शहर पोलिसांची सलग दोन दिवस कारवाई; सहा गोवंश जनावरांची केली मुक्तता एकावर गुन्हा दाखल तर तीन लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहर पोलीस ठाण्याची सूत्रे पुन्हा हाती घेतल्यापासून पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी आपल्या धडाकेबाज कारवाईचा सिलसिला सुरूच ठेवला आहे. कत्तलीच्या उद्देशाने सहा गोवंश जनावरांची वाहतूक करताना अकोले तालुक्यातील कोतूळ येथील एकास संगमनेर-खांडगाव रस्त्यावरील बोगद्याजवळ बुधवारी (ता.6) रात्री नऊ वाजेच्या सुमारास पकडले आहे. सलगच्या दोन कारवायांमुळे अवैधरित्या कत्तलखाना चालविणारे आणि निर्दयतेने गोवंश जनावरांची वाहतूक करणार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईत पोलिसांनी 3 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, कत्तलखान्यांसाठी गोवंश जनावरांना बोलेरो पिकअपमधून (क्र.एमएच.13, आर.8004) चालक अन्वर बाबू तांबोळी (वय 42, रा.कोतूळ) हा घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संगमनेर-खांडगाव रस्त्यावरील बोगद्याजवळ ही पिकअप पकडली. तपासणी केली असता तिच्यामध्ये प्रत्येकी 15 हजार रुपये किंमतीच्या सहा गायी अतिशय निर्दयतेने दाटीवाटीने विना चार्‍यापाण्याच्या बांधलेल्या आढळून आल्या.

या प्रकरणी पोलीस शिपाई सुनील कचरु उगले यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुरनं.19/2021 महाराष्ट्र गोवंश हत्याबंदी कलम 1995 सुधारित 2005 चे कलम 5 अ, 1, 9 प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा कलम 3, 11 नुसार गुन्हा दाखल करुन 2 लाख 30 हजार रुपयांची बोलेरो पिकअप आणि 90 हजार रुपयांचे सहा गोवंश जनावरे असा एकूण 3 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक धादवड हे करत आहे.

संगमनेरातील कत्तलखान्यांमध्ये येणार्‍या जनावरांमध्ये अकोले तालुक्यातील कोतूळ हे ठिकाण केंद्र मानले जाते. संगमनेरातील एका कथित राजकीय पुढार्‍याच्या मध्यस्थीने गेल्या काही वर्षांपासून हा गोरखधंदा सुरू आहे. कोतूळहून संगमनेरकडे ही जनावरे आणण्यासाठी बहुतेक वेळा याच रस्त्याचा वापर केला जातो. दोन वर्षांपूर्वी बजरंग दलाच्या दोघा कार्यकर्त्यांनाही याच रस्त्यावरुन अपहृत करुन मारहाण करण्यात आली होती.

Visits: 11 Today: 1 Total: 116603

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *