आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडला विकासाचा रोड मॅप! पाच वर्षात पन्नास वर्षांचे ‘व्हिजन’; लोकविचारातून विकासाच्या दिशेने प्रवास..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणचे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून संगमनेरातही त्याचे प्रतिबिंब बघायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून पालिकेतील सत्ताधारी गटाचे नेतृत्त्व करणार्या आमदार सत्यजीत तांबे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत आपल्या नजरेतून संगमनेरच्या विकासाचा रोड मॅप सादर करताना लोकविचारातून शहर विकासाचे पुढील 50 वर्षांचे ‘व्हिजन’ जनतेसमोर ठेवले. यावेळी त्यांनी यापूर्वीच्या त्यांच्या सत्ताकाळाचा मागोवा घेताना पिण्याच्या पाण्यापासून उद्यानांच्या शहरापर्यंत झालेला विकास पत्रकारांच्या दृष्टीसमोर आणला. मागील साडेतीन दशकांत केलेल्या प्रामाणिक कामांची शिदोरी घेवूनच आपण मतदारांसमोर जात असल्याचे सांगत त्यांनी आगामी निवडणूक ‘व्हिजन’ विरुद्ध ‘डिव्हिजन’ असल्याचे सांगितले. या दरम्यान त्यांनी गेल्या वर्षभरातील विविध घटनांचा उल्लेख करीत शहराच्या शांतता व सुव्यस्थेवरही बोटं ठेवले. पोलिसांचा धाकच संपल्याने शाळा-महाविद्यालयाजवळ अमलीपदार्थ विक्रीची केंद्र सुरु होवून विद्यार्थीदशेतील मुलं व्यसनाच्या आहारी जात असल्याच्या गंभीर विषयाकडेही त्यांनी लक्ष वेधले.

पुढील महिन्यात होत असलेल्या पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार सत्यजीत तांबे यांनी सत्ताधारी गटाचा निवडणूक जाहीनामा मांडण्यासाठी गंगामाई परिसरात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी सुरुवातीलाच त्यांनी तीन दशकांपूर्वी पर्यंत संगमनेरात असलेल्या पाणी टंचाईचा उल्लेख करीत पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटल्याचे समाधान व्यक्त केले. शहरात झाडांची मर्यादीत संख्या लक्षात घेवून पालिकेने दंडकारण्य अभियानात सहभागी होवून शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करुन त्यांचे संवर्धन केल्याने संगमनेरातील झाडांची संख्या वाढली, कधीकाळी केवळ एकमेव असलेल्या नेहरु उद्यानाच्या जागी आज शहरात प्रभागनिहाय विस्तारलेल्या असंख्य उद्यानांची संख्याही त्यांनी विशद् केली. या कालावधीत गावठाणातून उपनगरांत वाढत असलेल्या शहरात राहणार्यांसाठी मूलभूत सुविधांची उपलब्धता करुन देण्यासाठी झालेल्या कामांचा दाखला देत विकासाची हिच शिदोरी घेवून आम्ही मतदारांचा आशीर्वाद मागत असल्याचे ते म्हणाले.

संगमनेर नगरपालिकेच्या कारभारात पहिल्यांदाच लक्ष घालण्याची संधी मिळाल्याने आपण पुढील पाच वर्षांच्या काळात शहराच्या 50 वर्षांचा विकास डोळ्यासमोर ठेवून काम करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी भरली. कोणताही शाश्वत विकास लोकविचार आणि लोकसहभागावर अवलंबून असल्याचे सूत्र मांडताना आमदार तांबे यांनी विकासाचा आराखडा तयार करताना त्यात लोकसहभाग असावा या प्रामाणिक हेतूने शहराचा विकास कशापद्धतीने व्हावा याबाबत संगमनेरकरांच्या सूचनाही मागितल्या. पुढील आठ दिवसांत प्राप्त होणार्या सूचनांचा समावेश करुन शहर विकासाचा अंतिम आराखडा जनतेसमोर मांडणार असल्याची घोषणाही त्यांनी या पत्रकार परिषदेतून केली.

शहराचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवताना जनतेच्या मनातील उमेदवारांकडूनच तो घडवण्याचा मानस असल्याचे सांगत आमदार तांबे यांनी वारंवार समोर येणार्या चेहर्यांना यंदा संधी नसल्याचेही संकेत दिले. मागील चार वर्ष पालिकेत प्रशासकांचे राज्य असल्याने शहराच्या विकासावर त्याचा वाईट परिणाम झाल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. अवघ्या तीन महिन्याच्या काळात पालिकेने चार मुख्याधिकारी पाहिले. अधिकारी येतो, खुर्चीत बसतो, एखादी बैठक बोलावतो आणि ती संपण्यापूर्वीच त्याच्या बदलीचा आदेश येतो. त्यातून अस्थिरता निर्माण झाली असून त्याचा फटका सर्वसामान्य माणसाला बसत आहे. त्यातून बाहेर पडून शहराला पुन्हा विकासाच्या महामार्गावर नेण्यासाठी संगमनेरकर जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आम्ही आमचा अजेंडा घेवून जनतेच्या दरबारात जात असून महायुतीने त्यांचा अजेंडा समोर आणावा. शेवटी लोकशाहीत मतदार सर्वोच्च असून कोण पालिकेत चांगले काम करु शकेल, कोणाकडे शहर विकासाची दृष्टी आहे, मागील काळात कोणी चांगले काम केले आहे, कोण शहरातील शांतता व सुव्यवस्था टिकवून छोटे-मोठे व्यापारी व उद्योजक यांना संरक्षण देवू शकतो याचा निर्णय जनता करील. अलिकडच्या काळात फ्लेक्सच्या माध्यमातून सुरु झालेला शहर विद्रुपीकरणाचा कार्यक्रम पाहता पालिकेत पुनरागमन झाल्यानंतर कोणत्याही स्थितीत फ्लेक्स हद्दपार होतील असा कठोर इशाराही आमदार तांबे यांनी दिला.

गेल्या वर्षभरातील कारभार जनता बघत आहे असे म्हणत अप्रत्यक्षपणे त्यांनी आमदार अमोल खताळ यांच्यावरही निशाणा साधला. मागील काही काळात शहरात अमलीपदार्थांची रेलचेल वाढली असून शहरातील सार्वजनिक ठिकाणांचा वापर नशा करण्यासाठी होत असल्याकडे त्यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले. आसपास मोठी लोकवस्ती असलेल्या जाणताराजा मैदानाचा उल्लेख करीत त्यांनी रात्रीच्या अंधारात या मैदानात बसणारे नशेखोर आता शेकोट्या पेटवून दारु, गांजा व अमलीपदार्थांच्या पार्ट्या करीत असल्याचे भयानक चित्र रोजच बघायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचकच दिसत नसल्याने यापूर्वी कधीही झाली नव्हती इतकी वाईट स्थिती शहरात असल्याचेही त्यांनी काही उदाहरणांसह लक्षात आणून दिले.

शहर पोलीस ठाण्यातील अधिकार्यांदेखत तरुणांचे दोनगट एकमेकांवर धावून जातात, राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या शहरप्रमुखांना श्रीमुखात दिली जाते, चक्क पोलीस निरीक्षकांच्या खुर्चीला लाथ घातली जाते, अकोले नाक्यासारख्या अतिशय रहदारीच्या रस्त्यावर गुन्हेगारांच्या टोळ्या निर्माण होवून रात्री या भागातून प्रवास करणार्यांना लुटले जाते. लालतारा वसाहतीच्या पाठीमागील बाजूच्या धक्का भिंतीवर रात्री काय चालते?, मालदाड रोडसारख्या गजबजलेल्या रस्त्यावर महिलांची उघड छेडछाड यासारखे प्रकार यापूर्वी कधीही संगमनेरात घडले नव्हते. यासर्व घटना शहरात पोलिसांचा ‘धाक’ संपल्याचे दाखवणार्या असल्याचा घणाघाती आरोपही आमदार तांबे यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या स्नेहपूर्ण संबंधावर भाष्य करताना आमदार तांबे यांनी त्यांचे आशीर्वाद नेहमीच लाभत असल्याचे सूचक वक्तव्य केले. मागील काळात जेव्हा केव्हा तालुक्याच्या विकासासाठी निधीची गरज भासली तेव्हा त्यांनी उदारमनाने त्याची पूर्तता केल्याचा दाखलाही त्यांनी यावेळी जोडला. आमदार अमोल खताळ यांच्याशी निधीवरुन रंगणार्या श्रेयवादावरही मोकळेपणाने भाष्य करताना आमदार तांबे यांनी ‘ज्याने निधी आणला, त्यानेच त्याचे श्रेय घ्यावे’ असे प्रामाणिक मत व्यक्त केले. त्यासाठी त्यांनी अलिकडेच चर्चेत आलेल्या आणि दोघांनाही समान मिळालेल्या पाणंद रस्त्यांच्या प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा दाखलाही जोडला.

सुदैवाने संगमनेर तालुक्याला दोन आमदार असल्याचा उल्लेख करीत त्यांनी दोघांनीही निधी आणण्यासाठी, विकास कामे करवून घेण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करताना तसा दृष्टीकोन आणि मनाचा मोठेपणा विरोधी आमदाराकडे नसल्याची कोपरखळीही त्यांनी दिली. एकाबाजूला विकासाचे निश्चित ‘व्हिजन’ असलेले तर, दुसर्या बाजूला केवळ ‘डिव्हिजन’ असलेली माणसं असल्याचे सांगत यंदाची लढाई ‘व्हिजन’ विरुद्ध ‘डिव्हिजन’ असल्याचे ते म्हणाले.

आजवर संगमनेर शहराच्या विकासासाठी खूप कामं केली आहेत, भविष्यातही अजून खूप कामं करायची आहेत व सोबत कमालही करुन दाखवायची आहे. शेवटी जनतेच्या मनात जो नगराध्यक्ष असेल, नगरसेवक असेल तोच उमेदवार म्हणून देण्याचा आणि त्याच्या माध्यमातून शहर विकासाचे ‘व्हिजन’ पुढे नेण्याचा प्रयत्न असून संगमनेरकर आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना भरभरुन पाठींबा देतील असा ठाम विश्वासही आमदार सत्यजीत तांबे यांनी या पत्रकार परिषदेतून व्यक्त केला.

युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदापासून संघटनात्मक पातळीवर 1999 पासून कार्यरत असलेल्या आमदार सत्यजीत तांबे यांनी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंत मजल मारली. या दरम्यान दोनवेळा त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून आपल्यातील कर्तृत्वाची झलकही दाखवली. मात्र ज्याप्रमाणे एखाद्या मोठ्या वृक्षाच्या सावलीत छोटी झाडं वाढत नाहीत, त्याप्रमाणे त्यांना स्वतंत्रपणे आपल्या ‘व्हिजन’ प्रमाणे कधीही काम करण्याची संधी मिळाली नाही. यावेळी पहिल्यांदाच संगमनेर नगरपालिकेची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली जात असून त्यासाठी त्यांनी पुढील पाच वर्षात 50 वर्षांच्या विकासाची संकल्पना मांडून संगमनेरकरांना पाठबळ देण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या हाकेला संगमनेरकर कसा प्रतिसाद देतात हे येणार्या 3 डिसेंबररोजी स्पष्ट होणार आहे.

