पोखरी बाळेश्वर येथील कुंटणखाना पोलिसांकडून उध्वस्त ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत तर सहा जणांवर गुन्हा

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील पोखरी बाळेश्वर येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा घारगाव पोलिसांनी मंगळवारी (ता.६) रात्री साडेदहा वाजता छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार पीडित तरुणींची सुटका करून ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की पोखरी बाळेश्वर शिवारात वैशाली उत्तम फटांगरे (रा.पोखरी बाळेश्वर, ता.संगमनेर) ही महिला पत्र्याच्या शेडमध्ये कुंटणखाना चालवत असल्याची माहिती संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या.

बनावट ग्राहक पाठवून खात्री होताच घारगावचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, पोना. राहुल डोके, पोकॉ. राहुल सारबंदे, पोहेकॉ. अनिल कडलग, चालक पोहेकॉ. संतोष फड, महिला पोकॉ. ताई शिंदे, घारगावचे पोलीस उपनरीक्षक उमेश पतंगे, पो कॉ. प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे, नामदेव बिरे, उपनिरीक्षक पल्लवी वाघ यांनी छापा टाकला असता वैशाली फटांगरे, सोमनाथ यादव सरोदे (रा. आनंदवाडी, ता. संगमनेर) व दीपक उत्तम फटांगरे (वय २१, पोखरी बाळेश्वर, ता. संगमनेर) हे संगनमत करून चार तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी वेश्यागमन करण्यासाठी आलेल्या तिघांनाही ताब्यात घेतले.

तर कुंटणखाना चालवण्यासाठी लागणारे साहित्य, मोबाईल, रोख रक्कम व वाहने असा एकूण ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक पल्लवी वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील सहा आरोपींवर घारगाव पोलिसांत गुन्हा नोंद क्रमांक ३६/२०२४ भादंवि कलम ३७०, ३४ सह स्रिया व मुलींच्या अनैतिक व्यापार्यास प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५, ७ व ८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर हे करत आहे.
