावरुन या टोळीला पोलिसांचेच समर्थन असल्याच्याही चर्चा आता परिसरातून कानावर येवू लागल्या आहेत.


गेल्याकाही वर्षात अतिशय शांत परिसर म्हणून ओळखल्या जाणार्‍या अकोलेनाक्याला सूर्यवंशी टोळीचे ‘ग्रहण’ लागले आहे. सुरुवातीला पालिका कार्यालयाच्या पाठीमागून काठेमळ्यात जाणार्‍या रस्त्यावर वाटमारीने सुरु झालेले या टोळीचे कारनामे नंतर राज पॅलेसपासून साईनगरकडे जाणार्‍या रस्त्यापर्यंत पोहोचले. वेताळमळा परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यासारखे प्रकारही या टोळीच्या नावावर आहेत. शिवाय पेट्रोलपंपाच्या समोरच या टोळीकडून अनेकांना बेदम मारहाण करण्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. आता त्यात भररस्त्यात चारही बाजूची वाहतूक थांबवून शेकडो बघ्याच्या उपस्थितीत थेट एकाचा जीव घेण्याचा प्रयत्न या टोळीची परिसरातील दहशत अधोरेखीत करणारा असून पोलिसांनी या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Visits: 106 Today: 2 Total: 1104848

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *