स्वातंत्र्य दिनापूर्वीच ओसंडण्याची परंपरा यंदा खंडीत होणार? जिल्ह्यापाठोपाठ पाणलोटातही पूर्णतः उघडीप; धरणांमध्ये मात्र समाधानकारक पाणीसाठा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहिल्यानगर जिल्ह्याची चेरापूंजी समजल्या जाणार्या अकोले तालुक्यातील पश्चिम घाटमाथ्यावर गेल्या मे पासून कमी-अधिक प्रमाणात कोसळणार्या पावसाने आता पूर्णतः उघडीप दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या क्षमतेच्या मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणात होणारी पाण्याची आवक जवळजवळ रोडावली असून सध्या सोडण्यात येत असलेल्या किरकोळ आवर्तनातूनही धरणांमधील पाणीसाठा कमी होत आहे. मुळा व प्रवरा नदीच्या खोर्यात जुलै-ऑगस्ट या कालावधीत तुफान पाऊस होतो. त्यामुळे काही अपवाद वगळता गेल्या 99 वर्षांच्या इतिहासात भंडारदरा धरण अनेकवेळा 15 ऑगस्टपूर्वीच भरले आहे. विशेष म्हणजे यंदा मे महिन्यापासूनच पाणलोटात पावसाला सुरुवात झाली होती, या दरम्यान धरणांमधील पाणीसाठा वेगाने वाढल्याने भंडारदरा व निळवंडे या दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्गही सोडण्यात आला. त्यातून यंदा ही दोन्ही धरणं जून-जुलैतच भरतात की काय अशीही स्थिती निर्माण झाली असताना आता चक्क जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसह पाणलोटातही पावसाने पूर्णतः विश्रांती घेतल्याने या तिनही धरणांमध्ये होणारी आवक जवळजवळ थांबली आहे. त्यामुळे भंडारदरा धरण यंदा स्वातंत्र्यदिनापूर्वीच ओसंडण्याची आपली परंपरा जोपासणार की ती खंडीत होणार याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. सध्या या तिनही धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक असून आठ दिवसांच्या सातत्यपूर्ण पावसाने ती तुडूंब होवू शकतात.

यावर्षी राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्याच्या दोन्ही भागात मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. विशेष म्हणजे एरव्ही परतीच्या पावसासह धरणांच्या पाणलोटात अभावाने कोसळणार्या अवकाळी पावसाने अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्वच छोट्या-मोठ्या धरणांच्या पाणलोटात हजेरी लावल्याने प्रत्यक्ष मान्सूनच्या आगमनापूर्वीच धरणांमध्ये पाण्याची आवक सुरु झाली होती. त्यातच जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनही दाखल झाल्याने एकवेळ जूनमध्येच धरणं भरतात की काय असेही चित्र दिसू लागले होते. मात्र जूनचा मध्य येतायेता लाभक्षेत्रातील पाऊस पूर्णतः थांबला आणि पाणलोटातील पावसाचा जोरही कमी झाला. त्या उपरांतही त्यात सातत्य राहिल्याने या कालावधीत धरणांमधील पाणीसाठे हलते राहीले.

जूनच्या मध्यात लाभक्षेत्रातून गायब झालेला पाऊस थेट जुलैच्या दुसर्या पंधरवड्यात परतला. या दरम्यान लाभक्षेत्रातील जवळजवळ सर्वच भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकर्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले. या कालावधीत धरणांच्या पाणलोटातही पावसाचे तांडव सुरु झाल्याने मुळा व प्रवरा या प्रमुख नद्यांसह कृष्णवंती, आढळा व म्हाळुंगी या नद्याही ओसंडून वाहू लागल्या. त्याचा परिणाम यंदा जून-जुलैतच प्रवरा नदीतून मोठ्या प्रमाणात ओव्हरफ्लोचे पाणी वाहील्याने जायकवाडी जलाशयातही मोठ्या प्रमाणात पाण्याची जावक झाली. गोदावरीच्या खोर्यातही तुफान पावसामुळे नद्या ओसंडल्याने नांदूरमधमेश्वर बंधार्यातूनही जायकवाडीच्या दिशेने मोठा प्रवाह वाहून यंदा उर्ध्व गोदावरी खोर्यावरील समन्यायीचे संकट टाळले गेले.

विशेष म्हणजे धरणांच्या पाणलोटात पावसाचे एकामागून एक विक्रम होत असतानाही लाभक्षेत्राला मात्र आषाढसरींवरच तहाण भागवावी लागल्याने ऐन पावसाळ्यात उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या कालव्यांमधून सिंचनासाठी पाणीही सोडण्याची वेळ आली. तेव्हापासून अद्यापही मुळा, निळवंडे व भोजापूर धरणाच्या कालव्यांचे आवर्तन सुरु असून भंडारदरा व आढळा धरणाचे आवर्तन बंद करण्यात आले आहे. जुलै संपतासंपता आता लाभक्षेत्रासह पाणलोटातील पावसानेही हळूहळू विश्रांती घेत आता पूर्णतः उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणांमधील पाण्याची आवक अत्यंत खालावली असून सिंचनासाठी अथवा नदीपात्रात सोडलेल्या आवर्तनातून भरपावसाच्या कालावधीत धरणांमधील पाणीसाठे खालावत आहेत.

