सोयाबीन चोरणार्‍या टोळीचा लोणार पोलिसांकडून शेवगावात पर्दाफाश

सोयाबीन चोरणार्‍या टोळीचा लोणार पोलिसांकडून शेवगावात पर्दाफाश
तिघा जणांना ताब्यात घेऊन अटक; आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता
नायक वृत्तसेवा, शेवगाव
वाहतुकीच्या नावाखाली सोयाबीन चोरणार्‍या टोळीचा लोणार (जि.बुलढाणा) पोलिसांनी शेवगावात येऊन पर्दाफाश केला आहे. गुंतागुंतीच्या तपासातून तब्बल नऊ महिन्यानंतर सदर आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी लोणार पोलिसांनी शेवगाव तालुक्यातून तिघा जणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.


याप्रकरणी मुख्य आरोपी अंबादास राधाकिसन सानप (वय 36, रा.ठाकूर पिंपळगाव, ता.शेवगाव) याच्यासह सहआरोपी योगेश आबासाहेब बोडखे (वय 36), गणेश भीमराव निकम (वय 35, दोघे राहणार शेवगाव) या तिघाजणांना लोणार पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, सानप याने वाशिम येथील एका हॉटेलमधून मोबाईल फोन चोरुन चिखली येथील एका ट्रान्सपोर्ट मालकाला चोरलेल्या फोनवरुन संपर्क साधत ‘माझी गाडी मोकळी आहे, भाडे असल्यास सांगा’ असा फोन केला. संबंधित ट्रान्सपोर्ट मालकाने सानप यास चिखली येथून नागपूर येथे सोयाबीन घेऊन जाण्यास सांगितले.


त्यानुसार सानप याने 3 जानेवारी, 2020 रोजी सुमारे 11 लाख 5 हजार रुपये किंमतीचे, 257 क्विंटल सोयाबीन त्याच्या ट्रकमध्ये भरुन नागपूरकडे घेऊन न जाता थेट शेवगाव येथे आणला. तो एका व्यापार्‍याला विकला होता. नागपूर येथे माल पोहोच न झाल्याने सदर माल चोरीस गेल्याचा संशय बळावल्याने 10 जानेवारी रोजी लोणार पोलिसांत गुन्हा दाखल होता. सानप याच्याविरुद्ध वाशिम येथेही गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.


सहाय्यक पोलीस निरीक्षक अझहर शेख यांच्या नेतृत्वाखाली हेडकॉन्स्टेबल सुरेश काळे, पोलीस कर्मचारी कृष्णा निकम, विशाल धोडगे यांच्या पथकाने शेवगावात दोन दिवस मुक्काम ठोकून या प्रकरणाचा तपास करुन आरोपींना बेड्या ठोकल्या. याप्रकरणी जगन्नाथ विष्णूपंत जायभाय (रा.लोणार, जि.बुलढाणा) यांनी लोणार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दाखल फिर्यादीवरून लोणार पोलिसांनी त्या ट्रान्सपोर्ट मालकास आलेल्या मोबाईल क्रमांकावरुन तपासाची दिशा ठरवून तपास केला. तपासादरम्यान चिखली येथून चोरलेला सोयाबीन शेवगाव येथे आणून विकल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तिघा जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आणखी काही आरोपींना अटक करणार असल्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अझहर शेख यांनी सांगितले.

Visits: 99 Today: 1 Total: 1113271

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *