कोविडसाठी ढबूचाही निधी न देणार्या खासदारांची अधिकार्यांवरच आगपाखड! मतदारसंघातील नागरिक खाटा व लशीसाठी त्राही करीत असतानाही ठरले होते देशात अव्वल..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातील कोविड स्थितीने भयानक रुप धारण केले आहे. वाढती रुग्णसंख्या आणि उपचारांची गरज असलेल्या सक्रीय संक्रमितांची संख्या यामुळे संपूर्ण जिल्ह्यात रुग्णालयातील खाटांची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. त्यातच ऑक्सिजन व रेमडेसिवीर लशींचाही मोठा तुटवडा निर्माण झाल्याने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधून रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश कानी येवू लागला आहे. अशा स्थितीत आज जगण्यासाठी संघर्ष करणार्यांच्या मतांच्या लाटेवर स्वार होवून कोणत्याही कर्तृत्वाशिवाय दोनवेळा लोकसभेत पोहोचलेल्या खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपल्या विरोधात जनमनाचा उद्रेक होईल या भीतीने गुरुवारी संगमनेरात आढावा बैठक घेतली. गेल्या वर्षभरात खासदार निधीतून एक नवा ढबूही न देणार्या आणि जिल्ह्यातील कोविडचा ‘ग्राऊंड रिपोर्टच’ गावी नसलेल्या खासदारांनी आपल्या ‘लोकप्रतिनिधीत्वा’च्या अधिकारांचा वापर करुन गेल्या वर्षभरापासून कोविडशी एकाकी लढणार्या प्रशासनावरच आगपाखड करीत नवा ‘नाट्यप्रयोग’ सादर केला. खासदारांची ही कृती संगमनेरकरांची सहानुभूती मिळवण्याऐवजी संताप निर्माण करणारी ठरली.
‘खासदार हरवले आहेत..’ अशा आशयाच्या फलकांवरुन अवघ्या महाराष्ट्राला निष्क्रीय म्हणून परिचित असलेले आणि कर्तृत्त्वाशिवाय केवळ लाटेवर स्वार होवून दोनवेळा विजय प्राप्त करणारे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे गुरुवारी अचानक मतदार संघात प्रकटले. सुरुवातीला त्यांनी नेवासा येथे आढावा बैठक बोलावली, मात्र या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संजय सुखदान यांनी भर बैठकीतच ‘खासदार साहेब तुम्ही नेवासा तालुक्यासाठी आजवर काय केले?’ असा संतप्त सवाल उपस्थित करुन निषेध म्हणून खासदार लोखंडे यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. याप्रसंगाने खासदारांचे कर्तृत्त्व स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्यांनी उर्वरीत बैठक आटोपशीर करुन तेथून काढता पाय घेतला. तेथून ते थेट 75 किलो मीटर दूर अंतरावरील संगमनेरात पोहोचले.
गुरुवारी दुपारी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनी रुग्णालयांमधील अपूर्या जागा, ऑक्सिजन खाटांची कमतरता आणि रेमडेसिवीर लशींचा काळाबाजार यावर त्यांचे लक्ष्य वेधले असते, त्यांनी काहीतरी ठोस कारवाई करण्याऐवजी ‘लोकांचे जीव वाचवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे’ असं आश्चर्यकारक वक्तव्य करीत आपली निष्क्रीयता येथेही सिद्ध केली. वास्तविक नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी स्वप्रयत्नाने नाशिककरांसाठी सात हजार रेमडेसिवीर लशींची व्यवस्था केली, आजही नाशिकमधील अडलेली मंडळी त्यांच्याकडे जावून मदत मागत आहे आणि ते देखील देत आहेत. त्यांनी कोणत्याही अधिकार्याला दुषणं दिली नाहीत.
मात्र कर्तृत्त्वाशिवाय दोनवेळा लाटेवर स्वार झालेल्या शिर्डीच्या खासदारांना मात्र आपल्या स्वजबाबदारीचा आणि कर्तव्याचा पूर्ण विसर पडला आणि संगमनेरातील भयंकर कोविड स्थितीचे खापर त्यांनी अधिकार्यांच्याच डोक्यावर फोडण्याचा केविलवाणा प्रयोगही सादर करुन पाहीला. मात्र गेल्या वर्षभरापासून संगमनेरकर आणि कोविड यांच्यामध्ये प्रशासनच उभे असल्याचे तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला माहित असल्याने त्यांचे हे वक्तव्य हास्यास्पद ठरले. विशेष म्हणजे गेल्यावर्षी एप्रिलपासून आजवरच्या बारा महिन्यात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे पालक असलेल्या खासदार सदाशिव लोखंडे यांनी या कालावधीत मतदारसंघाच्या आरोग्य सुविधांसाठी अथवा कोविडच्या उपाययोजनांसाठी एक नवा ढबूही दिलेला नाही. गेल्या वर्षभरातील कालची त्यांची भेट केवळ दुसरीच होती, इतरवेळी ते मुंबईतील आपले बिअरबार व अन्य व्यवसायातच मग्न होते. मात्र आता गेलो नाही तर लोकं पुन्हा येवूच द्यायचे नाहीत या भीतीपोटी ते ‘बैठक पर्यटनाला’ आले आणि कृतीशून्य निष्कर्षासह अधिकार्यांवरच तोंडसुख घेवून पुन्हा मुंबईकडे आपले व्यवसाय सांभाळण्यासाठी रवानाही झाले. त्यांचा हा दौरा संगमनेरकरांना धीर देण्याऐवजी संताप वाढवणाराच ठरला.
संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व नेवासा या तालुक्यांचा समावेश असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे 2014 आणि 2019 अशा सलग दोनवेळा मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. अर्थात त्यांच्या या विजयात त्यांचे व्यक्तिगत कर्तृत्व शून्यच होते, त्यामुळे गेल्या दोन निवडणुकांदरम्यान त्यावेळी मतदारसंघातील ‘मोदी’ लाटेने त्यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. त्यामुळे त्यांना नागरी मतांची किंमतच कळाली नाही. आपल्या मतदारसंघातील जनता वर्षभर कोविडशी संघर्ष करीत असतांना खासदार महोदयांनी येथील आरोग्य सुविधांसाठी अथवा कोविड उपाय योजनांसाठी नवा ढबूही दिला नाही, मात्र आपल्या निष्क्रीयतेचे खापर ते अधिकार्यांच्या डोक्यावर फोडायलाही विसरले नाहीत.