राजहंस दूध संघाकडून कायम चांगल्या भावासह रिबेट ः देशमुख देवकौठे येथील जगदंबा दूध संस्थेत राजहंस मेडिकलचा शुभारंभ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील दूध व्यवसायाला मोठी बळकटी दिली आहे. मोठ्या कष्टातून निर्माण झालेल्या या व्यवसायाने ग्रामीण भागातील कुटुंब समृद्ध झाली. मात्र खासगी दूध संघावाले थोडे आमिष दाखवतात त्यांच्या आमिषाला बळी न पडता सहकारावर सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे. दुधाचा तालुका ही सहकारातून ओळख निर्माण झाली असून संगमनेर दूध संघाने उत्पादकांना कायम चांगल्या भावासह रिबेट दिले असल्याचे प्रतिपादन राज्य दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथे संगमनेर तालुका सहकारी दूध संघाच्यावतीने जगदंबा सहकारी दूध संस्थेत सुरू केलेल्या राजहंस मेडिकलच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी बाजार समितीचे संचालक भारत मुंगसे होते. तर व्यासपीठावर लक्ष्मण कुटे, भागवत आरोटे, महेंद्र गोडगे, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, हौशीराम सोनवणे, बाबासाहेब कांदळकर, विलास कवडे, विलास वर्पे, विष्णू ढोले, संतोष मांडेकर, संजय पोकळे, रवींद्र रोहम, गोरख नवले, साहेबराव गडाख, सचिन दिघे, दूध संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मुंगसे, उपाध्यक्ष नामदेव आरोटे, नंदू मोकळ, राजेंद्र कहांडळ, दत्तू मुंगसे, संचालक अनिल गाजरे, विलास मुंगसे, रामनाथ शेवकर, शत्रुघ्न मुंगसे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना रणजीतसिंह देशमुख म्हणाले, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात दूध व्यवसाय भरभराटीला आला आहे. आज तालुक्यात सुमारे सात लाख लिटर दूध उत्पादन होत आहे. अडचणीच्या काळात दूध संघ शेतकर्यांच्या पाठिशी उभा राहिला. पिढ्यानपिढ्या जपलेल्या हा दूध व्यवसाय आहे. मात्र आता खासगीवाले येतात आणि एक-दोन रुपयाची आमिषं दाखवतात. ते नफा कमविण्यासाठी येत असतात, त्यामुळे त्यांच्या आमिषाला बळी पडू नका. सहकार हेच आपले भविष्य असून सहकारी संस्था आपण जपल्या पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर विलास मुंगसे यांनी आभार मानले.
