सराईताकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग! वेताळ मळ्यातील घटना; अवघ्या चौदा वर्षाची पीडिता..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सतत कोणत्या न् कोणत्या गुन्हेगारी कारवायांमध्ये आढळणार्या आणि दादागिरी, रस्तालुट, हाणामार्या, दहशत, दंगल माजवण्यासारख्या अनेक प्रकरणात गजाआड जावून आलेल्या सराईत गुन्हेगाराने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री आरोपी साई सूर्यवंशी याने अवघ्या चौदा वर्ष वयाच्या चिमुरडीला वेताळमळ्यातील झुडूपात ओढून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या प्रकाराने घाबरलेल्या पीडितेने घडला प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर त्यांनी आज पहाटे याबाबत तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी सराईत गुन्हेगार साई सूर्यवंशी याच्याविरोधात विनयभंगासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याचे (पोक्सो) कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (ता.२२) रात्री पावणे दहाच्या सुमारास म्हाळुंगीच्या
काठावरील वेताळमळ्याच्या परिसरात घडला. परिसरात राहणारी एक चौदावर्षीय मुलगी त्यावेळी तेथून जात असताना आसपास कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत आरोपी साई सूर्यवंशी याने पीडितेला वेताळबाबा मंदिराकडे जाणार्या रस्त्यावरील झुडूपांमध्ये ओढीत नेले. यावेळी त्याने पीडितेला ‘तू माझ्या सोबत मैत्री करुन संबंध ठेव’ असे म्हणत महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तत्पूर्वी गेल्या काही दिवसांपूर्वी तो पीडितेचा सातत्याने पाठलाग करीत असल्याचेही पीडितेच्या आईने शहर पोलिसांकडे दाखल केलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.

त्यावरुन पोलिसांनी आरोपी साई सूर्यवंशी याच्या विरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम ३५४ (अ), (ड) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याचे (पोक्सो) कलम १२ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकारानंतर आरोपी पसार झाला असून तपासी अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक माळी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या घटनेने संपूर्ण प्रवरा परिसरात खळबळ उडाली असून म्हाळुंगी व प्रवरा परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तींचा वावर वाढत असल्याने महिला व मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा निर्माण झाला आहे. या भागात गुन्हेगारांसह नशेखोरांचाही मोठा वावर असल्याचे स्थानिकांकडून बोलले जाते, त्यांचा बंदोबस्त होण्याची गरज आहे.

या प्रकरणातील आरोपी साई सूर्यवंशी हा अकोले नाक्यावरील कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. दादागिरी करणे, रस्तालूट, हाणामार्या, दहशत निर्माण करण्याचे प्रकार, अवैध व बेकायदा गोष्टींमध्ये सहभाग, दंगल माजवणे अशा कितीतरी प्रकरणी त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आता त्याच्याकडून अल्पवयीन मुलीही लक्ष्य होवू लागल्याने समाजासाठी तो धोकादायक होवू पाहत आहे. पोलिसांनी वेळीच त्याच्या नांग्या ठेचण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यात त्याचा भस्मासूर होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.

