‘मैं तुझसे प्यार करता हूं’ म्हणत तरुणीचा विनयभंग! शहरातील मुली असुरक्षित; ‘दामिनी’ पथक निष्क्रिय असल्याचा परिणाम..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर महाविद्यालयात शिकणार्या एका एकवीसवर्षीय विद्यार्थिनीचा गेल्या महिनाभरापासून पाठलाग करणार्या रोडरोमिओने गुरुवारी भररस्त्यात तिचा हात पकडून तिला मारहाण करण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी फरहान सय्यद नावाच्या रोमिओ विरोधात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र या घटनेला तीस तासांचा कालावधी उलटूनही आरोपीला अद्यापही अटक झालेली नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात सर्वत्र दामिनी पथकांकडून प्रभावी काम होत असताना संगमनेर शहर मात्र त्याला अपवाद ठरल्याने शहरातील महिला व विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या घटना वाढत असल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची संतापजनक घटना गुरुवारी (ता.18) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अतिशय गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ घडली. या घटनेत मोमीनपुरा भागात राहणारी व सध्या संगमनेर महाविद्यालयात शिक्षण घेणारी एकवीसवर्षीय विद्यार्थिनी बसस्थानकाकडे पायी जात असताना फरहान सय्यद (रा.अलकानगर) याने तिला भररस्त्यात अडवले. यावेळी त्याने ‘मैं तुझसे प्यार करता हूं’ असे म्हणत तिचा हात पकडला. त्याच्या या कृत्याला विरोध करीत ‘मुझे तेरे साथ कोई बात नहीं करनी’ असे प्रत्त्युत्तर तिने दिल्याने राग अनावर झालेल्या त्या रोमिओने भर रस्त्यात तिला मारहाण केली.

यावेळी दोघांमध्ये हमरीतुमरी झाल्यानंतर आसपासचे लोकं गोळा होवू लागल्याने फरहान नावाच्या रोमिओने ‘तुझं कोणाशी तरी लफडं आहे, थांब तुझ्या आई-वडीलांनाच सांगतो’ असे सांगत आपली तिच्याशी ओळख असल्याचे जमलेल्या लोकांना भासवण्याचा एकप्रकारे तिला धमकावण्याचाही प्रयत्न केला. त्याच्या या कृत्याला घाबरलेल्या ‘त्या’ निष्पाप विद्यार्थिनीने अखेर तेथूनच माघारी घरी जात घडला प्रकार आणि त्यापूर्वी महिनाभरापासून सुरु असलेला त्याचा त्रास आपल्या पित्याला सांगितला. हा प्रकार सहन केला तर मुलीची सुरक्षा धोक्यात येईल असे ताडून त्यांनीही त्या रोमिओ विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा मनोदय केला आणि त्यांनी आपल्या मुलीसह पोलीस ठाण्यात येवून घडल्या घटनेची नोंद केली.

त्यानुसार गेल्या महिनाभरापासून फरहान सय्यद नावाचा हा टवाळखोर सदर विद्यार्थिनीचा दररोज पाठलाग करीत असल्याचे आणि संगमनेर महाविद्यालयाच्या रिक्षा थांब्यावर थांबून तिला सतत त्रास देत असल्याचेही समोर आले. मात्र आपल्या आई-वडीलांनी आपल्याला विश्वासाने शिक्षणाची संधी दिल्याची तिला पूर्ण जाणीव असल्याने तिने असल्या फालतू गोष्टींकडे दुर्लक्ष केले होते. त्याचा परिपाक गुरुवारी (ता.18) त्या रोमिओची पशूता समोर येण्यात झाला आणि त्याने भररस्त्यात तिच्यासोबत संतापजनक प्रकार केला. पीडितेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अलका नगरमधील फरहान सय्यद या टवाळखोराविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 354, 354 (ड) (1), 323, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला, मात्र या घटनेला 30 तासांहून अधिक काळ उलटूनही त्याला मात्र अद्याप अटक करण्यात आली नाही. यावरुन पोलिसांची विद्यार्थीनींच्या प्रति असलेली संवेदनाही ठळक झाली आहे.

वास्तविक महिला व मुलींना सार्वजनिक ठिकाणी निर्भयतेने वावरता यावे यासाठी राज्य सरकारने ‘दामिनी’ पथकांची निर्मिती करुन त्यासाठी स्वतंत्र अधिकारी व वाहनाचीही व्यवस्था करुन दिली आहे. राज्यात अनेक ठिकाणी या पथकांनी पथदर्शी काम करुन आदर्श निर्माण केला असताना संगमनेरात मात्र या पथकाचे अस्तित्वच शोधण्याची वेळ आली आहे. या पथकाच्या निष्क्रियतेमुळे मनोबल उंचावलेल्या टवाळखोर व रोडरोमिओंच्या टोळ्यांकडून शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थिनींच्या छेडछाडीसह त्यांचा पाठलाग करण्याच्या घटनांमध्येही अलिकडे मोठी वाढ झाली असून शिक्षण आणि इभ्रत वाचवण्यासाठी बहुतेक मुली तक्रार करीत नसल्याचेही वारंवार समोर येत आहे.

