सांगलीवरुन मामा-भाच्यातील परस्पर विराेधी विधाने पुन्हा चर्चेत! तांबेंचे पाटलांच्या बंडखोरीला समर्थन; तर, थाेरात सांगताहेत आघाडीचा धर्म..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीपासून राज्यातील राजकारणाच्या प्रकाश झाेतात आलेल्या आणि काँग्रेसचा पाया असतानाही आपल्या भूमिकेतून सतत संशय निर्माण करणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेले ट्विट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळीही त्यांनी आपले मामा आणि काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थाेरात यांच्या विपरीत भूमिका घेतली आहे. सांगलीतून आघाडीचा उमेदवार निश्चित झालेला असतानाही त्यांनी स्वर्गीय वसंतदादांचा वारसा विशाल पाटील सक्षमपणे पुढे नेवू शकतील, अजूनही वेळ गेलेली नाही असे सांगत उबाठाच्या उमेदवाराला एकप्रकारे विराेध केला आहे. तर, त्या उलट माजीमंत्री बाळासाहेब थाेरात यांनी आघाडीत पुढे जात असताना काही फायदे व ताेटेही स्वीकारावे लागत असल्याचे सांगत पाटील चुकीचे पाऊल उचलणार नाहीत असे सांगत त्यांच्या अपक्ष उमेदवारीला विराेध केला आहे. एकाच कुटुंबातील दाेघांची ही परस्पर विराेधी विधाने सध्या राज्यातील राजकारणात चर्चेत आली असून तांबेंनी आपल्याभाेवतीचे संशयाचे वलयही अधिक गडद केले आहे.
काेल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी यंदा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काँग्रेसने उबाठाच्या काेट्यातील जागेवर त्यांच्या नावाची घाेषणा केली. त्या बदल्यात उबाठानेही काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घाेषणा करीत वाटाघाटीपूर्वीच सांगलीवर हक्क सांगितला. त्याचा परिणाम प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे राजकीय वारसदार विशाल पाटील यांच्यासह सांगलीतील काँग्रेस समर्थक नाराज झाले. काँग्रेसच्या श्रेष्ठींकडून पाटलांसह विश्वजीत कदम यांची नाराजी दूर करण्याचेही प्रयत्न झाले. मात्र, त्या उपरांतही पाटलांनी पक्षासह अपक्ष अर्ज दाखल करुन एकप्रकारे बंडखाेरीचे संकेतही दिले आहेत. या जागेवर पाटीलांची उमेदवारी कायम राहिल्यास महायुतीला पाेषक वातावरण निर्माण हाेण्याची अधिक शक्यता असून काँग्रेससाठी सांगली डाेकेदुखी ठरली आहे.
अशावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले, ज्येष्ठनेते बाळासाहेब थाेरात यांच्याकडून पाटील व कदम या दाेघांचीही समजूत काढली जात आहे. त्यासाठी साेमवारी (ता.१५) रात्री विश्वजीत कदम यांना नागपूरमध्ये पाचारण करण्यात आले हाेते. यावेळी पटाेले यांनी उबाठाने अर्ज मागे घेतल्यास विशाल पाटील यांना तत्काळ पक्षाचा एबी फॉर्म देण्याचा शब्द दिला, तर थाेरात यांनी केंद्रीय निवडणूक समितीमध्ये विशाल पाटील यांचा समावेश आहे, त्यांच्यासाठी सांगलीची जागा मिळावी अशी अपेक्षा हाेती असे सांगत आघाडीत पुढे जाताना काही फायदे तसेच काही ताेटेही असतात, त्यांचा स्वीकार करुनच पुढे जावे लागते असा सल्ला देत एकप्रकारे सांगलीच्या जागेसाठी आता वाटघाटीची कवाडे बंद झाल्याचेच संकेतही दिले.
