यंदाचा संगमनेर फेस्टिव्हल ‘ऑनलाईन’ सादर होणार ः मालपाणी

यंदाचा संगमनेर फेस्टिव्हल ‘ऑनलाईन’ सादर होणार ः मालपाणी
गणेशोत्सवातील पाच दिवस संगमनेरकरांची सांस्कृतिक भूक भागवणार्‍या कार्यक्रमांचे आयोजन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्राच्या अस्मितेचा जल्लोष असलेल्या गणेशोत्सवावर यंदा कोरोना महामारीचे सावट आहे. गेल्या दीर्घ काळापासून संगमनेरकरांना सांस्कृतिक आणि मनोरंजक कार्यक्रमांपासून वंचित रहावे लागले आहे. लॉकडाऊनच्या काळात सार्वजनिक उत्सवांवर प्रतिबंध असले तरीही गणेशोत्सवाची परंपरा कायम राखण्याचा प्रयत्न म्हणून दरवर्षी आयोजित होणारा ‘संगमनेर फेस्टिव्हल’ यंदा ऑनलाईन सादर होणार आहे. सलग पाच दिवस चालणार्‍या या अनोख्या उत्सवातून संकटाच्या काळात संगमनेरकरांच्या मनावरील सांस्कृतिक मरगळ झटण्याचा प्रयत्न असल्याची माहिती फेस्टिव्हलचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी दिली.


राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाद्वारा दरवर्षी गणेशोत्सवात संगमनेरचा सांस्कृतिक मानबिंदु ठरलेल्या ‘संगमनेर फेस्टिव्हल’चे आयोजन केले जाते. यावर्षी मात्र कोरोना महामारीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता गृहीत धरुन सर्व धार्मिक व सार्वजनिक उत्सवांवर प्रतिबंध लागू करण्यात आले आहे. या महामारीची साखळी तोडण्यासाठी या उपाययोजना आवश्यक असल्याने राजस्थान युवक मंडळासह संगमनेरातील सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रशासकीय सूचनांचे पूर्णतः पालन करण्याचा निर्णय घेतला आहे.


संगमनेरकर कलारसिकांना दरवर्षी संगमनेर फेस्टिव्हलचे मोठे आकर्षण असते. यावर्षी सार्वजनिक पातळीवर हा महोत्सव सादर करता येणार नाही. मात्र गेल्या पाच महिन्यांपासून सांस्कृतिक कार्यक्रमांपासून वंचित राहिलेल्या संगमनेरकरांची सांस्कृतिक मरगळ दूर सारता यावी यासाठी यंदाचा संगमनेर फेस्टिव्हल ‘ऑनलाईन’ पद्धतीने सादर केला जाणार आहे. सलग पाच दिवस हास्य, विनोद, धम्माल आणि बौद्धिक कार्यक्रमांची भरमार असलेल्या या महोत्सवाचा संगमनेरकरांना घरबसल्या आनंद घेता येणार आहे.


रविवार 23 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता संगमनेर फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी युवा उद्योजक गिरीश मालपाणी धम्माल म्युझिकल हौजी गेमच्या माध्यमातून संगमनेरकर रसिकांचे मनोरंजन करणार आहेत. या खेळातून घरबसल्या हजारों रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधीही मिळणार आहे. सोमवार 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता झक्कास विनोद, फर्मास किस्से, कविता, नाट्य व प्रहसनांचा देशभर गाजलेला बण्डा जोशी यांचा धम्माल एकपात्री कार्यक्रम ‘हास्यपंचमी’ सादर होणार आहे. मंगळवार 25 ऑगस्टरोजी सायंकाळी साडेसहा वाजता राज्याच्या राजकारणात आघाडीच्या स्थानावर असलेल्या महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची डॉ.संतोष खेडलेकर यांनी घेतलेली अराजकीय ‘चतुरस्र’ मुलाखत पाहण्याची संधी संगमनेरकरांना मिळणार आहे.


फेस्टिव्हलच्या चौथ्या दिवशी बुधवार 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता छोट्या-छोट्या गोष्टीतून जीवनातील आनंद लुटण्याची प्रेरणा देणारा आणि तणावमुक्त जीवनाचा मंत्र देत दर मिनिटाला खळखळून हसवणार्‍या डॉ.संजय उपाध्ये यांचा ‘जिंकलो ऐसे म्हणा!’ या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. संगमनेर फेस्टिव्हलच्या समारोपप्रसंगी गुरुवार 27 ऑगस्ट रोजी साडेसहा वाजता भारतीय राजकारणात दीर्घकाळ चर्चेत राहिलेल्या समान नागरी कायद्याच्या मसुद्यावर प्रकाश टाकणारे ज्येष्ठ सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांचे ‘समान नागरिक कायदा आणि राष्ट्रीयत्व’ या विषयावरील अभ्यासपूर्ण व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.


गणेश स्थापनेच्या दुसर्‍या दिवसापासून सलग पाच दिवस चालणारा यंदाचा संगमनेर फेस्टिव्हल पहिल्यांदाच सामाजिक माध्यमांद्वारे ऑनलाईन सादर केला जाणार आहे. यासाठी झूम अ‍ॅपचा प्रभावीपणे वापर केला जाणार आहे. गेल्या दीर्घकाळापासून सांस्कृतिक कार्यक्रमांपासून दूर असलेल्या संगमनेरकरांसाठी संगमनेर फेस्टिव्हलच्या माध्यमातून घरबसल्या मनोरंजनाची मेजवाणी उपलब्ध होणार आहे. या संधीचा संगमनेरकरांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरीश मालपाणी, राजस्थान युवक मंडळाचे कार्याध्यक्ष कैलास राठी, उपाध्यक्ष रोहित मणियार, सचिव महेश झंवर, कोषाध्यक्ष कल्याण कासट व राजस्थान युवक मंडळाच्या सर्व सदस्यांनी केले आहे.


गेल्या 12 वर्षांपासून संगमनेरकरांची सांस्कृतिक भूक शमविणार्‍या ‘संगमनेर फेस्टिव्हल’मध्ये आत्तापर्यंत संगीत, नृत्य, नाट्य, कीर्तन, व्याख्यान अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील 85 दिग्गज कलावंत व सिनेनाट्य क्षेत्रातील अभिनेत्यांची हजेरी लाभली आहे. यावर्षी फेस्टिव्हलच्या 13 व्या वर्षी कोरोनाचे सावट असले तरीही ऑनलाईन सादर होणार्‍या या महोत्सवात राज्यभर नावाजलेल्या कलावंतांच्या कार्यक्रमांची ऑनलाईन मेजवाणी संगमनेरकरांना उपलब्ध होणार आहे.

Visits: 132 Today: 1 Total: 1595585

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *