त्वचारोग तज्ज्ञांकडील रुग्णांच्या रांगा अन्य व्यावसायिकांच्या दारात! कुणाच्या खांद्यावरी कुणाचे ओझे; कोट्यवधी कमावूनही रुग्ण तासन् तास उन्हात..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही वर्षात संगमनेर शहराची ओळख ‘मेडिकल हब’ म्हणून अधिक गडद झाली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातून वैद्यकीय शिक्षण घेवून आलेल्यांसह शासकीय अथवा खासगी रुग्णालयांमध्ये सेवेसाठी आलेली डॉक्टर मंडळीही निवृत्ती नंतरच्या काळात येथेच विसावल्याने संगमनेरात विविध व्याधींवरील तज्ज्ञांसह असंख्य रुग्णालयांची गर्दी झाली आहे. संगमनेरचा नवीन नगर रस्ता म्हणजे तर रुग्णालयांचा मार्ग म्हणूनच ओळख निर्माण करणारा ठरला आहे. मात्र आता ही ओळखच या रस्त्यावरील अनेकांना नकोशी झाली असून कोट्यावधी रुपये कमावणारे काही डॉक्टर्स आपल्या रुग्णांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधाही देत नसल्याने त्यांच्याकडे गर्दी करणार्या रुग्णांना भर उन्हात आसपासच्या दुकानांसमोर रांगा लावून उभे रहावे लागत आहे. त्याचा थेट फटका अशा डॉक्टरांच्या आसपासच्या दुकानदारांना बसत असून ‘कुणाच्या खांद्यावरी कुणाचे ओझे’ असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
चार दशकांपूर्वी ज्या भागात येण्यास नागरीक धजावत नव्हते अशा नवीन नगर रस्त्याला आज सोनियाचे दिवस आले आहेत. त्याचे कारणही तसेच आहे, सुटसुटीत व शहरालगतचा परिसर म्हणून काही दशकांपूर्वी या रस्त्यावर काही बँका व मालपाणी उद्योग समुहाचे प्रधान कार्यालय सुरु झाले. तत्पूर्वी या परिसराचा विकास व्हावा यासाठी संगमनेर नगर परिषदेने नाल्यावरच व्यावसायिक संकुल उभारुन बसस्थानकाच्या परिसरातील भाग म्हणून या रस्त्याला व्यावसायिक स्वरुप देण्याचा प्रयत्न केला. पालिकेचा हा प्रयत्न काही वर्षातच फळाला आला आणि विविध व्यवसायांनी हा संपूर्ण रस्ता अगदी फुलून गेला. कापडांची दालनं, हॉटेल्स, सुवर्णपेढ्या यामुळे हा रस्ता गजबजत असतांना अनेकांनी परिसरात जागा घेवून आपल्या वसाहतीही निर्माण केल्या.
पुणे-नाशिक व मुंबई या महानगरांच्या त्रिकोणीय श्रृंखलेतील अत्यंत महत्त्वाचे केंद्र असलेल्या संगमनेर शहरातील बसस्थानक आणि पुणे व नाशिक या शहरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग यामुळे नवीन नगर रस्त्याला अल्पावधीतच भाव चढला. त्यातच काही मोठ्या रुग्णालयांनी या परिसरात जागा घेवून भल्या मोठ्या इमारती उभ्या केल्याने हळूहळू एकामागून एक रुग्णालयांची गर्दी होवू लागली. गेल्याकाही वर्षात तर वैद्यकीय पदवी प्राप्त करुन संगमनेरात येणारा प्रत्येक नवडॉक्टर आपलं क्लिनिक अथवा रुग्णालय नवीन नगर रस्त्यावरच असावं हे स्वप्नं घेवूनच येथे आल्याने अवघ्या एक-दीड दशकांतच नवीन नगर रस्त्यावरील जागांच्या किंमती गगनाला जावून भिडल्या. आजच्या स्थितीत या मार्गावर एकतर जागाच शिल्लक नाही, किंवा ज्या आहेत त्यांच्या किंमती सामान्य माणसांचे डोळे पांढरे करणार्या आहेत.
त्यामुळे सुरुवातीला केवळ प्रॅक्टिस म्हणून छोट्याशा जागेत क्लिनिक सुरू करणार्या काहींना आपलं नाव झाल्यानंतर रुग्णालयासाठी अथवा क्लिनिकच्या विस्तारासाठी जागाच अनुपलब्ध होत नाहीत. मात्र असे असूनही मोक्याची जागा सोडून दुसरीकडे गेल्यास आपले ग्राहकरुपी रुग्ण अन्य डॉक्टर अथवा रुग्णालयाकडे वळतील या भीतीने अशा काही डॉक्टरांनी आहे त्याच जागेत आपला वैद्यकीय व्यवसाय सुरु ठेवला. त्याचा परिणाम रुग्णांसह अशा क्लिनिकच्या आसपास असणार्या अन्य व्यावसायिकांना भोगण्याची वेळ आली आहे.
असाच प्रकार याच रस्त्यावरील एका त्वचारोग तज्ज्ञांच्या क्लिनिकमध्ये दररोज घडत असून भल्या सकाळीच या महाशयांकडे तपासणीसाठी येणार्या रुग्णांचा रांगा लागलेल्या असतात. त्वचा हा मानवी जीवनात अत्यंत महत्वाचा भाग असल्याने व त्यातही महिलांसाठी हा विषय अतिशय जिव्हाळ्याचा असल्याने असुविधा असूनही अनेक महिला, मुली व अन्य रुग्ण या क्लिनिकमध्ये गर्दी करतात. मात्र संबंधित त्वचारोग तज्ज्ञांचे सदरचे क्लिनिक अपुर्या जागेत असल्याने एकाचवेळी जेमतेम पाच-दहा रुग्णाच त्यांच्या क्लिनिकमध्ये आपल्या तपासणी नंबरची प्रतीक्षा करु शकतात, मात्र उर्वरीत असंख्य रुग्णांना मात्र तासन् तास या क्लिनिकच्या बाहेर उन्ह, पाऊस, वारा सहन करीत ताटकळत उभे रहावे लागते. विशेष म्हणजे हा प्रकार एका दिवसाचा नसून दररोजची कथा सारखीच आहे.
सदर क्लिनिकचे तज्ज्ञ रुग्णांकडून तपासणीचे शेकडों रुपये घेतात, उपचारांसाठी आवश्यक असलेली औषधेही त्यांच्याच क्लिनिकमधील मेडिकलमधून घ्यावी लागतात. म्हणजेच त्वचेबाबत एखादी तक्रार घेवून या महाशयांकडे गेलेला रुग्ण किमान हजार/दोन हजार रुपये देवूनच बाहेर पडतो. दिवसभरात अशा शेकडो रुग्णांच्या येथे तपासण्या होतात व महिन्याकाठी संबंधिताला त्यातून लाखोंची कमाई देखील होते. अर्थात हा पैसा त्यांच्या परिश्रमातून, त्यांच्या विद्वत्तेतूनच मिळतो याबाबत कोणतेही दुमत नाही. मात्र ज्या रुग्णांच्या जीवावर काही वर्षातच आपण गर्भश्रीमंत झालो आहोत त्या रुग्णांना वार्यावर सोडून कसे चालेल? त्यांच्या आर्थिक प्रगतीला कोणीही विरोध करण्याचेही कारण नाही, मात्र त्यांच्याकडे आलेला रुग्ण जेव्हा आसपासच्या दुकानांमध्ये जाणारे रस्ते अडवून उभा राहतो तेव्हा त्याचा फटका तर त्या दुकानदारांना बसतोच ना?
वास्तविक रुग्णांसाठी प्रतीक्षालय असावे अथवा जागेची कमतरता असेल तर ऑनलाईन पद्धतीने क्रमांक पद्धती विकसित करुन रुग्णांना निश्चित वेळी बोलवणे आवश्यक आहे. मात्र देणारा बिनबोभाटपणे देतोय म्हणून घेणार्यानेही ते घेतच रहावे असेच काहीसे चित्र सध्या नवीन नगर रस्त्यावरील या त्वचारोग तज्ज्ञांच्या दवाखान्यासमोर दिसत आहे. या प्रकाराने या दवाखान्याच्या आजुबाजूचे दुकानदार पुरते वैतागले असून त्यांना हा दवाखाना येथे नकोसा झाला आहे. त्यातच भररस्त्यातच रांगेत उभे राहणारे रुग्ण सोबत आणलेली आपली वाहनेही तेथेच उभी करीत असल्याने या भागात वारंवार वाहतुकीचा मोठा खोळंबा होत असून एका डॉक्टरच्या चुकीमुळे अनेकांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. या प्रकरात बदल व्हावा अथवा सदरचे क्लिनिक अन्यत्र हलवावे अशी मागणी आता या परिसरातील व्यावसायिकांकडून समोर येत आहे.