श्रीरामपूरमध्ये शंभराहून अधिकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शविण्यासाठी शिवसैनिकांनी प्रतिज्ञापत्रे केली सादर
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
राज्यात शिवसेना व शिंदे गटात संघर्ष सुरू असून आमदार, खासदारांनंतर पदाधिकार्यांमध्ये शिंदे गटात सामील होण्याची एकीकडे स्पर्धा सुरू असताना श्रीरामपूरात मात्र या उलटं चित्र आहे. या सर्व राजकीय धुराळ्यात शहरप्रमुख सचिन बडदे यांच्या नेतृत्वाखाली शंभराहून अधिक जणांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी शेकडो शिवसैनिकांनी प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत. त्यामुळे राज्यात शिवसेनेतून आउटगोईंग सुरू असताना श्रीरामपूरात सुरू असलेले इनकमिंग खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी डोकेदुखी ठरू पाहत आहे.
राज्यात शिवसेना व शिंदे गटात दिवसागणिक संघर्ष पाहायला मिळत आहे. आमदारांपाठोपाठ खासदारांनीही शिंदे गटाशी घरोबा केला आहे. यात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे हेही अपवाद ठरले नाहीत. मात्र, लोखंडे यांचे निवासस्थान उंबरगाव (ता. श्रीरामपूर) येथे असल्याने श्रीरामपुरात येताना त्यांना यापुढील काळात काळजी घ्यावी लागणार आहे. लोखंडे यांनी शिंदे गटाशी हातमिळवणी केल्याने शिवसैनिकांमध्ये रोष दिसत आहे. वरिष्ठ पातळीवर अद्याप कोणताही निर्णय नसल्याने शिवसैनिक शांत आहेत. येत्या दोन दिवसांत वरिष्ठ पातळीवर याप्रकरणी हालचाली होणार असल्याचे समजते.
दरम्यान, शिवसेना शहरप्रमुख बडदे, यासीन सय्यद, राहुल रणधीर, रोहित भोसले, निखील पवार, शारदा कदम, राम अग्रवाल, राधाकिसन बोरकर, आबा बिरारी, प्रवीण शिंदे, सागर हरके, रामपाल पांडे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना पाठींबा दर्शवित प्रतिज्ञापत्रं सादर केली.