दहा ऑक्टोबरपासून शिर्डी विमानतळ सुरू होणार मंदिरे खुली होणार असल्याने विमानतळ विकास प्राधिकरणाचा निर्णय

नायक वृत्तसेवा, शिर्डी
दीड वर्षापासून कोरोनामुळे बंद असलेले काकडी (ता. कोपरगाव) येथील शिर्डी विमानतळ रविवारी 10 तारखेपासून सुरु होत आहे, अशी माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक सुशीलकुमार श्रीवास्तव यांनी दिली आहे. एप्रिल 2020 मध्ये कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. तेव्हापासून हे विमानतळ बंद होते.

साई मंदिरही बंद असल्याने साईभक्त शिर्डीकडे येत नव्हते. आता मंदिरेही खुले होणार असल्याने विमान सेवा सुरु होणे गरजेचे होते. त्यादृष्टीने विमानतळ विकास प्राधिकरणाने शिर्डी विमानतळाची विमाने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नई याठिकाणची विमानसेवा स्पाईसजेट व इंडिगो एअरलाईन सुरु करणार आहे. सकाळी साडेअकरा वाजता दिल्लीवरुन शिर्डी विमानतळावर विमान येणार आहे तर साडेबारा वाजता दिल्लीला जाणार आहे. दुपारी अडीच वाजता हैदराबादवरुन शिर्डी विमानतळावर विमान येणार आहे. तीन वाजता पुन्हा हैदराबादला जाणार आहे. दुपारी चार वाजता चेन्नईवरुन विमान शिर्डी विमानतळावर येणार असून साडेचार वाजता पुन्हा चेन्नईला जाणार आहे.

विमानतळ बंद असल्याच्या काळात याठिकाणी नाईट लँडिंगची कामे झाली. त्यात काही अडचणी आहेत. कार्गो सेवा सुरु करण्याच्या हालचालीही येथून सुरु आहेत. मध्यंतरी त्यासाठी अनेक बैठका पार पडल्या. कोरोनामुळे अनेक अडचणी आल्या. देशात विमानतळ सुरु झाल्यानंतर सुरुवातीपासून सर्वाधिक पसंती मिळालेले हे विमानतळ आहे. याठिकाणी अजून अत्याधुनिक सुविधा वाढविणे आवश्यक आहे. येथे दृष्यमानतेची अनेक वेळी अडचण निर्माण होत होती.

दृष्यमानतेमुळे मागे अनेक वेळी विमान उड्डाणे रद्द होती. अठरा महिन्यानंतर विमानसेवा सुरु होत असल्याने साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच काकडीतील वाहनधारकांनाही रोजगार सुरु होईल. लवकरात लवकर पूर्वी सुरु असलेली सर्व 28 विमानसेवा या विमानतळावरुन सुरु व्हावी, अशी साईभक्तांची अपेक्षा आहे.

मंदिरेही खुले होणार असल्याने विमान सेवा सुरु होणे गरजेचे होते. त्यादृष्टीने विमानतळ विकास प्राधिकरणाने शिर्डी विमानतळाची विमाने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
– सुशीलकुमार श्रीवास्तव (संचालक विमानतळ, शिर्डी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *