नास्तिक पक्षांबरोबर संसार थाटल्याने शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर ः भोसले
नास्तिक पक्षांबरोबर संसार थाटल्याने शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर ः भोसले
नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डीचे साईमंदीर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. याठिकाणी दर्शनाला येणार्या भक्तांची संख्याही अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदीर भाविकांसाठी बंद आहे. मंदीर उघडण्यासाठी विरोधक आग्रही आहेत. आता भाजपचे अध्यात्मिक समन्वयक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस या नास्तिक पक्षांबरोबर शिवसेनेने संसार थाटल्याने त्यांना मंदीर व हिंदुत्वाचा विसर पडला असल्याची टीका त्यांनी केली.

महाराष्ट्र राज्यातील सरकारने बियर-बार उघडले असून मंदिरे मात्र बंद ठेवले आहेत, त्यासाठी आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी शहरातून आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार सोमवारी (ता.12) भाजपच्या अध्यात्मिक समन्वयक आघाडीच्यावतीने शिर्डी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी भोसले बोलत होते. याप्रसंगी सुधीर महाराज, बबन मुठे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगरसेवक शिवाजी गोंदकर आदिंसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना आचार्य भोसले म्हणाले, टाळेबंदीमध्ये मंदिरे बंद असल्याने अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे खुली करावी यासाठी भाजप अध्यात्मिक समन्वयक आघाडीच्यावतीने आज आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी शहरात आंदोलन करण्यात आले. यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे स्वतःच मंदीर खुले करण्यासाठी आग्रही झाले होते. सरकारच्या नियमाला पूर्ण बांधिल राहून शिर्डी येथील साईबाबा मंदीर सुरू करावे, अशी मागणी खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली होती. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये, ही दक्षता घेण्यासाठी सरकारने मंदीर बंद केले आहे. मंदीर बंद करण्याचा तसा काही विषय नव्हता. तेथे केवळ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढू नयेत, म्हणून ती बंद केली आहे. आता टप्प्याटप्याने मंदिरे सुद्धा सुरू होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