मागील चोवीस तासांचा विचार करता मुळा धरणात 135 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असून सध्या धरणाच्या कालव्यातून सुरु असलेल्या 1 हजार 550 क्यूसेक विसर्गात 162 दशलक्ष घनफूट पाणी खर्ची झाले आहे, या आवर्तनासाठी धरणाच्या साठ्यातील 27 दशलक्ष घनफूटाचाही वापर
झाला आहे. भंडारदरा धरणाच्या कालव्यांचे आवर्तन थांबवण्यात आले असले तरीही विद्युत निर्मितीसाठी 830 क्यूसेकचा विसर्ग सुरु असल्याने त्यात आवक झालेल्या 60 दशलक्ष घनफूटासह धरणसाठ्यातील 11 दशलक्ष घनफूट असे एकूण 71 दशलक्ष घनफूट पाणी खर्ची पडले आहे. निळवंडे धरणातून प्रवरापात्रात 300 क्यूसेकच्या प्रवाहासह कालव्यांद्वारा 623 क्यूसेक पाणी सोडले जात आहे. त्यात 80 दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला असून धरणसाठा स्थिर आहे. भोजापूरच्या कालव्यातूनही सध्या 150 क्यूसेकचा प्रवाह कायम असल्याने धरणात आवक झालेल्या सात दशलक्ष घनफूटासह धरणातील सहा असे एकूण 13 दशलक्ष घनफूट पाणी वापरण्यात आले आहे.

एकंदरीत गेल्या मोठ्या कालावधीपासून लाभक्षेत्रातून गायब झालेल्या मात्र पाणलोट क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात टिकून असलेल्या पावसाने आता संपूर्ण जिल्ह्यातच उघडीप दिल्याने सूर्यनारायणाच्या दर्शनासह धरणांमधील पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे जून-जुलैतच ओसंडण्याची शक्यता निर्माण झालेले भंडारदरा धरण यंदा 15 ऑगस्टपूर्वी भरण्याची परंपरा जोपासणार का अशी शंका निर्माण झाली आहे. गेल्या चोवीस तासांत पाणलोटात किरकोळ स्वरुपाचा पाऊस झाला असला तरीही त्याचा पाणीसाठ्यावर फारसा परिणाम नसल्याने व हवामान खात्यानेही 8 ऑगस्टपर्यंत पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज वर्तवल्याने यावेळी भंडारदर्याची पंरपरा खंडीत होण्याचीच अधिक शक्यता आहे. मात्र अवघ्या आठवड्याभराच्या पावसात हे चित्र पालटूही शकते.

यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील बहुतेक विभागांसह अकोले तालुक्यातील सर्वच छोट्या-मोठ्या धरणांच्या पाणलोटात मे महिन्यापासूनच चांगला पाऊस पडल्याने पाणलोटासह लाभक्षेत्रातही समाधानाचे वातावरण निर्माण झाले. मे पाठोपाठ जूनमध्येही पाणलोटातील पावसाने सातत्य ठेवताना जुलैच्या दुसर्या पंधरवड्यात त्याचा जोर पुन्हा वाढल्याने सुरुवातीला जून आणि नंतर जुलैतच भंडारदरा व निळवंडे ही दोन्ही
धरणं भरतील अशी स्थिती होती. मात्र गेल्या आठवड्यापासून कमीकमी होत गेलेल्या पावसाने आता लाभक्षेत्रासह पाणलोटातूनही काढता पाय घेतल्याने यंदा बहुतांशवेळा 15 ऑगस्टपूर्वी ओसंडणारे भंडारदरा धरण आपली परंपरा खंडीत करण्याची शक्यता आहे. आज सकाळी सहा वाजता मुळा धरणात 23 हजार 426 दशलक्ष घनफूट (90.10 टक्के), भंडारदरा 9 हजार 703 दशलक्ष घनफूट (87.90 टक्के) व निळवंडे 7 हजार 557 दशलक्ष घनफूट (90.83 टक्के) इतका पाणीसाठा होता. भंडारदरा भरण्यासाठी अद्यापही 1 हजार 336 दशलक्ष घनफूट पाण्याची आवश्यकता असून सध्या धरणात अवघ्या ताशी 2.5 दशलक्ष घनफूट वेगाने पाणी येत आहे, पाऊस थांबल्याने त्यातही घट होण्याची शक्यता आहे.

