‘महानंद’ला लवकरच चांगले दिवस येणार ः देशमुख केंद्रीय संरक्षण मंत्रालयाबरोबर दूध खरेदीचा करार

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सहकारी दूध संघांच्या संकटाच्या काळात मदतीला धावलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाला चांगले दिवस यायला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून महानंद दूध संघाने भरारी घ्यायला सुरुवात केली आहे. शासनाने आरे ब्रँडची उत्पादने बनवण्याचे काम महानंदला दिले आहे. लवकरच आरेची उत्पादने बनवण्यास महानंद सुरुवात करणार असल्याचे महानंदचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

याविषयी अधिक बोलताना देशमुख म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, दुग्धविकास मंत्री सुनील केदार व महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून महानंद व राज्यातील सहकारी दूध संघांना मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे. संपूर्ण जगावर थैमान घातलेल्या कोरोना काळात देशाला लॉकडाऊनचा सामना करावा लागला. अत्यावश्यक सेवा सोडून सगळी व्यवस्था ठप्प झाली होती. त्या कालखंडात दूध संघांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. परंतु अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार शेतकरी व दूध संघाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिल्यामुळे सहकार क्षेत्राला उभारी मिळाली. त्यातच राज्य सहकारी दूध संघाची आर्थिक स्थिती सुधरविण्यासाठी राज्य शासनाच्या आरे ब्रँडची उत्पादने बनवण्याची परवानगी व आरेचे मुंबईमधील स्टॉल महानंदला मिळाल्यापासून ‘महानंद’ची आर्थिक उलाढाल वाढणार आहे. महानंदच्या दुग्धजन्य उत्पादनांची विक्री संपूर्ण राज्यभर करण्यासाठी दूध विक्री स्टॉलची लवकरच निर्मिती केली जाणार आहे.

महानंदचे दूध व दुग्धजन्य उत्पादने गुणवत्तापूर्ण व उच्चप्रतीचे असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना परवडणार्‍या किंमतीमध्ये उपलब्ध झाल्यामुळे ‘महानंद’ची उत्पादने अधिकच लोकप्रिय ठरली आहेत. महानंदची अतिरिक्त दुधाची बनलेली दूध भुकटी राज्य शासनाच्या अटल अमृत आहार योजनेंतर्गत व बालकल्याण आदिवासी विभागामार्फत योजनेत समाविष्ट सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. महानंद व केंद्रीय संरक्षण मंत्रालय यांच्यात करार झाला असून भारतीय सैन्याला दूध पुरवठा महानंदने सुरू केला आहे. महानंदची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्यामुळे आर्थिक परिस्थिती लवकरच सुधारणार असल्याचे सूतोवाच अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी अधोरेखित केले आहे.

Visits: 13 Today: 1 Total: 117031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *