राहुरी मतदारसंघातील विकासकामांची निविदा प्रक्रिया सुरू आमदार प्राजक्त तनपुरे; सरकारला खंडपीठाने दिली चपराक


नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील 8 कोटी 50 लाख रुपयांच्या विकासकामांना शिंदे-फडणवीस सरकारने 20 जुलै, 2022 रोजी स्थगिती दिली होती. मात्र, आता या कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

शासनाच्या या निर्णया विरोधात 12 ऑक्टोबर 2022 रोजी ग्रामस्थांच्या आग्रहानुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून दाद मागितली होती. अखेर न्यायालयाने स्थगिती उठवत शिंदे-फडणवीस सरकारला दणका दिला. तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात सुमारे 39 विविध विकासकामांना सुमारे 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला होती. विविध कामांना प्रशासकीय मंजुरी व कार्यारंभ आदेशही मिळालेले होते.
परंतु राज्यात अचानक सत्ताबदल झाल्याने विद्यमान सरकारने 20 जुलै 22 रोजी स्थगिती दिली. सरकारच्या या स्थगिती निर्णयाच्या विरोधात आमदार तनपुरे व ग्रामस्थ यांनी औरंगाबाद खंडपीठात 12 ऑक्टोबर 22 रोजी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल देत शिंदे-फडणवीस सरकारला चपराक दिली. मध्यंतरी आमदार तनपुरे यांनी महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव यांची मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन या कामास त्वरित चालना द्यावी, अशी मागणीही पत्राद्वारे केली होती. शासनाच्या ग्रामविकास विभागाने निविदा प्रक्रिया सुरू केल्याने विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

लवकरच या कामांना कार्यारंभ आदेश होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. विकासकामांच्या स्थगिती विरोधात आमदार तनपुरे यांनी ग्रामस्थांसमवेत मतदारसंघात सायकल यात्रा आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधून घेतले होते व ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली होती. या अनोख्या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली होती. निंभेरे-कानडगाव रस्ता, बाभुळगाव ते नांदगाव रस्ता, बारागाव नांदूर गावठाण ते ब्रह्मटेक रस्ता, ताहराबाद येथील भैरवनाथ सभा मंडप, संत महिपती महाराज मंदिर ते वरशिंदे फाटा रस्ता, ताहाराबाद बेलकरवाडी रस्ता, चेडगाव येथील सतीमाता मंदिर ते तरवडे वस्ती रस्ता, तांभेरे ते भवाळ वस्ती चिंचोली रस्ता, नागरदेवळे येथील अमेयनगर शाळेपासून ते केशरनगर रस्ता, शिंगवे केशव ते मोरगव्हाण रस्ता, कोल्हार कोल्हुबाई रस्ता, मिरी येथील गुरु आनंद गोशाळा रस्ता, मिरी येथील झोपडपट्टी ते धुमाळ वस्ती रस्ता, मोहोज रस्ता, वाघाचा आखाडा पटारे ते चिंतामणी मळा रस्ता, ब्राह्मणी येथील बानकर व गायकवाड वस्ती रस्ता, जुना बाजारतळ देवीचा मळा रस्ता व प्रेमसुख राजदेव वस्ती रस्ता, आरडगाव म्हसेे-इंगळे वस्ती रस्ता, तमनर आखाडा ते पिंप्री अवघड रस्ता, खडांबे खुर्द ते रसाळ विटभट्टी रस्ता, भुजाडी वस्ती ते रेल्वेपूल रस्ता, खडीक्रशर ते कारखाना रस्ता, मल्हारवाडी गागरे वस्ती रस्ता, सात्रळ उजवा कालवा ते नालकर गिते वस्ती रस्ता, गागरे वस्ती ते डुकरे डेअरी रस्ता, घोरपडवाडी सभामंडप, बारागाव नांदूर ते रोडाई रस्ता, केंदळ बुद्रुक आरोग्य केंद्र ते तारडे वस्ती रस्ता या गावातील विकासकामांचा समावेश आहे. निविदा प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Visits: 132 Today: 1 Total: 1101497

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *