साडेचारशे दिवसांनंतर संगमनेरकरांना सर्वात ‘मोठा’ दिलासा! आज शहराची रुग्णसंख्या ‘शून्य’; तालुक्यातील ‘कोविड मुक्ती’चा आलेख मात्र ढासळला..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या वर्षी चार एप्रिलरोजी संगमनेर शहरासह तालुक्यात प्रवेशलेल्या कोविडने नंतरच्या काळातील पंधरा महिन्यात एक एक करीत तालुक्यातील सर्व गावांसह वाड्या आणि वस्त्यांमध्येही आपला संसर्ग विस्तारला. चारशे त्रेचाळीस दिवसांच्या या कालावधीत सुरुवातीचा अपवाद वगळता शहरातून दररोज रुग्ण समोर येण्याची श्रृंखला अखंड सुरु होती. या कालावधीत एकही दिवस शहरी रुग्णांशिवाय समोर आला नाही. मात्र तब्बल साडेचारशे दिवसांनंतर आज तो सूर्य उगवला आणि शहर किमान आजच्या दिवशी ‘कोविड मुक्त’ झाले. अर्थात आज तालुक्यातील बारा गावे आणि वाड्या-वस्त्यांमधून 20 जणांना कोविडची लागण झाल्याचे अहवालही प्राप्त झाले आहेत. त्यातच शहरवासियांना दिलासा मिळाला असला तरीही दुसरीकडे तालुक्याच्या ग्रामीणभागातील कोविड मुक्त झालेल्या पाच गावांमध्ये पुन्हा रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोविड मुक्त झालेल्या गावांची संख्या आता 108 वरुन 103 झाली आहे. सध्या तालुक्यातील 71 गावांमध्ये 202 कोविड बाधित असून त्यात शहरातील अवघ्या 20 जणांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने संगमनेरची एकूण रुग्णसंख्या आता 22 हजार 649 झाली आहे. तालुक्यातील रुग्ण समोर येण्याची एकूण सरासरी 16.48 टक्के तर रुग्ण बरे होण्याची सरासरी गती 98.65 टक्के आहे.


मागील वर्षी 4 एप्रिलरोजी संगमनेर शहरातील नायकवाडपूर्‍यासह तालुक्याच्या ग्रामीणभागातील आश्‍वी बुद्रुकमध्ये कोविडचा प्रवेश झाला. त्यानंतर जूनपर्यंत त्याने तालुक्यात बर्‍यापैकी भागात पाय पसरले. जुलैपासून संक्रमणाचा वेग वाढत जावून सप्टेंबरपर्यंत रुग्णवाढीने कळस गाठला. या एकाच महिन्यात 1 हजार 529 इतके उच्चांकी रुग्ण समोर आल्याने दिवाळीनंतर तालुक्यात संक्रमणाची दुसरी लाट येणार असल्याचे अंदाजही यंत्रणांसह वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी वर्तविले होते. प्रत्यक्षात मात्र सप्टेंबरनंतर संक्रमणात टप्प्याटप्प्याने घट होवून नववर्षाच्या सुरुवातीला ती अगदी नगण्य स्वरुपात समोर येवू लागल्याने सरकारपासून सामान्यांपर्यंत सर्वांनाच कोविडचा विसर पडला. निवडणूका, सभा, मेळावे, लग्न सोहळे, धार्मिक व सामाजिक उत्सव अगदी धुमधडाक्यात सुरु झाले आणि जवळपास परतलेला कोविड तेवढ्याच गतीने चेवताळत माघारी आला आणि त्याने हाहाकार माजवला.


या कालावधीत संगमनेर तालुक्यातील जवळपास 23 हजार जणांना कोविडचे संक्रमण झाले आणि शासकीय नोंदीनुसार त्यातील 103 जणांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षात मात्र समोर आलेल्या बाधितां इतकीच संख्या चाचणी न करता परस्पर कोविड उपचार घेणार्‍यांची आहे. या संपूर्ण कालावधीत तालुक्यातील सुमारे एक हजारांहून अधिक रुग्णांचा कोविडने मृत्यू झाला. पहिल्या संक्रमणापेक्षा कोविडची सर्वाधीक दाहकता दुसर्‍या लाटेत भोगावी लागली. या कालावधीत तालुक्याची रुग्णसंख्या तिप्पटगतीने वाढली. एकवेळ तर संक्रमणाचा दैनिक सरासरी दर थेट 285 रुग्णांवर पोहोचला होता. त्यामुळे 1 हजार 600 रुग्णांवर उपचारांची सोय असूनही तालुक्यातील अनेक रुग्णांना खाटांसाठी वणवण करावी लागली, काहींनी या धडपडीत जीवही गमावले इतकी परिस्थिती गंभीर बनली होती. संगमनेर शहरासह तालुक्यातील काही मोठ्या गावांमधून सातत्याने रुग्ण समोर येत गेल्याने त्याचा प्रादुर्भाव आत्तापर्यंत अनियंत्रित होता. आता त्याला नैसर्गिक ब्रेक लागला असून कोविडच्या नियमांचे तंतोतंत पालन झाल्यास त्याचे संभाव्य तिसरे संक्रमण रोखता येणं शक्य आहे. अन्यथा तो वेगळ्या स्वरुपात पुन्हा हल्ला करण्यास सज्जच आहे.


