चिंचविहिरे येथे नवविवाहितेचे शेततळ्यात उडी मारून आत्महत्या सासरच्यांनी मारहाण करून ठार केल्याचा माहेरच्या मंडळींचा आरोप

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील चिंचविहिरे येथे बुधवारी (ता.23) पहाटे नवविवाहित तरुणीने सासरच्या त्रासाला कंटाळून शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली आहे. सात महिन्यांपूर्वी तिचा विवाह झाला होता.

अश्विनी गौतम नरोडे (वय 20, रा.चिंचविहिरे) असे मयत विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, सकाळी मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीला ठार मारून, शेततळ्यात टाकले असा आरोप त्यांनी सासरच्या मंडळींवर केला. अंत्यविधी झाल्यावर फिर्याद द्यायला या. गुन्हा दाखल केला जाईल असा सल्ला पोलिसांनी त्यांना दिला.
याबाबत पत्रकारांशी बोलतांना मयत अश्विनी नरोडेचे वडील अरुण दादासाहेब मिजगुले (रा.कोल्हार) म्हणाले, अश्विनीचा विवाह कोरोना लॉकडाऊन काळात 18 एप्रिल, 2020 रोजी कोल्हार येथे रीतीरिवाजानुसार करुन दिला. सुरुवातीचे दोन महिने व्यवस्थित गेले. नंतर सासरच्या मंडळींनी अश्विनीला त्रास देण्यास सुरवात केली. मुलीने वेळोवेळी माहेरच्या लोकांना सांगितले. परंतु, सर्वांनी तिला समजावून सांगितले. पण त्याचा उपयोग झाला नाही. बुधवारी (ता.23) पहाटे साडेचार वाजता अश्विनीने मोबाईलवर मेसेज पाठवला. मला सासरचे सर्वजण मारहाण करीत आहेत. मला मारून टाकतील असे तिने कळविले. काही वेळाने मुलीचे सासरे विजय शंकर नरोडे यांनी अश्विनीने आत्महत्या केली असे फोनवरुन कळविले.

अश्विनीचे चुलते माधव दादासाहेब मिजगुले म्हणाले, मंगळवारी (ता.22) रात्री अकरा वाजता मला फोन करून, सासरचे लोक शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याचे अश्विनीने सांगितले. तिची समजूत काढून सकाळी येतो असे सांगितले. परंतु सकाळी अश्विनीच्या मृत्यूची माहिती समजली. अश्विनीचा पती गौतम विजय नरोडे, सासरा विजय शंकर नरोडे, सासू सोनाली विजय नरोडे व सावत्र सासू प्रतिभा विजय नरोडे यांनी अश्विनीला मारहाण करून जीवे ठार मारले. नंतर तिचा मृतदेह शेततळ्यात टाकला आहे. याप्रकरणी सध्या राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Visits: 91 Today: 1 Total: 1112698

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *