संगमनेर तालुक्यातील कोविडची सरासरी पुन्हा वाढली! बुधवारी शहरातील सातजणांसह चोवीस नवे कोरोनाबाधित आढळले
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यात सुरु असलेले कोविडचे संक्रमण आजही कायम आहे. शहरी व ग्रामीण भागातील नागरिक आता कोविडला सोबत घेवून आपल्या जीवन प्रवासाला लागल्याने दररोजच्या आकडेमोडीतील सातत्यही कमी-अधिक होत कायम आहे. त्यातूनच तालुक्याच्या रुग्णगतीत दररोज भर पडण्याची श्रृंखलाही अव्याहतपणे सुरु आहे. बुधवारी (ता.6) रात्री उशीराने प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील सात जणांसह 24 जणांची नव्याने रुग्णसंख्येत भर पडली आहे. त्यामुळे तालुक्याचा कोविड आलेख उंचावत आता सहा हजार 93 वर पोहोचला आहे.
नववर्षाच्या सुरुवातीला तालुक्यातील रोजच्या रुग्णवाढीच्या गतीला मोठा ब्रेक लागल्याचे चित्र बुधवारपर्यंत दिसत होते. महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांत सरासरी अकरा रुग्ण रोजच्या गतीने एकूण 55 रुग्णांची भर पडली होती. बुधवारी मात्र त्यात मोठी वाढ होवून तब्बल 24 रुग्ण समोर आल्याने तालुक्याच्या सरासरीचा वेगही 2.17 टक्क्याने वाढून आता 13.17 वर पोहोचला आहे. कोविडवरील लस उपलब्ध झाल्याच्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये उत्साहासोबतच गाफीलपणाही संचारल्याने थोडेसे दुर्लक्ष नियंत्रणात येत असलेली स्थिती बिघडवण्यास कारणीभूत ठरु शकते. त्यामुळे जोपर्यंत प्रत्येकाचे लसीकरण होत नाही, तोपर्यंत कोविडकडे गांभिर्याने बघण्याची नितांत गरज आहे.
बुधवारी (ता.6) तालुक्यातील एकूण चोवीस जणांना कोविडचे संक्रमण झाले. त्यात शहरातील जनतानगर मधील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55 वर्षीय महिला. कुरणरोडवरील 35 वर्षीय महिला. भारतनगरमधील 41 वर्षीय महिला. नवघर गल्लीतील 29 वर्षीय महिला. साई रेसीडेन्सीमधील 25 वर्षीय तरुण व चंद्रशेखर चौकातील 46 वर्षीय महिला अशा सात जणांचा समावेश आहे.
तर ग्रामीण क्षेत्रातील कुरण येथील 30 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी शिवारातील रहाणे मळा परिसरातील 52 वर्षीय इसम, 42 वर्षीरू महिला व 20 वर्षीय तरुण, पोखरी हवेली येथील दोन वर्षीय बालक, सुकेवाडीतील 22 वर्षीय तरुण, सोनेवाडी येथील 35 वर्षीय महिलेसह 13 व 12 वर्षीय मुली, नान्नज दुमाला येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निमगाव पागा येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निमगाव जाळीतील 58 वर्षीय इसमासह 51 व 22 वर्षीय महिला, राजापूर येथील 35 वर्षीय तरुण, साकूर येथील 36 वर्षीय महिला व मालदाड येथील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक. बुधवारी अशा एकूण 24 नवीन रुग्णांची भर पडल्याने संगमनेर तालुक्याची रुग्णसंख्या 6 हजार 93 वर जावून पोहोचली आहे.