संगमनेर नगरपरिषदेची प्रारुप प्रभारचना प्रसिद्ध! नवीन कायद्यानुसार कारवाईचे आदेश नाहीत; इच्छुकांची धाकधूक वाढली….

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील मागस प्रवर्गाच्या राजकीय आरक्षणावरुन सुरु असलेला गोंधळ अजून संपलेला नसतांना राज्य निवडणुक आयोगाने यापूर्वीच बजावलेल्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने कार्यवाही सुरु केली आहे. गेल्या 22 फेबु्रवारीरोजी आयोगाने मुंबई शहर व उपनगरे वगळता उर्वरीत महाराष्ट्रातील 208 नगरपरिषदांसाठी निवडणूकीची पूर्वतयारी म्हणून प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. ठरल्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्याबाबत सर्व जिल्हाधिकार्यांना आदेशीतही करण्यात आले होते. त्यानुसार आज जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांची प्रारुप प्रभागरचनेची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यात संगमनेर नगरपालिका हद्दितील पंधरा प्रभागांचाही समावेश असून आजपासून पुढील सात दिवसांत प्रभागांच्या भौगोलीक हद्दिंबाबत नागरिकांना सूचना व हरकती नोंदविता येणार आहेत.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात निर्माण झालेला पेच अद्यापही कायम आहे. राज्य सरकारने आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका न घेण्याचा मनोदय व्यक्त करतांना मध्यप्रदेशच्या धर्तीवर प्रभागाच्या आरक्षण, आराखड्यांसह निवडणूकांसंदर्भात काही अधिकार राज्य सरकारकडे घेण्याचा कायदाही पास केला आहे. मात्र त्या कायद्यानुसार कारवाई करण्याबाबत अथवा राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वीच 22 फेब्रुवारीरोजी बजावलेल्या आदेशानुसार आरक्षणाचा विषय संपपर्यंत निवडणूक विषय कारवाई न करण्याचे कोणतेही आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच प्राप्त आदेशानुसार सुरु असलेलेी कारवाई कायम ठेवली आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रारुप प्रभागरचनेचा प्रस्ताव (प्रभाग संख्या, प्रभागनिहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीची 2011 च्या जनगणननेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन व नकाशासह) पूर्ण करुन त्या-त्या पालिकांचे मुख्याधिकारी 2 मार्चपर्यंत जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव दाखल करतील. 7 मार्चपर्यंत जिल्हाधिकारी प्रारुप प्रभागरचनेस मान्यता देतील. 10 मार्चरोजी त्यावरील हरकती मागवण्यासाठी जाहिरात करुन 17 मार्चपर्यंत हरकती मागवल्या जातील. 22 मार्च रोजी जिल्हाधिकारी त्यावर सुनावणी घेतील. 25 मार्चपर्यंत त्या हरकती व सूचनांवर आपल्या अभिप्रायासह राज्य निवडणुक आयोगाला अहवाल सादर करतील. 1 एप्रिल 2022 रोजी राज्य निवडणुक आयोग अंतिम प्रभाग रचनेला मान्यता देईल व 5 एप्रिल रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल. असा कालबद्ध कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाने आखला आहे व सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेशही बजावण्यात आले होते.

त्यानुसार संगमनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांनी आज (ता.10) सन 2022 मध्ये होणार्या निवडणूकीच्या अनुषंगाने प्रभारचनेचे प्रारुप प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रभाग क्र. एकमध्ये एकूण 4 हजार 136 रहिवासी असून श्रमिकनगर, गोविंदनगर व गणेशनगर परिसराचा यात समावेश आहे. प्रभाग क्र.दोनची लोकसंख्या 4 हजार 27 असून त्यात ऑरेंज कॉर्नर, सुयोग सोसायटी, भारतनगर, स्वामी समर्थ नगर व सिद्धीविनायक सोसायटीचा समावेश आहे. प्रभाग क्र.तीनमध्ये 4 हजार 438 नागरिकांचा रहिवास असून या प्रभागात मालदाड रोड, आदर्श कॉलनी, आनंद नगर व सौभाग्य मंगल कार्यालयाच्या परिसराचा समावेश आहे.

प्रभाग क्र.चारमध्ये 4 हजार 299 नागरीक राहतात. या प्रभागात कुरणरोड, गुंजाळ आखाडा, पानसरे आखाडा, पंचायत समिती, पाबळे वस्ती व जब्बार मळ्याचा समावेश आहे. प्रभाग क्र. पाचची लोकसंख्या 4 हजार 159 असून त्यात शिवाजीनगर, पद्मनगर, स्वप्ननगरी, क्रांती चौक व आशीर्वाद पतसंस्थेच्या परिसराचा समावेश आहे. प्रभाग क्र.सहामध्ये 4 हजार 169 नागरीक असून या प्रभागात जनतानगर आणि चैतन्य नगरचा संपूर्ण परिसर येतो. प्रभाग क्र.सातमध्ये 4 हजार 124 नागरीक असून या प्रभागात इंदिरानगर परिसरातील सर्व गल्ल्यांचा समावेश आहे.