यावेळी थाेरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटाेलेंसह आपण विशाल पाटलांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही विश्वजीत कदम यांना सांगितले. त्यांच्याकडून काेणतेही चुकीचे पाऊल उचलले जाणार नाही असा विश्वास जरी त्यांनी यावेळी व्यक्त केला असला, तरीही त्यात पाटलांकडून मात्र त्याला काेणताही प्रतिसाद मिळण्याची चिन्हे नसून पक्ष आणि अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर आज (ता.१७) त्यांनी सांगलीत जाेरदार शक्तिप्रदर्शनही केले. त्यामुळे सांगलीत तिरंगी लढत हाेण्याची शक्यता वाढली असून महाविकास आघाडीच्या मतविभाजनाचा थेट फायदा महायुतीला हाेण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत आघाडीत बिघाडी हाेण्याची आणि त्यातून काँग्रेस-उबाठा यांच्यातील संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठनेते बाळासाहेब थाेरात प्रयत्नरत असतानाच त्यांचे भाचे व विधान परिषदेचे सदस्य सत्यजीत तांबे यांची त्याउलट असलेली भूमिका कालच्या त्यांच्या ट्विटमधून समाेर आली आहे.
साेशल माध्यमातील एक्स समाजमाध्यमावर त्यांनी ट्विट करीत सांगलीच्या विशाल पाटील यांच्या भूमिकेचे एकप्रकारे समर्थनच केले आहे. या ट्विटमध्ये तांबे यांनी विशाल पाटील यांच्यावर काय अन्याय झालाय हे फक्त त्यांचा संघर्ष माहीत असलेल्यांनाच ठाऊक. त्यांना हे पाऊल का उचलावे लागले याचा विचार हाेणे गरजेचे आहे. राजकारणात कर्तृत्ववान उमेदवार पाहिजेत, असे आपले मत असल्याचे त्यांनी लिहिले आहे. याच पाेस्टमध्ये तांबे यांनी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटीलांचे महाराष्ट्रावर अनंत उपकार असल्याचे सांगताना त्यांनी केलेल्या शिक्षण क्रांतीमुळेच आज घराघरात डाॅक्टर, इंजिनिअर तयार हाेत असल्याची आठवणही करुन दिली आहे. विशाल पाटील हे दादांच्या कामाचा वसा व वारसा पुढे घेवून जाण्यात पूर्णपणे सक्षम आहेत. त्यामुळे त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांना कुठेतरी संधी मिळायलाच हवी असे सांगताना त्यांनी घराणेशाहीचेही जाेरदार समर्थन केले आहे.
खरेतर नाशिक पदवधीर मतदार संघाच्या निवडणुकीवेळी अनेक राजकीय नाटकं बघायला मिळाली. निवडणुकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सत्यजीत यांच्यासह त्यांचे वडील डाॅ. सुधीर तांबे यांनाही एबी फॉर्म दिला हाेता असा गौप्यस्फोट केला. तांबे पिता-पुत्राच्या भूमिकेमुळेच आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला, तर कधीकाळी भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नाशिक पदवीधर मतदार संघात तांबेंनाच पाठबळ दिले गेले, त्यातून त्यांचा विजय अधिक साेपा झाला. तेव्हापासून सत्यजीत तांबे यांची राजकीय भूमिका नेहमीच चर्चेत राहिली असून श्रीराम प्राणप्रतिष्ठापना साेहळ्यावेळी ती ठळकपणे समाेर आलेली असताना आता सांगलीच्या वादात त्यांनीही उडी घेत बंडखाेरीच्या तयारीत असलेल्या विशाल पाटील यांना चुचकारीत त्यांच्या भूमिकेला समर्थनच दिले आहे. त्यामुळे पाटलांचेही मनसुबे उंचावले असून त्यांची अपक्ष उमेदवारी उबाठाची डाेकेदुखी वाढवणारी ठरणार हे मात्र निश्चित असल्याची जाेरदार चर्चा आहे.
सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाताे. राजकारणातील आघाडी धर्मात घटक पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करण्याचा प्रघात असला तरीही पाटलांसाठी स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह, आघाडीत उबाठाने घाेषित केलेला उमेदवार आणि आता काँग्रेसच्या इच्छुकाचीच बंडखाेरी करण्याची तयारी आणि त्याला आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून दिली जाणारी फूस आघाडीत बिघाडी करण्यासह सांगलीत तिरंगी लढत घडवून आणण्याचा प्रयत्न करणारी असून त्यांच्या या भूमिकेतून पुन्हा एकदा संशय निर्माण झाला आहे.