हरिश्चंद्र गड, अमृतेश्वर मंदिर व टाहाकरी मंदिराचा जतन योजनेत समोवश करा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे माजी आमदार वैभव पिचड यांची पत्रातून मागणी
नायक वृत्तसेवा, अकोले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत राज्यातील जुन्या मंदिरांचे जतन करण्याचे काम करण्याची घोषणा करून त्याची आर्थिक तरतूद केली जाईल, असे म्हंटले आहे. या निर्णयाबद्दल अभिनंदन करतो. परंतु, अकोले तालुक्यातील हरिश्चंद्र गड, अमृतेश्वर मंदिर व टाहाकरी मंदिराचा त्यात समावेश करावा, अशी मागणी भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांनी केली आहे.
याबाबत मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र पाठविले आहे. पुरातन वास्तूंचे संवर्धन करण्याची जबाबदारी राज्याच्या पुरातत्व विभागाची आहे. हजारो वर्षांच्या वास्तूचा कालावधी लक्षात घेऊन शास्रशुद्ध संवर्धन आवश्यक असते. या नियमाला डावलून पुरातत्व खाते केवळ भेगा पडलेल्या दगडी चिर्यांना सिमेंट चोपडण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे ऐतिहासिक वास्तुंच्या सौंदर्याला बाधा पोहचत आहे. गड, किल्ले, पुरातन मंदिरे आणि धर्मशाळा यांचे जतन करण्याचे व संवर्धन करण्याचे काम व जबाबदारी पुरातत्व विभागाला जिकरीचे वाटते, नव्हे तर ते या बाबींकडे दुर्लक्ष करत आहेत.
अनेक दुर्गप्रेमींच्या भावना या गड किल्ल्यात व मंदिरात दडलेल्या आहेत. मात्र वर्षानुवर्षे या वास्तूकडे दुर्लक्ष केले जात आहे. रस्ते बांधणी ठेकेदाराला ठेका देऊनही कामे काही अंशी उरकली जातात. त्यामुळे प्राचीन वास्तूची रया जाते. पुरातत्व अधिकार्यांचा स्थापत्य शैलीचा अभ्यास नसल्यास संवर्धनानंतर या वस्तू बेढब दिसता. हरिश्चंद्र गड, अमृतेश्वर मंदिर, टाहाकारी मंदिर, हेमाडपंथी शैलीतील मंदिरे आणि दीपमाळ, बुरुज, कोसळण्याच्या स्थितीत आहेत. तर अतिवृष्टीच्या काळात ही मंदिरे गळतात. मंदिराचे दगड सरकली आहेत. पुरातत्व खाते स्थानिकांना यात हस्तक्षेप करू देत नाहीत. त्यामुळे या वास्तू मोडकळीस आल्या असून, हरिश्चंद्रगडा वरील विठ्ठल-रुख्मिणी मातेची मूर्ती चोरीला जाऊनही पुरातत्व खाते साधी चौकशी व पोलीस केस करत नाही. त्या अर्थी त्यांना या वास्तूबद्दल आत्मियता नाही.
गिरीप्रेमींनी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी आपणाकडे याबाबत ओरड केली असून, याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून या वास्तूंचे खास बाब म्हणून निधी उपलब्ध करून जतन करावे व तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पिचड यांनी केली आहे. महाराष्ट्रातील विविध मंदिरांचे जतन करण्यासाठी निधी उपलब्ध करताना अकोले तालुक्यातील पुरातन वास्तुंसाठी तातडीने निधी द्यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.