सुकेवाडी चषकाचा बाभळेश्वर संघ ठरला प्रथम मानकरी सुकेवाडी द्वितीय, निर्मळ पिंप्री तृतीय तर आश्वी ठरला चतुर्थ
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील सुकेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये बाभळेश्वर येथील संघाने प्रथम, सुकेवाडीच्या संघाने द्वितीय, निर्मळ पिंप्री तृतीय तर आश्वीच्या संघाने चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.
सुकेवाडी क्रिकेट क्लबच्यावतीने तीन ते चार दिवसांपासून जिल्हास्तरीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेसाठी संपूर्ण जिल्ह्यातून 36 संघ सहभागी झाले होते. त्यात शेवटच्या दिवशी बाभळेश्वर संघ विरुद्ध सुकेवाडी संघ असा अंतिम सामना झाला त्यात बाभळेश्वर संघ विजेता तर सुकेवाडी संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे 41 हजार रुपये रोख आणि सुकेवाडी चषक बाभळेश्वर क्रिकेट संघास जिल्हा परिषदेचे सदस्य भाऊसाहेब कुटे यांच्या हस्ते देण्यात आले. द्वितीय क्रमांकाचे 31 हजार रुपये रोख आणि सुकेवाडी चषक सुकेवाडीच्या संघास छावा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश सातपुते यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच तृतीय क्रमांकाचे 21 हजार रोख आणि सुकेवाडी चषक महाराष्ट्र राज्य मंगल कार्यालय आणि लॉन्स असोसिएशनचे अध्यक्ष गोरख कुटे यांच्या हस्ते निर्मळ प्रिंपी संघास देण्यात आले. शेवटी चतुर्थ क्रमांकाचे 13 हजार 333 रुपये रोख आणि सुकेवाडी चषक आश्वी संघास सरपंच वैभव सातपुते यांच्या हस्ते देण्यात आले.
याप्रसंगी संगमनेर दूध संघाचे ज्येष्ठ संचालक लक्ष्मण कुटे, कारखान्याचे संचालक दादासाहेब कुटे, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, दूधगंगा पतसंस्थेचे उपाध्यक्ष अशोक सातपुते, केशव जाधव, सुभाष कुटे, सोन्याबापू सातपुते, नानासाहेब कुटे, विलास कुटे आदिंसह स्पर्धेचे आयोजक अंकुश सातपुते, प्रवीण सातपुते, नितीन सातपुते, प्रदीप निकम, जगन्नाथ कोटकर, सोमनाथ निकम आदिंसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.