शासकीय कर्मचार्यांवर संगमनेरातील वाढते हल्ले चिंताजनक! राजकीय पाठबळ घातक; यंत्रणांनी दबाव झुगारुन प्रवृत्ती ठेचण्याची गरज..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या पाच-सात वर्षात संगमनेरातील एका विशिष्ट समुदायाकडून शासकीय अधिकारी व कर्मचार्यांवर हल्ले करुन त्यांना कर्तव्यापासून रोखण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अगदी पोलीस निरीक्षकांपासून ते वीज कर्मचार्यांपर्यंत अनेकांना हा अनुभव आलेला असतानाही अशाप्रकारची हिंसक प्रवृत्ती ठेचण्यात मात्र यंत्रणा सपशेल अपयशीच ठरल्या आहेत. त्यामुळे मतपेटीच्या राजकारणातून मनोबल उंचावत असलेल्या अशा प्रवृत्तींमध्ये भर पडत असून त्याचे प्रतिबिंब आता शासकीय जागांवर राजरोसपणे अतिक्रमणं करणार्यांच्या प्रतिक्रियेतूनही उमटू लागले आहे. असले प्रकार शहराचे भविष्य खराब करणारे असून राजकीय धुरिणांनी या गोष्टीचे भान ठेवण्याची गरज आहे, अन्यथा काळ त्यांना कधीही माफ करणार नाही अशा प्रतिक्रिया आता जनमानसांतून समोर येवू लागल्या आहेत.
गुरुवारी (ता.१४) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास बेकायदा बांधकामांचे आगार बनलेल्या जोर्वेनाका परिसरातून पुन्हा एकदा संतापजनक प्रकार समोर आला. या परिसरात चक्क लखमीपुरा कब्रस्तान विश्वस्त मंडळाने परस्पर भिंत पाडून अतिक्रमण करीत व्यावसायिक गाळे उभारले आणि शासकीय जागा असल्याचे माहिती असूनही ते परस्पर भाड्यानेही दिले. विशेष म्हणजे या अतिक्रणाबाबत परिसरातील दोन डझनहून अधिक नागरिकांनी पालिकेला लेखी निवेदन दिल्यानंतर संबंधितांना अतिक्रमण काढण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या. ही संपूर्ण प्रक्रिया चार महिन्यांपासून सुरु असूनही शासकीय जागेत दुकान थाटणार्याने त्याला दाद दिली नाही.
अखेर गुरुवारी पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, शहर अभियंता प्रशांत जुन्नरे, अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सुदाम सातपुते व नगर रचनाकार शुभम देसले यांनी प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरु केली. सुरुवातीला पोलीस निरीक्षक भगवान मथुरे स्वतः पथकासोबत असेपर्यंत अतिक्रमणधारक रफीक एजाजुद्दीन शेख उर्फ रफीक सुन्नी व सारीक एजाज शेख उर्फ सर्या या दोघांनी पथकाला अनुकूल भूमिका घेतली, मात्र त्यांनी पाठ दाखवताच ‘इंगा’ जागलेल्या या दोघांनी अचानक पथकातील अधिकारी व कर्मचार्यांना शिवीगाळ करीत रफिक शेख हा थेट मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या अंगावर धावून गेला. यावेळी त्याने आपल्याकडील कागदांचा गठ्ठा थेट मुख्याधिकार्यांच्या अंगावर भिरकावून त्यांना एकेरी भाषेत ‘तुझे देख लुंगा, फिर यही दुकान लगाऊंगा..’ अशी धमकीही भरली.
संगमनेरात घडलेला हा प्रकार तसा मुळीच पहिला नव्हता, मात्र यावेळी मुख्याधिकार्यांसारख्या वरीष्ठ अधिकार्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार एकतर चोर आणि वर शिरजोर वृत्तीसारखाच दिसून आला. याला कारण मतांच्या राजकारणामुळे यापूर्वी शहरात वारंवार घडलेल्या अशा घटनांमधील निष्पन्न सर्व आरोपींना गजाआड करण्यात आणले गेलेले राजकीय अडथळे कारणीभूत असल्याचेही या घटनेतून ठळकपणे समोर आले. अशा घटनामध्येही राजकीय स्वार्थ पाहिला जात असल्याने संगमनेरातील एका विशिष्ट समुदायातील काहींचे मनसुबे आकाशी भिडले असून त्यांच्या कोणत्याही दूष्कृत्याला विरोध झाल्यास थेट अधिकारी अथवा कर्मचार्यांच्या अंगावर धावून जाण्याची वृत्ती वाढीस लागली आहे.
यापूर्वी २०१७ साली तत्कालीन पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना कुरणमध्ये जमावाने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर कोविड निर्बंधाच्या काळात संपूर्ण देश नियमांचे पालन करीत असताना तीनबत्ती चौकात झुंडीने जमलेल्या जमावाला नियमांचे पालन करण्यास सांगणार्या पोलिसांनाच जमावाने पळवून पळवून मारले. त्यावेळी पोलिसांनी साठपेक्षा अधिक गुंड प्रवृत्तीच्या लोकांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचा सपाटा लावला असताना मध्यातच पकडसत्र थांबवण्याची वेळ पोलिसांवर आली. या दरम्यानच्या काळात थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या विद्युत कर्मचार्यांना धक्काबुक्की, मारहाण, शिवीगाळ यासारख्या घटना नियमितपणे घडत राहिल्या.
या सर्व प्रकारातून राजकीय आशीर्वादामुळे संगमनेरचे सामाजिक स्वास्थ बिघडत असल्याचे वारंवार समोर येत असतानाही आपल्या मतांच्या राजकारणासाठी काहींचे लांगनचालन सुरुच असल्याने भविष्यात संगमनेरातील सामाजिक सलोखा नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. वेळीच त्यावर नियंत्रण आणण्याची आवश्यकता असून यंत्रणांनीही अशा प्रकरणात दबाव झुगारुन धडक कारवाई करण्याची व अशाप्रकारच्या प्रवृत्ती समूळ ठेचण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात ऐतिहासिक शहराचे बिरुद मिरवणार्या संगमनेरातील वातावरण कायमस्वरुपी खराब झाल्याशिवाय राहणार नाही.
मागील काही वर्षांत संगमनेरातील एका विशिष्ट समुदायातील काहींकडून सातत्याने बेकायदा कृत्य करण्यात येत आहेत. त्याला प्रतिबंध करण्यासाठी जाणार्या शासकीय अधिकारी व कर्मचार्यांना दमदाटी, शिवीगाळ व मारहाण असे कायद्याच्या राज्याला मारक असलेल्या गोष्टीही त्यातून समोर येवू लागल्याने एकंदरीत शहराचे सामाजिक स्वास्थ व्हेंटीलेटरच्या दिशेने जात असल्याचेही वेळोवेळी दिसून आले आहे. काहीही करा आणि राजकीय पाठबळाने त्यापासून बचाव करा अशी प्रवृत्तीही या माध्यमातून वाढत चालल्याने राजकीय धुरिणांनी केवळ आपल्या मतपेटीचा विचार न करता ऐतिहासिक संगमनेर शहराच्या संस्कृतीलाही बाधा पोहोचणार नाही याचा विचार करण्याची गरज आहे. अन्यथा काळ त्यांना कधीही माफ करणार नाही अशा संतप्त प्रतिक्रियाही आता सामान्यांमधून उमटू लागल्या आहेत.