अर्ज मागे घेणार्‍यांचा प्रशांत गडाखांकडून वृक्षरोप व पुस्तक देऊन सत्कार मोरयाचिंचोरे ग्रामपंचायत बिनविरोध; ‘यशवंत’ प्रतिष्ठानच्या स्त्युत्य उपक्रमाचे कौतुक

नायक वृत्तसेवा, नेवासा
येथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने आदर्शगाव मोरयाचिंचोरे गावची ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक होण्यासाठी आपले उमेदवारी अर्ज मागे घेणार्‍या इच्छुकांचा सत्कार ‘लक्ष्मीतरू’चे वृक्षरोप व पुस्तक देऊन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या हस्ते करण्यात आला. गडाख यांच्या स्त्युत्य उपक्रमाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.

मोरयाचिंचोरे हे गाव तालुक्याच्या दक्षिणेला टोकाचे कायमच अवर्षणग्रस्त स्थिती असलेले आडवळणी गाव आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी शासन, लोकसहभाग तसेच स्वतःच्या खर्चातून गावात रचनाबद्ध विकासकामे करून दाखविली. गावातील संघर्षाचे सर्वात मोठे कारण ग्रामपंचायत, सहकारी संस्थेच्या निवडणुकीत असल्याचे ओळखून गडाख यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत राजकारण हे गावाच्या विकासासाठी असते, ते आपसातील हेवेदावे, सूड भावना जोपासण्यासाठी नसते हे पटवून दिले.

मोरयाचिंचोरे गावाची वैचारिक एकता झाल्याने गडाख यांनी ‘यशवंत ग्रामसंसद’ ही ग्रामपंचायत सुसज्ज इमारत बांधून घेतली. गावात स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय, यशवंत हॉस्पिटल, यशवंत वाचनालय उभारले. एक लाख वृक्ष लागवड व संगोपन, वनपर्यटन सुविधा केल्या. काँक्रिट बंधारे, बांधबंदिस्ती, सलग समतल चर अशी जलसंधारणाची कामे केली. या उपक्रमाचे महाराष्ट्रातून स्वागत होत आहे.

एकदा कृतज्ञाता पुरस्कार सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना प्रशांत गडाखांनी मोरयाचिंचोरे गावाचा विकास ग्रामस्थांच्या एकजुटीने होत आहे. मात्र गावातील निवडणूक बिनविरोध होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. त्याबाबत ग्रामस्थांनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करीत गडाख यांचा शब्द जपला. याकामी जिल्हा परिषद समितीचे सभापती सुनील गडाख व युवा नेते उदयन गडाख यांनीही प्रयत्न केले.

Visits: 18 Today: 1 Total: 115839

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *