कोविडने घेतला तालुक्यातील आणखी एकाचा बळी! राजापूरातील ज्येष्ठ नागरिकाचा अवघ्या दोन दिवसांतच मृत्यु


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्याच्या ग्रामीणभागात कोविड विषाणूंनी अक्षरशः उच्छाद घातला असून दररोज वाढत्या रुग्णसंख्येने तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच अधुनमधून कोविड बाधितांच्या मृत्युच्याही वार्ता समोर येत असल्याने नागरिक धास्तावले आहेत. या महिन्याने तर रुग्णसंख्येच्या नवनवीन विक्रमांसह कोविड मृत्युंची संख्याही अनियंत्रित केली आहे. मंगळवारी रात्री 55 रुग्णांच्या अहवालासह ग्रामीणभागातील 78 वर्षीय इसमाच्या मृत्युने संगमनेरकरांना धक्का बसला आहे. कालच्या दिवसभरात झालेला हा दुसरा तर या महिन्यातील सोळावा मृत्यु ठरला आहे.


मंगळवारी (ता.22) सकाळी संगमनेर शहरातील गांधी चौक परिसरात राहणार्‍या प्रतीथयश व्यापार्‍याचे निधन झाले. त्यांच्यावर गेल्या 9 सप्टेंबरपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते व दाखल केल्यापासूनच त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती. त्यामुळे त्यांना सुरुवातीपासूनच व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. या दरम्यान तब्बल बारा दिवसांनंतर त्यांचा मृत्यु झाला. या वार्तेने अवघ्या शहरावर शोककळा पसरली. सदर व्यापार्‍यावर कोविड अंत्यविधी निकषांनुसारच दाहसंस्कार करण्यात आले, मात्र त्याच कोविडच्या नियमानुसार अहवाल प्राप्त झाल्यानंतर दहा दिवसांनी बाधिताला कोविड मुक्त समजले जाते. त्यामुळे त्यांचा मृत्यु कोविड गणतीत न मोजता संशयित रुग्णांमध्ये गणला गेला आहे.


या वेदनादायी वृत्ताने दिवसभर संगमनेरच्या बाजारपेठेत हळहळ व्यक्त होत असतांनाच रात्री उशीराने 55 जणांच्या अहवालाचा दुसरा धक्का बसला. संगमनेरकर नागरिक सदरचे वृत्त वाचत असतानाच राजापूरातील 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या कोविड मृत्युचे वृत्त येवून धडकले. या वृत्ताने राजापूरसह संपूर्ण तालुक्यात कोविडची दहशत निर्माण झाली. गेल्या सोमवारीच (ता.21) त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच मंगळवारी (ता.22) रात्री त्यांचा मृत्यु झाला. या महिन्यातील हा सोळावा व आत्तापर्यंतचा 41 वा मृत्यु होता, तर शासकीय नोंदीनुसार सदरचा मृत्यु आजवरचा 35 वा. ठरला आहे.


कालच्या दिवसभरात संगमनेरातील प्रतीथयश व्यापार्‍याच्या मृत्युसह रात्री 55 नवीन रुग्णांची भर आणि रात्री राजापूरातील 78 वर्षीय इसमाच्या मृत्युने तालुक्यातील कोविडची दाहकता पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे. नागरिकांनी यापुढील कालावधीत अधिक सतर्कता बाळगून नियमांचे पालन करण्याची, गर्दीचे कार्यक्रम टाळण्याची गरज आहे, अन्यथा कोविड नावाचा अदृष्य विषाणू आपल्या आसपासच आहे याचे प्रत्येकाला सतत स्मरण ठेवावे लागणार आहे.

राजापूरमधील मृत्यु ठरला महिन्यातील सोळावा..

1 सप्टेंबररोजी माळीवाड्यातील 70 वर्षीय इसम, 2 सप्टेंबररोजी समनापूर येथील 62 वर्षीय इसम, 3 सप्टेंबररोजी मालदाड येथील 35 वर्षीय तरुण, 5 सप्टेंबररोजी चंदनापूरी येथील 39 वर्षीय तरुण, 6 सप्टेंबररोजी गिरीराजनगर येथील 59 वर्षीय इसम (हा मृत्यु बाह्य जिल्ह्यात गणला गेला आहे.), पंपींग स्टेशन येथील 73 वर्षीय महिला, चिखलीतील 76 वर्षीय महिला व घुलेवाडीतील 80 वर्षीय इसम, 11 सप्टेंबररोजी हिवरगाव पठार येथील 55 वर्षीय इसम, 14 सप्टेंबररोजी वेल्हाळे येथील 65 वर्षीय व मंगळापूर येथील 65 वर्षीय इसम, 15 सप्टेंबररोजी कौठे धांदरफळ येथील 55 वर्षीय इसम, 18 सप्टेंबररोजी चंदनापूरी येथील 74 वर्षीय इसम, 19 सप्टेंबररोजी मनोली येथील 70 वर्षीय इसम व सोमवारी 22 सप्टेंबररोजी गांधी चौक परिसरातील 70 वर्षीय व राजापूरमधील 78 वर्षीय इसमाच्या रुपाने या महिन्यातील सोळावा कोविड बळी गेला आहे.

Visits: 76 Today: 3 Total: 1104790

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *