मराठा आरक्षणासाठी संगमनेरात रास्ता रोको
मराठा आरक्षणासाठी संगमनेरात रास्ता रोको
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा लोकप्रतिनिधींच्या घरासमोर, कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन आरक्षणाची जोरदार मागणी होत असतानाच बुधवारी (ता.23) सकाळी साडे दहा वाजता संगमनेर बसस्थानकासमोर मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले.
मराठा आरक्षण कायद्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यभर आंदोलनाची राळ उठलेली असताना संगमनेरातही याचे पडसाद उमटताना दिसले. आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करून स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करावे, चालू शैक्षणिक वर्षात मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी सरकारने प्रयत्न करावे, न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत भरतीसंदर्भात ज्या जाहिराती निघालेल्या होत्या; तसेच प्रवेश प्रक्रिया सुरू होत्या त्या ‘एसईबीसी’ प्रमाणेच झाल्या पाहिजे, नोकरी भरती झालेल्यांना सामावून घ्यावे, यांसह विविध मागण्यांवर सरकारने निर्णय घ्यावा यासाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत आरक्षणाची जोरदार मागणी केली.