शेतकर्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन शेती करावी ः डख जगदंबा कृषी सेवा केंद्रातर्फे शेतकर्यांना मार्गदर्शन
नायक वृत्तसेवा, राहुरी
पिके काढणीला आल्यावर हमखास पाऊस होतो. त्यामुळे पिकाच्या जाती बदलून, लवकर किंवा विलंबाने येणारे बियाणे वापरावे. कृषी शास्त्रज्ञांनी हवामानावर आधारित जाती विकसित कराव्यात. बदलत्या हवामानामुळे निसर्ग आपल्याला चकवा देतो. आपण निसर्गाला चकवा द्यायला शिकले पाहिजे. त्यामुळे शेतकर्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन शेती करावी, असे प्रसिद्ध हवामानशास्त्र तज्ज्ञ पंजाबराव डख (रा.सेलू, जि.परभणी) यांनी सांगितले.
राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथे जगदंबा कृषी सेवा केंद्रातर्फे शेतकर्यांना मार्गदर्शन करताना हवामानशास्त्र तज्ज्ञ डख बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी डौले होते. तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, नगरसेवक प्रकाश भुजाडी, सचिन वने, नीलेश धसाळ, रवी भोंगळ, किशोर भोंगळ, आदिनाथ भोंगळ आदी यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना डख म्हणाले, शेतीला लहरी हवामानाचा सर्वाधिक फटका बसतो. तीस वर्षांपासून हवामानाचा अभ्यास करून नोंदी ठेवल्या आहेत. सॅटेलाईटद्वारे, आकाश व निसर्गातील हालचालींचा अभ्यास करून, हवामानाचा अचूक अंदाज सांगत असल्याने राज्यभरातील 42 हजार खेड्यांशी संपर्कात आहे. निसर्गाचे गणित जुळले तरच शेती फायद्याची ठरते. मूग, सोयाबीन, उडीद तूर काढणीच्या वेळी हमखास पाऊस येतो. कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी पाच-सहा दिवस उशिरा किंवा अगोदर पीक काढणीस येईल अशा जाती विकसित कराव्यात. जेणेकरून शेतकर्यांचे पीक काढणीचे गणित जुळेल.
15 ते 30 मे दरम्यान जेथे पाऊस पडतो. तेथे पावसाळ्यात चांगला पाऊस होतो. मे महिन्यातील पाऊस निर्णायक ठरतो. 22 फेब्रुवारी ते 10 मार्च दरम्यान गारपीट होत असते. परंतु, दोन-तीन किलोमीटरच्या परिघात गारपीट होते. त्याची शेतकर्यांनी भीती बाळगू नये. बुधवारपासून तीव्र थंडी सुरू होईल. येत्या 25 व 26 तारखेला राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस होईल असा अंदाज सांगून, पाऊस व तापमान वाढीची व घटण्याची कारणे डख यांनी समजावून सांगितली.