महिलेच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारून चोरी! सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम लांबवली

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील कोतुळपासून १ किलोमीटर अंतरावरील साबळेवाडीमध्ये सोमवारी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी झोपलेल्या महिलेच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारून गळ्यातील मनी मंगळसूत्र व पाच ते सहा हजार रोख रक्कम चोरून पोबारा केला.

साबळे वस्ती येथील शेतकरी शांताराम मुकिंदा देशमुख, त्यांची पत्नी, सुन व दोन नातवंडे हे सायंकाळी जेवण करून घरात झोपलेले असतांना मध्य रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाज्याची कडी कापून घरात प्रवेश केला. यावेळी घरातील दिवाणखान्यात देशमुख यांची सुन व नातवंडे झोपलेली होती तर शांताराम देशमुख आपल्या पत्नीसह आतील शयनकक्षात झोपलेले होते. चोरट्यानी देशमुख झोपलेल्या शयन कक्षाची बाहेरून कडी लावुन घेतली. आणि दिवाणखान्यात झोपलेल्या सुनेच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारून तिच्या गळ्यातील पावणे दोन तोळ्याचे सोन्याचे मनी मंगळसुत्र ओरबाडून घेतले.

त्याचबरोबर कानातील पाच ग्रॅमच्या रिंगा काढुन घेतल्या. शेजारील बेड उचकून त्याखाली ठेवलेले पाच, सहा हजार रोख रक्कम काढून घेतली. यावेळी चोरटे स्वयंपाक घरात जात असतांना चोरट्याचा पाय झोपलेल्या सुनेच्या पायावर पडला व ती शुद्धीवर आली असता तिने आरडाओरडा केला परंतु शयनकक्षाचा दरवाज्याची कडी बाहेरून लावलेली असल्याने सासु सासरे काहीच करू शकले नाहीत.

चोरट्यानी अंधाराचा फायदा घेत पलायन केले. काही वेळाने परिसरातील लोक जमा झाले. त्यांनी शोधा शोध केली परंतु चोरटे पसार झाले.
त्याच ठिकाणी शंभर फुटावर १ महिन्यापूर्वी अपंग व विधवा महिलेला मारहाण करून तिचे सोन्याचे मंगळसुत्र व चांदीचे दागीने व रोख रक्कम घेऊन चोरटे फरार झाले होते.

Visits: 110 Today: 2 Total: 1102153
