शनिशिंगणापूर देवस्थानच्या अध्यक्षपदी भागवत बानकर उपाध्यक्षपदी विकास बानकर तर कोषाध्यक्षपदी दीपक दरंदले
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील श्री शैनेश्वर देवस्थानच्या अध्यक्षपदी भागवत बानकर, उपाध्यक्षपदी विकास बानकर, कोषाध्यक्षपदी दीपक दरंदले, सरचिटणीसपदी बाळासाहेब बोरुडे आणि चिटणीसपदी आप्पासाहेब शेटे यांची शुक्रवारी (ता.8) निवड करण्यात आली आहे.
शुक्रवारी शैनेश्वर मंदिर सभागृहात सकाळी 10 वाजता नवीन विश्वस्तांच्या झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून नूतन विश्वस्त मंडळाची कार्यकारिणी जाहीर झाली होती. राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नांमुळे शनिशिंगणापूर गावातीलच नागरिकांमधूनच विश्वस्त मंडळाची निवड करण्यात आली. याबद्दल सर्व ग्रामस्थांनी निर्णयाचे स्वागत करून मंत्री गडाख यांचे आभार मानले. मागील महिन्यात अहमदनगरच्या सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी सर्व अर्जदारांच्या मुलाखती घेऊन 23 डिसेंबर रोजी 11 नवीन विश्वस्तांची निवड जाहीर केली होती. यात दरंदले आडनाव असलेले तीन तर शेटे व बानकर आडनाव असलेले दोन व इतर आडनाव असलेले चार विश्वस्त निवडण्यात आले होते. माजी सरचिटणीस दीपक दरंदले यांनी बोलविलेल्या बैठकीत अध्यक्ष बानकर यांच्या नावाची सूचना आप्पासाहेब शेटे यांनी केली; त्यास विकास बानकर यांनी अनुमोदन दिले. या सर्व नूतन पदाधिकार्यांचे मंत्री शंकरराव गडाख यांनी अभिनंदन केले आहे.