गेल्या पंधरा महिन्यातील तब्बल 443 दिवसांपासून शहर आणि तालुक्यावर दाटलेले कोविड संक्रमणाचे काळे कुट्ट ढग आता विरळ होत आहेत. त्यातूनच तालुक्यातील जवळपास 103 गावे आता कोविड रुग्णांच्या बाबतीत शून्य झाली असून आजच्या स्थितीत कोविड मुक्त आहेत. त्यासोबतच गेल्या जवळपास 13 महिन्यांपासून दररोज रुग्ण समोर येण्याची श्रृंखला कालअखेर अव्याहत असलेल्या संगमनेर शहरातून आज एकही रुग्ण समोर आलेला नाही. खुप मोठ्या कालावधीनंतर संगमनेरकरांना मिळालेली ही अत्यंत समाधानकारक वार्ता आहे. आजच्या अहवालातून शहराला दिलासा मिळाला असला तरीही ग्रामीणभागातील बारा गावे आणि वाड्या-वस्त्या मिळून आज 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यातील अकरा रुग्ण तीन कुटुंबात मिळून आहेत.


आज खासगी प्रयोगशाळेच्या अकरा आणि रॅपीड अँटीजनेच्या नऊ अहवालातून तालुक्यातील चिकणी येथील 55 वर्षीय इसम, घुलेवाडी येथील 50 वर्षीय महिला, हिवरगाव पावसा येथील 18 वर्षीय तरुण, वेल्हाळे येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 39 वर्षीय तरुण, 32 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगा व पाच वर्षीय बालिका, पिंपरणे येथील 35 वर्षीय महिला, कर्‍हे येथील 80 वर्षीय महिला, कुरण येथील 28 वर्षीय महिला, लोहारे येथील 42 व 35 वर्षीय तरुणांसह 35 वर्षीय महिला, वरवंडी येथील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 65 वर्षीय महिला व 28 वर्षीय तरुण, पानोडी येथील 28 वर्षीय तरुण, उंबरी बाळापूर येथील 69 वर्षीय महिला व ओझर बु. येथील 41 वर्षीय तरुण अशा एकूण 20 जणांना कोविडचे संक्रमण झाले आहे.


संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यालाही आज खुप मोठा दिलासा मिळतांना गेल्या साडेतीन महिन्यानंतर आज पहिल्यांदा एकूण रुग्णसंख्या तिनशेहून खाली आली. आज शासकीय प्रयोगशाळेच्या दोन, खासगी प्रयोगशाळेच्या 134 व रॅपीड अँटीजेनच्या 147 निष्कर्षातून जिल्ह्यातील 283 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सर्वाधीक पारनेर तालुक्यातील 45, राहाता 41, श्रीगोंदा 30, शेवगाव 26, पाथर्डी 24, संगमनेर 20, कोपरगाव 17, श्रीरामपूर 13, नेवासा 12, अहमदनगर महापालिका क्षेत्र व राहुरी प्रत्येकी 11, अकोले, कर्जत व जामखेड प्रत्येकी आठ, नगर ग्रामीण सहा व इतर जिल्ह्यातील तिघा रुग्णांचा त्यात समावेश आहे.

कोविडचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून संगमनेर तालुक्यातील 1 लाख 37 हजार 470 जणांची कोविड चाचणी करण्यात आली. त्यात 46 हजार 334 जणांचे स्राव शासकीय तर 23 हजार 813 जणांचे स्राव खासगी प्रयोगशाळांमध्ये तपासले गेले. या कालावधीत 67 हजार 323 जणांची रॅपीड अँटीजेन चाचणीही करण्यात आली. त्यातून 16.48 टक्के सरासरीने तालुक्यातील 22 हजार 649 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यातील 22 हजार 344 रुग्णांवर आजवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले, तर शासकीय नोंदीनुसार आत्तापर्यंत शहरातील 24 जणांसह तालुक्यातील एकूण 103 जणांचा कोविडने मृत्यू झाला आहे. आजच्या स्थितीत शहरातील 20 जणांसह तालुक्यातील एकूण 202 जणांवर उपचार सुरु आहेत. उपचार पूर्ण करणार्‍या 21 जणांना आज घरी सोडण्यात आले. तालुक्यातील रुग्ण बरे होण्याची गती 98.65 टक्के असून मृत्यूचे प्रमाण 0.45 टक्के आहे.

Visits: 22 Today: 1 Total: 115950

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *