आगामी काळात अकोले तालुक्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता! ज्येष्ठ नेते मधुकर नवले व मीनानाथ पांडे यांच्यासह सहकार्यांचा काँग्रेस प्रवेश
नरेंद्र देशमुख, अकोले
आगामी वर्ष 2021 हे अकोले तालुक्याच्या दृष्टीने निवडणुकांचे वर्ष ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर तालुक्यात मोठ्या राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. त्याचा प्रारंभ ज्येष्ठ नेते मधुकर नवले व मीनानाथ पांडे यांच्या काँग्रेस प्रवेशाने झाली आहे. यामुळे गलितगात्र झालेल्या काँग्रेसला नवी ऊर्जा मिळाली आहे.
नववर्षाच्या प्रारंभीच ग्रामपंचायत, नगरपंचायत, अगस्ति साखर कारखाना व दूध संघ अशा निवडणुका होऊ घातल्या आहेत. याचा परिणाम राजकीय पक्षांमध्ये होऊन अनेकांचे स्थित्यंतरे पहायला मिळणार आहेत. त्याची पहिली झलक मधुकर नवले व मीनानाथ पांडे यांच्या काँग्रेस प्रवेशाने झाली. मंगळवारी (ता.22) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मुंबईतील काँग्रेस भवनमध्ये प्रवेश झाला. यातील ज्येष्ठ नेते मधुकर नवले हे पूर्वाश्रमीचे कम्युनिस्ट नंतर त्यांनी स्व.विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना पिचड पिता-पुत्रांबरोबर भाजपमध्ये जावे लागले. विधानसभा निवडणुकीत माजी आमदार वैभव पिचड यांच्या पराभवानंतर ते भाजपपासून अंतर ठेवून होते. अकोले तालुक्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील असे अंदाज बांधले जात होते. परंतु त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने त्या शक्यतेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. त्यांनी ‘आपण थोरात हे एक विद्यापीठ असून त्या विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचे सांगितले’. सहकारी संस्था कशा चालवाव्यात ह्याचे धडे आपण स्व.भाऊसाहेब थोरात व त्यानंतर मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून गिरवल्याचे सांगितले.
मीनानाथ पांडे हे अगस्ति साखर कारखान्याचे संचालक असून माजी मंत्री मधुकर पिचडांचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. त्यांना भाजप प्रवेश रूचलेला नव्हता. त्याबाबत त्यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यांनी अनिच्छेने भाजप प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी भाजपविरोधात उस्फूर्त प्रतिक्रिया दिली होती. कट्टर शरद पवार समर्थक असल्याने त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन शिलेदारांनी त्यांना दूरच ठेवले. त्यांना भाजपमध्येही कोणी विचारेना आणि राष्ट्रवादीतही जवळ करेनात. संगमनेर साखर कारखान्याचे दोनदा संचालक असल्याने त्यांचा मंत्री बाळासाहेब थोरातांशी चांगला संबंध होता. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक साधर्म्य असणारी काँग्रेस जवळ केली.
रमेश जगताप हे बुवासाहेब नवले पतसंस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष असून, सुमारे एकवीस वर्षे पंचायत समितीचे सदस्य होते. ते मधुकर नवले यांचे कट्टर समर्थक आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस मदन पथवे हे कॉम्रेड सक्रु बुधा मेंगाळ यांचे नातू आहेत. पाटीलबुवा सावंत हे रूंभोडीचे माजी सरपंच आहेत. समशेरपूरचे भास्कर दराडे, सावरगाव पाटचे रमेश पवार व देवठाणचे एकनाथ सहाणे हेही नवले समर्थक असल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे नवले व इतरांनी काँग्रेस प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. यामुळे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे तर गलितगात्र काँग्रेसला संजीवनी मिळाली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये काय उलथापालथ होते हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल.