देवगडला विष्णूदत्त व लक्ष्मीनारायण यागाची सांगता
देवगडला विष्णूदत्त व लक्ष्मीनारायण यागाची सांगता
नायक वृत्तसेवा, नेवासा
पुरुषोत्तम तथा अधिक मासाचे औचित्य साधून नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील प्रांगणात असलेल्या सुलक्षण यज्ञ मंडपात कोरोनाची महामारी जावी, जागतिक आपत्तीचे निराकरण व्हावे म्हणून आयोजित विष्णूदत्त व लक्ष्मीनारायण यागाची वेदमंत्राच्या जयघोषात महंत भास्करगिरी महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज मंदीर देवस्थानचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते पूर्णाहुती देऊन सांगता करण्यात आली.
सलग सात दिवस चाललेल्या विष्णूयाग, दत्तयाग, लक्ष्मीनारायण यागप्रसंगी अहमदनगर येथील राहुल ठोंबरे व किशोर मिसाळ यजमानांच्या हस्ते सपत्नीक शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करण्यात आली. यामध्ये प्रायश्चित्त, पुण्याहवाचन, गणेश पूजन, मातृका पूजन, योगिनी पूजन, वास्तूमंडल पूजन, सर्वतोभद्रमंडल पूजन, नवग्रह पूजन, भैरवमंडल पूजन, वारूणीमंडल पूजन, प्रवरामाई तीर्थपूजन या विधींचा समावेश होता. याग यज्ञाचे पौरोहित्य भेंडा येथील गणेशदेवा कुलकर्णी व शरद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पैठणचे पुरोहित भूषण कुलकर्णी, नाशिकचे शंभो त्रिपाठी, हेमंत कुलकर्णी, स्वप्नील वाहेगावकर यांनी केले. यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग, बाळासाहेब मुरकुटे, काशिनाथ नवले, मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, देवगड भक्त परिवारातील संतसेवक बजरंग विधाते, रामजी विधाते, रामकृष्ण मुरदारे, चांगदेव साबळे, मनोज पवार, मारुती साबळे, संदीप साबळे उपस्थित होते.