खंड पडलेल्या गणपती मंडळांना पुढच्या वर्षी परवानग्या मिळणार ः पाटील संगमनेरात शांतता समितीची बैठक संपन्न; महावितरण विरोधात अनेकांची नाराजी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
केरळ राज्यात सण-उत्सव साजरे झाल्याने तेथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे शासनाने नाईलाजास्तव काही बंधने पुन्हा घातली. अद्यापही रुग्णसंख्या कमी होत नाहीये म्हणून शासनाकडून लागू असलेल्या कोविड निर्बंधांचे गणेशात्सवात नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले.

संगमनेर शहरातील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील सभागृहात मंगळवारी (ता.7) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे, प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पांडुरंग पवार, सुनील पाटील, उपनगराध्यक्ष आरिफ देशमुख, नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल, नगरसेवक विश्वास मुर्तडक, शैलेश कलंत्री, किशोर पवार, नितीन अभंग, बाळासाहेब पवार, नूरमोहम्मद शेख, माजी नगरसेवक कैलास वाकचौरे, शिवसेना शहरप्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत वामन, एकलव्य आदिवासी बहुउद्देशीय सामाजिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगेश सूर्यवंशी, शरद थोरात, राजेंद्र देशमुख, राजेश आसोपा, शौकत जहागिरदार, निखील पापडेजा, कैलास कासार, योगिराज परदेशी, अक्षय थोरात, दीपक साळुंके, सम्राट हासे, विजय पांढरे आदी उपस्थित होते.

या बैठकीत आलेल्या सूचनांनुसार शांतता समितीची पुनर्रचना करावी. ज्यामध्ये ज्येष्ठ आणि तरुणांचा समावेश असावा. तसेच दर महिन्याला समितीची बैठक बोलवावी, अशी सूचना पोलीस अधीक्षक पाटील यांनी केली. सर्वच धर्मीयांच्या सण-उत्सवात वीज पुरवठा नेहमीच खंडित होतो. गणेशोत्सवात देखील असेच होते. त्यामुळे अनेकांनी महावितरण कंपनीच्या कारभाराविरोधात रोष व्यक्त केला. मात्र, महावितरणचे अधिकारी याविषयी अधिक काहीही बोलले नाहीत. तसेच विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षी गणेश विसर्जनावेळी नागरिकांच्या गणेशमूर्तींचे विधीवत विसर्जन केले. त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. मात्र, त्यांना शांतता समितीच्या बैठकीसाठी निरोप नसल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली.

गेल्या दीड वर्षापासून कोविडचे संकट सुरू आहे. यामुळे सण-उत्सवांवर निर्बंध आलेले आहेत. मात्र पुढच्या वर्षी खंड पडलेल्या गणपती मंडळांना परवानग्या मिळतील.
– मनोज पाटील (पोलीस अधीक्षक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *