‘भारत जोडो’ यात्रेत अपशकून करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला! मिलिंद देवरांच्या शिवसेना प्रवेशावर आमदार बाळासाहेब थोरातांची टीका


नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून त्यांनी रविवारी (ता.१४) दुपारी शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. मात्र, त्यांच्या राजीनाम्याच्या टायमिंगवर भाष्य करीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा पहिला टप्पा सुरू होण्याच्या दिवशीच देवरा यांनी राजीनामा देऊन यात्रेत एकप्रकारे अपशकून करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला केल्याचे थोरात यांनी म्हटले आहे. थोरात यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर अनेक यूजरने देवरा यांच्यावर टीका केली आहे.

लोकसभा निवडणूक जवळ आल्यानंतर राजकीय हालचाली आणि पक्षांतरे सुरू झाली आहेत. दोनवेळा दक्षिण मुंबई मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलेले आणि मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम काँग्रेसचे नेते देवरा यांनीही वेगळा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा रविवारी दुसरा टप्पा सुरू होत आहे. त्यामुळे त्याच्या तयारीची धांदल आणि पक्षात उत्साहाचे वातावरण असतानाच देवरा यांच्या या निर्णयामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

यावर भाष्य करताना थोरात यांनी म्हटले आहे, आमचे सहकारी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. राजीनामा देण्यासाठी त्यांनी आज भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभाचा दिवस निवडून यात्रेला एकप्रकारे अपशकून करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. देशातील सर्वसामान्य, गोरगरीब, शोषीत, पीडित जनतेला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ६ हजार ७०० किलोमीटरची यात्रा काढणार्‍या राहुल गांधी यांच्या मार्गात अडथळे आणण्याचा आपला हा प्रयत्न आपले वडील, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते स्वर्गीय मुरली देवरा यांनाही आवडला नसेल, असे थोरात यांनी म्हटले आहे. थोरात यांच्या या पोस्टवर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका यूजरने म्हटले आहे की, बरं झालं सोडलं. ५० वर्षे यांना तिकीट मिळत होतं, एकदा तिकीट नाही मिळालं की लगेच पार्टी बदलतात. अशी लोक नकोच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *