गुरुवारी ठाकरे सरकारची होणार तारेवरची कसरत! बहुमत चाचणीआधी राज्यपालांनी घातल्या सहा अटी
मुंबई, वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पुढचा अंक आता विधानसभागृहात होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारची तारेवरची कसरत होणार असून, 30 जूनला विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. त्यापूर्वी राज्यपालांनी सहा अटी घातल्या आहेत.
राज्यपालांना 7 अपक्ष आमदारांसह शिवसेनेच्या 39 बंडखोर आमदारांचे पत्र मिळाले आहे. या सर्वांनी मिळून महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतल्याचे पत्रात म्हटले आहे. दुसर्या बाजूला भाजपने देखील राज्यपालांना पत्र लिहून महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध अशी मागणी केली आहे. उद्या होणार्या बहुमत चाचणीच्या आधी राज्यपालांनी महाविकास आघाडीला काही गोष्टी पूर्ण करण्यास सांगितले आहे.
विधीमंडळाचे विशेष अधिवेशन उद्या 30 जून रोजी होईल. हे अधिवेशन सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या दरम्यान होतील. अधिवेशनाचा मुख्य अजेंडा हा मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव हाच असेल. बहुमत चाचणीची प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण केली जाईल आणि कोणत्याही कारणास्तव स्थगित केली जाणार नाही. बहुमत चाचणी घेत असताना प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी ही मतमोजणी शिरगणती पद्धतीने घेतली जाईल. या पद्धतीनुसार प्रत्येक आमदाराला त्याच्या जागेवर उभं राहावे लागते आणि त्याची मोजणी करण्यात येईल. संबंधित सदस्याची मोजणी ही त्याच्या जागेवर येऊन केली जाईल.
उद्या होणार्या बहुमत चाचणीचे लाइव्ह टेलिकास्ट करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. लाइव्हसाठी सर्व व्यवस्था उपलब्ध करुन दिल्या जाव्यात असे म्हटले आहे. राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षात गेल्या काही दिवसात अनेक नेत्यांकडून आक्रमक वक्तव्य करण्यात आली आहेत. यामुळेच उद्या होणार्या अधिवेशनात विधान भवन परिसारत कडेकोट बंदोबस्त ठेण्याचे आदेश दिले आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे. संपूर्ण अधिवेशनाचे एका स्वंतत्र संस्थेच्या माध्यमातून व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची जबाबदारी विधानसभेच्या सचिवांची असेल. हे व्हिडिओ रेकॉर्डिंग राज्यपालांना सुपूर्द करण्यास सांगितले आहे.