भाजपच्या चारशे पारच्या दाव्याला सायलेंट व्होटरचे पंख? मोदींच्या आत्मविश्‍वासाचे गमक काय?; मनामनात जागलेला ‘राम’च तारणार..

श्याम तिवारी, संगमनेर
पाचव्या टप्प्याच्या दिशेने सरकत असलेली 18 व्या लोकसभेची निवडणूक सध्या ऐन भरात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संपूर्ण ‘एनडीए’ने यावेळी चारशेहून अधिक जागा पटकावण्याचा दावा केला आहे, तर विरोधातील ‘इंडिया’ आघाडीने मोदींविषयी मतदारांमध्ये ‘रोष’ असल्याचे चित्र निर्माण करुन यावेळी भाजप दोनशेचा आकडाही ओलांडणार नाही असा प्रतिदावा केला आहे. या दरम्यान काही वृत्तवाहिन्यांचे निकालपूर्व सर्वेक्षणही समोर आले असून त्यातून भाजप आणि मित्र पक्षांची मोठी पिछेहाट होत असल्याचेही सांगण्यात आले. मात्र असे असतानाही मोदींसह भाजप आजही चारशेहून अधिक जागा मिळवणारच या आपल्या दाव्यावर ठाम असल्याचे त्यांच्या सभांमधून सांगत असल्याने एकंदरीत संभ्रमाचे वातावरण आहे. मोदी आणि भाजपच्या या आत्मविश्‍वासाला नेमके कशाचे बळ आहे असाही प्रश्‍न यातून निर्माण झाला आहे. केंद्राच्या विविध योजनांचे लाभार्थी आणि अयोध्येतील श्रीरामांच्या प्रतिष्ठापनेने सुखावलेला सायलेंट हिंदू मतदार भाजपच्या पंखांना बळ देत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे अवघ्या देशाला निवडणुकीपेक्षा निकालांबाबतच अधिक उत्कंठा लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.


कार्यक्रम कोणताही असो, त्याचा आपली आणि पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी कसा वापर करता येतो याचे सर्वोत्तम उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातून ठळकपणे उभे राहीले. मोदींच्या पहिल्या कार्यकाळात विदेशी वार्‍यांवरुन विरोधकांनी त्यांची वेळोवेळी खिल्ली उडवली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत त्यांनी एका उड्डाणात अनेक देशांना कवेत घेत परदेशस्थ भारतीयांमध्ये मातृभूमी विषयीच्या जाणीवा जागृत केल्या. त्यांच्या परदेशातील अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांना मिळणारा प्रतिसाद थेट प्रक्षेपणाद्वारा भारतातही मोठ्या प्रमाणात पाहीला गेल्याने देशातील नागरीकांच्या मनावरही त्याचा खोलवर परिणाम झाला. ज्या पद्धतीने दूरचा प्रवास करताना प्रत्येक टप्प्याचे नियोजन आवश्यक असते, त्याप्रमाणे मोदी आणि भाजपनेही प्रत्येक पंचवार्षिकमध्ये आपल्याकडे वळालेल्या मतदारासह त्यात सातत्याने वाढ करण्याचे पद्धतशीर नियोजन केल्याचे दिसून येते.


सलग दहा वर्ष एकाच व्यक्तिची आणि पक्षाची सत्ता अनुभवल्यानंतर नागरीकांमध्ये विद्यमान सरकार विषयी नकारात्मकता निर्माण होते, हा स्वाभाविक गुणधर्म आहे. पंतप्रधान मोदी मात्र त्यालाही अपवाद ठरवण्याच्या तयारीत आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मोदी सरकारने पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासह खोर्‍याला विशेष दर्जा देणारे कलम 370, तिहेरी तलाक, नागरीकत्त्व संशोधन बिल यासारखे धाडशी निर्णय घेत पहिल्या टर्मपेक्षाही अधिक जागा पटकावल्या. त्या काळातच सर्वोच्च न्यायालयाने प्रदीर्घकाळ तारखांमध्ये अडकलेला श्रीराम जन्मभूमीचा मुद्दा निकाली काढला. खरेतर भाजपची वाढच जन्मभूमी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर होत गेली आहे. त्यामुळे अयोध्येतील राम मंदिर आणि भाजप असे सूत्र जुळवण्यात आणि ते घराघरात पोहोचवण्यास त्यांना वेगळं काही करण्याची गरज भासली नाही.


त्यामुळेच मोदींच्या तिसर्‍या कार्यकाळासाठी राम मंदिराचा मुद्दा निश्‍चित केला गेला आणि निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच अपूर्णावस्थेत असूनही अयोध्येतील भव्य मंदिरात प्रतिष्ठापनेचा मुहूर्त निश्‍चित केला गेला. भारताची संस्कृती रामाशी जोडली गेली आहे. हिंदू धर्मियांमध्ये तर प्रभु श्रीरामांना आराध्य दैवताचा दर्जा आहे. त्यामुळे प्रतिष्ठापनेचा सोहळा भाजपला तिसर्‍यांदा सत्तेच्या चाव्या हाती देणारा ठरणार असे हेरुन पंतप्रधान मोदींनी अनुष्ठानासाठी अवघ्या तीन दिवसांचा उपवास करण्याची सूचना असतानाही 11 दिवस केवळ नारळाचे पाणी पिऊन काढले. या दरम्यान त्यांनी प्रभु श्रीरामांच्या जीवनाशी निगडीत देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी जावून पूजाअर्चा केली. त्यातील बहुतेक ठिकाणं यापूर्वी भाजपला कधीही यश न मिळालेल्या दक्षिण भारतातील आहेत हे विशेष.


अयोध्या आणि हिंदू धर्मियांचे अमीट नाते आहे. भारतीय संस्कृतीची आस्था असलेल्या प्रभु श्रीरामचंद्रांच्या जन्मस्थळावर पुन्हा सम्राट विक्रमादित्यांप्रमाणेच भव्यदिव्य मंदिर उभे रहावं यासाठी बाबराच्याही आधीपासून संघर्ष होतच राहीले. मात्र प्रत्येकवेळी ते परतवले गेले. बाबार सेनापती मीर बांकीने चोहोबाजूंनी तोफांचा मारा केल्याने मंदिर कोसळले आणि त्याचे रक्षण करणारे धारातीर्थी पडले. तेव्हापासून त्या जागेसाठी शेकडोंवेळा प्रयत्न झाले. प्रत्येकवेळी हजारोंनी रामनामाचा जाप करीत बलिदान दिले. पाचशे वर्षांपासून सुरु असलेला संघर्ष जेव्हा स्वप्नांच्या पूर्ततेत परावर्तीत होईल, तेव्हा त्याचा भारतीयांच्या मनावर काय परिणाम होतो याचे आकलन करण्यातच विरोधी पक्ष कमी पडला आणि जाणीव झाल्यानंतर त्याच सुधारणा करण्याऐवजी गोंधळलेल्या अवस्थेत गेला. त्याचा पूर्ण भावनिक राजकीय फायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी सहज भाजपच्या झोळीत पाडून घेतला.

राम भारताचा आत्मा आहे. त्याला धर्माच्या मर्यादा घालणं मूर्खपणाचे लक्षणं आहे. पूर्वभारताच्या साम्राज्यात असलेली व आता पूर्णतः इस्लामी झालेली अनेक राष्ट्र आजही श्रीरामांच्या जीवनाचे आचरण करतात. महात्मा गांधींच्या प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमाची सुरुवात रघुपती राघव राजाराम या भजनाने होतं. मृत्यूपूर्वी त्यांच्या मुखातून केवळ हे राम इतकेच शब्द बाहेर पडले, जे त्यांच्या समाधीवरही गोंदण्यात आले आहेत. घटनाकारांनी मूळ संविधानातही श्रीराम आणि त्यांच्या जीवनातील अनेक रेषाचित्रांचा समावेश केला होता. मात्र नंतरच्या काळात ती सर्व चित्रं पूर्णतः काढून टाकण्यात आली. आकाशवाणीवरुन जेव्हा गीत रामायण सादर झालं तेव्हा आणि दूरदर्शनवर रामायण ही धारावाहिक सुरु झाली तेव्हा देश कसा राममय होतो याचे जिवंत चित्रही दिसलं होतं.


पाचशे वर्षांनंतर अयोध्येतील भव्य मंदिरात श्रीराम प्रतिष्ठापनेतून काय साधायचंय याचा रुट मॅप मोदी आणि भाजपकडे असल्याने गेल्या दिवाळीपासूनच अयोध्येतील मंदिर चर्चेत आणले गेले. प्रत्यक्ष प्रतिष्ठापणेच्या दिवसापर्यंत जनभावनांची पातळी शिखरावर होती. घराघरात माणसं कुटुंबासह टीव्हीसमोर बसून हा दिव्य सोहळा बघतं होती. अगदी खडकाच्या दर्जापासून ते प्रत्यक्ष घडवून गाभार्‍यात पोहोचलेली रामलल्लांची मूर्ती, त्यांचे भाव कसे असतील यावर माध्यमांमध्ये चर्चासत्र घडवले गेले. त्यामुळे अयोध्या आणि राम याबाबत आस्था असलेला हिंदूवर्ग हळूहळू शरयूच्या पात्राशी बांधला गेला. जेव्हा श्रीरामाच्या डोळ्यावरची पट्टी हटवली गेली, तेव्हा त्याचे थेट प्रक्षेपण पाहणार्‍या कोट्यवधी नागरीकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहील्या. घराघरात टीव्हीवर दिसणार्‍या रामलल्लांची आरती ओवाळली गेली आणि त्याद्वारे रामाने मोदींसह कोट्यवधींच्या मनात प्रवेश केला.


कोविड संक्रमणापासून केंद्र सरकार 60 कोटी नागरीकांना मोफत धान्य देत आहे, 2029 पर्यंत ही योजना सुरु राहील असेही सरकारने जाहीर केले आहे. घरकुल योजना, शौचालय, किसान सन्मान योजना, उज्ज्वला गॅस, आयुष्यमान भारत अशा कितीतरी योजनांच्या माध्यमातून मोदी सामान्यांशी थेट जोडले गेले आहेत. समाज माध्यमांमध्ये लोकप्रिय असलेल्या रिल्सचा त्यासाठी त्यांनी खूप आधीपासून अतिशय खूबीने वापर केला आहे. त्यांच्या रॅल्यांचे असंख्य रिल्स समाज माध्यमांमध्ये आहेत. त्यात रस्त्याच्या दुतर्फा दिसणार्‍या नागरीकांच्या चेहर्‍यांवरील भाव, त्यांच्या शारीरिक प्रतिक्रिया खूप बोलक्या असल्याचे जाणवते. काँग्रेसच्या थींक टँकला कदाचित रिल्सचा प्रभाव समजण्यास काहीसा उशिर झाला. तो पर्यंत पाणी पुलाखालून गेले होते. देशात स्मार्टफोन्सचे वापरकर्ते 46 कोटींहून अधिक आहेत. त्यातील 22 कोटी वापरकर्ते 18 ते 25 वयोगटातील आहेत. मतदारांच्या खूप मोठ्या वर्गापर्यंत या रिल्सच्या माध्यमातून ते जोडले गेले.


काँग्रेससह सगळे विरोधक मात्र या सोहळ्यापासून अलिप्त राहिल्याने या सर्वांचा राम मंदिराला विरोध असल्याचे व एका वर्गाला खूष करण्यासाठी आमंत्रण देवूनही सगळे विरोधक अनुपस्थित राहिल्याचे चित्र बिंबवण्यातही भाजपने सरशी घेतली. मोदींनी खूप आधीच चारशेचे लक्ष्य घोषीत करुन ते जनमनावर बिंबवण्यास सुरुवात केली. त्याचा प्रभाव इतका झाला की खिल्ली उडवण्यासाठी का होईना पण विरोधकांनाही चारशे पारचा वारंवार उल्लेख करावा लागला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही त्यातून बचावले नाहीत. भारतीयांच्या रामाशी असलेल्या भावना तंतोतंत ओळखून झालेला अयोध्येतील प्रतिष्ठापना सोहळा, त्यातून मनामनात जागलेला राम, तेव्हापासूनच अबकी बार, चारसौ पार म्हणतं रामासोबत मोदींचाही लोकांच्या मनात झालेला प्रवेश हेच त्यांच्या आत्मविश्‍वासाचे गमक असू शकेल.


राम भावनेने जागलेल्या समाजाला योगी आदित्यनाथ यांनी काशी विश्‍वेश्‍वर आणि मथुरेच्या मुद्द्यांना हात घालून अयोध्येने जागवलेल्या भावना चेतवत ठेवण्याचे काम खूबीने बजावल्याचे एकंदरीत त्यांच्या भाषणांमधून दिसून आलं. या मोठ्या वर्गासोबत विविध योजनांचे लाभार्थी ही भाजपच्या जमेची बाजू असल्याने त्यांचा मतांच्या रुपाने आपल्याला मोठा फायदा होईल असे त्यांचे सूत्र आहे. काही मुद्द्यांवर प्रांतिक नाराजी असल्याने तेथील काही ठिकाणी धोका निर्माण झाला होता. मात्र त्याकडेही वेळीच बारकाईने लक्ष दिले गेल्याचेही दिसले. गृहमंत्री अमित शहा यांनी नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चार टप्प्यात झालेल्या 379 जागांमधील 270 जागा भाजप आणि मित्रपक्ष जिंकतील असा दावा त्यांनी केला. राहीलेल्या 164 जागांमधील 130 जागांवर पक्षाने लक्ष केंद्रीत केल्याचेही त्यांनी सांगितले. यासर्वांचा परिपाक विचारात घेता रामनामाने भाजपचे जहाज पल्याड जावू शकते असेच काहीसे चित्र निर्माण झाले आहे.


राम केवळ हिंदूच नव्हेतर बहुधर्मियांमध्ये पूजनीय आहेत. अनेक आशियाई देशांमध्ये तेथील शासक राम चरित्राचे पालन करण्याचा प्रयत्न करतो. राम आणि अयोध्येतील जन्मस्थळ देशातील बहुसंख्य वर्गाशी थेट बांधलेले आहे. राम प्रतिष्ठापनेतून ते साधता येणार यांची पूर्ण कल्पना मोदी आणि भाजपला होती. मात्र विरोधकांनी रामाला धर्माशी बांधून एकप्रकारे सार्वजनिक असलेला हा संपूर्ण सोहळाच भाजपच्या गाठीशी बांधून दिला. त्याचा परिपूर्ण राजकीय लाभ भाजप आणि मित्र पक्षांना होवू शकतो. मनामनात राम जागलेला आणि योजनांचा लाभ घेणार्‍या मतदारांचा मोठा वर्ग सायलेंटपणे आपला हक्क बजावून गेला आहे. मतदान करताना त्याच्यासमोर असलेली रामाची प्रतिमा आणि पोटातील अन्नाचा विचार आपल्याला चारशे पार घेवून जाईल हा पंतप्रधानांचा विश्‍वास त्यांच्या मुलाखती आणि प्रचारसभांमधून ऐकायला आणि बघायला मिळत आहे. त्यामुळे नेमकं काय होणार याची देशभरात उत्कंठा ताणली गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *