चंडकापूर येथील दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाचा छापा भेसळयुक्त दूध व भेसळीच्या रसायनांचा तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील चंडकापूर येथील जय भवानी दूध संकलन केंद्रावर गुरुवारी (ता.31) अहमदनगरच्या अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकत भेसळयुक्त दूध व भेसळीच्या रसायनांचा तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भेसळयुक्त दुधाचे व रसायनांचे नमुने विश्लेषणासाठी घेऊन 532 लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच नष्ट करण्यात आले. दूध केंद्र सील करून दूध केंद्राचा परवाना त्वरीत निलंबित करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांनी दिली.
गुरुवारी सकाळी नऊ वाजता चंडकापूर येथे अहमदनगर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुटे, नमुना सहाय्यक प्रसाद कसबेकर यांच्या पथकाने छापा टाकून कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईने दूध उत्पादकांमध्ये एकच खळबळ उडाली. राजेंद्र चांगदेव जरे यांच्या जय भवानी दूध संकलन केंद्राच्या ठिकाणी व राहत्या घरामध्ये दूध भेसळीसाठी साठवलेली 25 किलो व्हे पावडर, 152 किलो लिक्विड पॅराफीन, 532 लिटर भेसळयुक्त दूध असा 30 हजार 24 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
जप्त मुद्देमालाचे नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेतले. भेसळयुक्त 532 लिटर दूध जागेवर ओतून नष्ट करण्यात आले. दूध केंद्राचा परवाना त्वरित निलंबित करून, पथकाने दूध केंद्र सील केले. याबाबत माध्यमांशी बोलताना सहाय्यक आयुक्त शिंदे म्हणाले, राजेंद्र जरे हा दररोज 800 लिटर दूध शेतकर्यांकडून संकलित करायचा. त्यामध्ये कृत्रिम तयार केलेले 200 लिटर दूध मिश्रण करून, दररोज एक हजार लिटर भेसळयुक्त दूध पुढे विक्री करायचा. अशी गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अहमदनगर कार्यालयाला मिळाली. त्यानुसार जरे याच्या जय भवानी दूध संकलन केंद्रावर छापा टाकून कारवाई केली आहे. दरम्यान, या धडाकेबाज कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले तर दूध उत्पादकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.