युवासेनेच्या रक्तदान शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद
नायक वृत्तसेवा, नेवासा
युवासेनेच्यावतीने शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये रविवारी (ता.6) आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये शेकडो युवकांनी युवासेनेचे अध्यक्ष तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला साद घालत रक्तदान केले असल्याची माहिती युवासेनेचे जिल्हाध्यक्ष नीरज नांगरे यांनी दिली.
यावेळी अधिक माहिती देताना नीरज नांगरे म्हणाले, राज्यात झालेली कोरोना महामारीची बिकट अवस्था पाहता युवासेनाप्रमुख नामदार आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने शिर्डी लोकसभा मतदारसंघातील श्रीरामपूर, नेवासा, कोपरगाव या विधानसभा मतदारसंघात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये शिवसेना सचिव सूरज चव्हाण, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तीकर, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, युवासेना सहसचिव सुनील तिवारी, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली वरील तिन्ही ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये युवकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात होता. या शिबिरात सामाजिक अंतराचे पालन करण्यात येऊन सर्वांना मास्कचे वाटप करून शिबिर यशस्वी करण्यात आल्याचे स्पष्ट केले.