प्रभाग क्र.आठमध्ये 4 हजार 720 नागरीकांचा रहिवास असून त्यात देवाचा मळा, सावतामाळी नगर, बसस्थानक, पंजाबी कॉलनी, वकील कॉलनी, अभंग मळा व शारदा विद्यालयाचा परिसर आहे. प्रभाग क्र.नऊमध्ये एकूण 4 हजार 433 नागरीकांचा रहिवास असून या प्रभागात नवीन नगर रोड, लिंक रोड, ताजणे मळा, नवघर गल्ली व अरगडे गल्लीचा परिसर आहे. प्रभाग क्र. दहामध्ये 4 हजार 128 नागरीक असून भारतनगर, रहेमतनगर, अलकानगर, काठे मळा, मौलाना आझाद मंगल कार्यालय व गलांडे मळा परिसराचा या प्रभागात समावेश आहे.

प्रभाग क्र.अकरामध्ये 4 हजार 568 नागरीकांचा रहिवास असून या प्रभागात देवीगल्ली, घासबाजार, उपासणी गल्ली, तेलिखुंट व लखमीपूरा भागाचा समावेश आहे. प्रभाग क्र. बाराची लोकसंख्या 4 हजार 549 असून त्यात गांधी चौक, कोष्टी गल्ली, अशोक चौक, मेनरोड, बाजार पेठ, पानसरे गल्ली, स्वामी विवेकानंद चौक, साईनाथ चौक, वडगल्ली, भागवत वाडा व कुंभार आळ्याचा समावेश आहे. शहरातील सर्वात जास्त लोकसंख्येचा प्रभाग ठरलेल्या क्रमांक तेराची लोकसंख्या 4 हजार 904 इतकी असून त्यात घोडेकर मळा, साईनगर, पंपींग स्टेशन, चव्हाणपूरा, जेधे कॉलनी, वाल्मीकी-आंबेडकर वसाहत व स्वामी समर्थ मंदिराचा परिसर आहे.

प्रभाग क्रमांक चौदामध्ये 4 हजार 249 नागरीक राहातात. या प्रभागात रंगारगल्ली, चंद्रशेखर चौक, पेटिट विद्यालय, खंडोबागल्ली, वाडेकर गल्ली, परदेशपुरा व अॅग्लो उर्दु शाळेचा परिसर समावीष्ट आहे. शेवटचा प्रभाग क्रमांक पंधराही लोकसंख्येच्या बाबतीत दुसर्या स्थानी असून या प्रभागात एकूण 4 हजार 901 नागरीक राहातात. यामध्ये नाईकवाडपूरा, डाकेमळा, जोर्वे रोड, यंग नॅशनल स्पोर्टस ग्राऊंड, पुणे नाका व अमरधाम परिसराचा समावेश आहे. या प्रमाणे प्रभागांची रचना करण्यात आली असून त्याचे प्रारुप स्वरुप प्रसिद्ध करण्याची अधिसूचना जाहीर झाली आहे. त्यानुसार पुढील सात दिवसांत 17 मार्चपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत नागरीकांना प्रभाग रचनेच्या भौगोलीक सीमेबाबत हरकती अथवा त्या अनुषंगाने सूचना करता येतील. 22 मार्चपासून जिल्हाधिकारी त्यावर सुनावणी घेतील.

ओबीसी आरक्षणाचा संभ्रम कायम असतांना निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात 22 फेब्रुवारी रोजी प्रारुप प्रभाग रचनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करुन त्याची अंमलबजावणी करण्याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना आदेश दिले होते. अचानक आलेल्या या आदेशाने इच्छुकांची धावपळ उडाली होती, त्यातच सर्वोच्च न्यायालयाने राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल नाकारल्याने पुन्हा साशंकता वाढली. राज्य सरकारने ओबीसींची नाराजी टाळण्यासाठी त्यावर कायदा आणला व बहुमताने तो संमतही केला. मात्र त्याची अंमलबजावणी करावी अथवा राज्य निवडणूक आयोगाच्या यापूर्वीच्या आदेशाचे पालन न करण्याबाबत प्रशासनाला कोणतेही आदेश नसल्याने पूर्वीच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रीया सुरु आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला असून इच्छुकांची धाकधूकही वाढली आहे.

