बोलकीमध्ये दोन गटांत हाणामारी; एका महिलेचा विनयभंग कोपरगावात तालुका पोलिसांत परस्पर फिर्यादींवरुन गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील बोलकी येथील 31 वर्षीय महिलेचा ती आपल्या नातेवाईकांसह रस्त्याने जात असताना त्याच गावातील दोघांनी तिचा विनयभंग केला आहे. तिच्या नातेवाईकांनी तिला सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही लोखंडी रॉडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

पीडित महिला नातेवाईकांसह रस्त्याने जात असताना प्रसाद महाले व त्याचा भाऊ गौरव महाले या दोघांनी तिला उसाच्या शेतात ओढले व तिच्या अंगावरील कपडे फाडून तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. बरोबर असलेल्या नातेवाईकांनी तिची सुटका करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही या आरोपींनी लोखंडी रॉडच्या सहाय्याने मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी असल्याची फिर्याद पीडितेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. यावरुन पोलिसांनी प्रसाद महाले व गौरव महाले यांच्याविरुद्ध भादंवि कलम 354, 324, 323, 504, 506, 509, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

तर विरोधी गटाच्या मनीषा प्रसाद महाले यांनीही कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यात विनयभंगाबाबत तक्रार करणार्या महिलेचे व तिचे अन्य नातेवाईक मीनाक्षी भगवानदास महाले, भगवानदास पंढरीनाथ महाले, रचना शिवाजी महाले, शिवाजी पंढरीनाथ महाले, रंजना रामदास महाले, रामदास पंढरीनाथ महाले यांच्या विरोधात गैरकायद्याची मंडळी जमवून आपल्याला घराबाहेर बोलावून, तु आमच्या भांडणात का पडते, तुझा काहीएक संबंध नाही. ती जमीन आमची आहे. ती तुला मिळणार नाही, असे म्हणत मीनाक्षी महाले हिने शिवीगाळ करून मारहाण केली. तर रचना महाले व रंजना महाले यांनी फिर्यादीस धक्का देऊन व मारहाण करून खड्ड्यात ढकलून दिले. यामुळे उजव्या पायाच्या हाडास तडा गेला. दरम्यान, मनीषा महाले यांचे पती व मुलगा हे भांडण सोडविण्यास गेले असता त्यांनाही शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावरुन पोलिसांनी वरील आरोपींविरुद्ध भादंवि कलम 143, 147, 149, 325, 324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
